Ticker

10/recent/ticker-posts

श्रावण म्हणजे संस्कृतीचं जपणं

-दादासाहेब येंधे

आपल्या परंपरेत बाराही महिन्यांमध्ये कोणते ना कोणते सणवार साजरे केले जातात. परंतु त्यातील श्रावण महिना सर्वाधिक सणावारांनी परिपूर्ण, हौसमौज  साजरी करण्याचा, त्यातला प्रत्येक दिवस पवित्र म्हणून तसेच शुभ कार्यात योग्य म्हणून स्त्रीवर्गात विशेष लोकप्रिय असा आहे. श्रावणातल्या रिमझिम सरींच्या साक्षीनं आणि निसर्गाचे लोभस रुप न्याहळत साजरा केला जाणाऱ्या सणावारातील आनंद काही निराळाच असतो.

हल्लीच्या स्पर्धेच्या युगात वेळात वेळ काढून ठिकठिकाणी केल्या जाणाऱ्या सत्यनारायणाची पूजाअर्चा, व्रतवैकल्ये, पोथ्यांचे श्रवणपठण, मंगळागौरीची थाटामाटात होणारी पूजा, रात्रीच्या जागरणांत सादर केले जाणारे पारंपारिक खेळ हा सगळा श्रावणाच्या दरबारात भरलेला थाट पाहिला की कुराणातील वैभवशाली साम्राज्याची आठवण येते. आपल्या परंपरेत बाराही महिन्यांमध्ये काही ना काही सण ग्रंथकर्त्याने लिहून ठेवले आहेत. त्यात प्रत्येक महिन्याचे महत्त्व वेगळं असते. पण त्यातील श्रावण महिना सर्वाधिक सणावारांनी परिपूर्ण हौसमौज साजरी करण्याचा शुभ कार्य योग्य म्हणून विशेष लोकप्रिय आहे.


श्रावणातील सोमवार, मंगळागौरीचे पूजन, शुक्रवारची सवाष्ण जेवायला बोलावणे, नागपंचमीला पुरणाची धिरडं करणे, राखी पौर्णिमा साजरी करणे, गोकुळअष्टमीला कृष्ण जन्म साजरा करून दहीहंडी फोडणे अशी सणांची रेलचेल इतकच नव्हे तर बैलपोळ्याचा सण सुद्धा उत्साहाने श्रावणात साजरा केला जातो.


श्रावणात उपास-तापास बऱ्याच प्रमाणात केले जातात. त्यामुळे घराघरात उपवासाच्या पदार्थांची तयारी सुरू होते. सणावारांना नातेवाईकांना हौसेने, प्रेमाने जेवायला बोलावले जाते. श्रावणी सोमवारचा उपवास सोडायला संध्याकाळी आमच्या घरीच या असा आग्रहाचं आमंत्रण श्रावण महिना येण्यापूर्वीच एकमेकांना दिले जातं. शुक्रवारची सवाष्ण जेवायला कोणाला कोणाला बोलवायचं याचे विचार देखील मोठ्या हौसेने महिला वर्गात होऊ लागतात. पुरणपोळीचा खास बेत सवाष्णींसाठी करायचा ही पूर्वपार परंपरा आहे. अनेक गृहिणी नोकरी करणाऱ्या असल्या तरी आपल्याला जमेल अशा पद्धतीने त्या सवाष्णीला जेऊ घालतात, ही मोठी कौतुकाची गोष्ट म्हणावी लागेल. या गोष्टी कालामानानुसार सोयीचा चांगला बदल म्हणून स्वीकारल्या गेल्या आहेत. कारण असे सोयीचे बदल स्वीकारले तरच सणवार आनंदाने, मनावर कुठलाही ओझं न घेता पार पाडले जातात. त्यातील मूळ हेतू प्रेमाच्या नातेसंबंध जपण्याचा, वाढ होण्याचा आणि अन्नदान करण्याचा. तो यातून सहज साधला जातो.


रक्षाबंधनाचा सण देखील अगदी लहान मुली पासून वृद्ध स्त्रियांपर्यंत खूप उत्साहाने साजरा केला जातो. बंधूप्रेमानं ओथंबलेला हा सण स्त्री वर्गात कित्येक वर्षांपासून लोकप्रिय आहे. बाजारात राख्या यायला सुरुवात झाली की, यावर्षी भावाला कुठली राखी बांधायचे याचा शोध घेणे सुरू होतं. आपल्या बंधू राजाला भोजनाला फराळाला बोलून त्याच्या आवडीचा खास बेत करायचे मनोरे मनात मानले जातात. 



तसेच मंगळागौर हा तर नवपरिणतेचं कौतुक करण्यासाठी खास साजरा होणारा सण,  स्त्रियांमध्ये आवडता आहे. या मंगळागौरीची तयारी खूप पूर्वीपासून केली जाते. या दिवसात सर्वत्र हिरवळ दाटलेली असते. सहाजिक विविध प्रकारच्या लता वेलींना बहर आलेला असतो. त्यामुळेच की काय मंगळागौरीच्या पूजेत विविध प्रकारच्या पत्रींचं महत्त्व आहे. मंगळागौरीच्या पूजेला जास्तीत जास्त विवाहित मुली मिळाव्यात म्हणून दोन-तीन महिने अगोदरच त्यांची निमंत्रण निश्चित केली जातात. त्यांना भेटवस्तू काय द्यायची याचा विचार देखील केला जातो.


मंगळागौरी प्रमाणेच गोकुळ अष्टमीच्या दहीहंडीची तयारी देखील एक महिना आधीपासूनच केली जाते. त्यासाठी वर्गणी गोळा केले जाते. आता या उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले असून उंचाच्या उंच दहीहंडी फोडण्यासाठी त्याच उंचीचे थर लावण्यासाठी गोविंदाची पथके प्रयत्नशील असतात.


गावच्या ठिकाणी खेड्यापाड्यात बैलपोळ्याला बैलगाडीची शर्यत आजही लावली जाते. हा सण मोठ्या प्रमाणात शेतकरी साजरा करतात. त्याची पूर्वतयारी ही मोठ्या प्रेमाने केली जाते. या उत्सवाच्या निमित्ताने त्यांना बैलांबद्दलची कृतज्ञता, प्रेम व्यक्त करायचं असतं. आपल्या शेतातील इमान इतबारे राबणाऱ्या बळीराजाला दोन घास गोडधोड खाऊ घालावे या दृष्टीने हा आटापटा केला जातो. त्यानिमित्ताने बैलांना स्नान घातलं तर त्यांना चांगल्या प्रकारे रंगवलं जातं. बैलांच्या गळ्यात घुंगुरमाळा अडकवल्या जातात. त्यांची वाजतगाजत निघालेली मिरवणूक चर्चेचा विषय ठरते.


श्रावण या सणाचा आनंद मोठ्यांबरोबरच बालचमूही मिळवत असतात. श्रावणात अनेक सण येत असल्याने काही कालावधीकरिता का होईना मनाला या आनंद देणारे हे सण आपल्याला एका वेगळ्या वातावरणात घेऊन गेल्यासारखे वाटतं. एकंदरीत, श्रावण महिना म्हणजे सणांची रेलचेल, संस्कृती जपणं, प्रेमाची देवाण-घेवाणीचाच सण म्हणावा लागेल.


Photo : viral

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या