अंबरनाथमधील एका गावात राहणाऱ्या एका महिलेने महिनाभरानंतर “आपणच आपल्या मुलीला दुसर्या मजल्यावरून खाली फेकलं," अशी कबुली पोलिसांकडे दिली. डोंबिवलीतील एका नर्सिंग होममध्ये ही घटना घडली होती. पाच दिवसांच्या एका अर्भकाला कुणीतरी वरून खाली फेकलं होतं. प्रसूतीनंतर आई बाळाला घरी घेऊन जाणार होती, त्याच दिवशी ही घटना घडली होती. त्या वेळी त्या महिलेची आई आणि सासू या दोघीही तिथे उपस्थित होत्या. त्या दोघींना वॉर्डमधून बाहेर पाठवून या महिलेने हे अर्भक फेकण्याचं धाडस केलं, असं आता अन्य रुग्णांच्या तसंच त्या महिलेच्या जबाबावरून पोलिसांना लक्षात आलं आहे.
गरोदरपणाच्या संपूर्ण काळात ही महिला आपल्याला दुसरीही मुलगीच होईल, या विचाराने खंगलेली होती, असं पोलिसांना तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. नवऱ्याला कामधंदा नसल्यामुळे तिला ही चिंता वाटत होती. प्रसूतिपूर्व लिंगनिदान करण्याला बंदी असल्यामुळे तिला ते करून घेता आलं नाही. घरच्या ओढप्रस्तीच्या परिस्थितीमुळे तिला दुसरं मूल मुलगा असला तरच हवं होतं, असं यावरून लक्षात येतं. इथेही काही प्रश्न अनुत्तरितच राहतात. त्यांची उत्तरं शोधण्याची गरज आहे.
कामधंदा नसणारा तिचा पती शरीरसंबंध करतेवेळी गर्भनिरोधाची साधनं वापरण्यात सहकार्य करत होता का? या महिलेने गर्भनिरोधाची उपाययोजना केली नव्हती का? गरिबीच्या परिस्थितीत मूल होऊ द्यावं की नाही, हे ठरवण्याचा अधिकार तिला होता का? मुलगा झाल्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही, वंश पुढे सुरू राहणार नाही आदी समजांचा अर्थातच या खालच्या स्तरातील कुटुंबावर पगडा असावा. या समजासाठी कोण जबाबदार आहे? ते दूर करण्याची जबाबदारी कोणाची? मुलगा होण्यासाठी पुरुषाचा “वाय” गुणसूत्र घेऊन येणारा शुक्रजंतू आवश्यक असतो, हे सर्वसामान्यांना कोण पटवून देणार? स्त्रीअर्भकाच्या हत्येसाठी त्या जन्मदात्या आईला जबाबदार धरण्यापूर्वी आपण या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत.
घसरणारा जन्मदर
या अशा घटना अंगावर शहारे आणणाऱ्या असल्या, तरी आपण चर्चा करतो आणि आपणच आपल्या मनात त्या मारूनही टाकतो. जन्मलेल्या मुलींना मारून टाकणं, गर्भातल्या मुलींना मारून टाकणं हे इतकं स्वाभाविक झालंय का? पुरुषप्रधान संस्कृतीच्या मानसिकतेने आपल्या मनावर इतका मोठा पगडा निर्माण केला आहे की, ती मानसिकता अंधपणे स्वीकारून आपण जगतोय? कदाचित बहिरेही झालोय आपण. इतके बहिरे की, त्या गर्भातला आक्रोश तो गर्भधारण करणाऱ्या आईपर्यंतही पोहोचत नाही. नवजात मुलीला दुधाच्या मोठ्या भांड्यामध्ये बुडवून मारण्याची पद्धत आजही आपल्या देशात अनेक ठिकाणी सुरू आहे. काही ठिकाणी तिला अफू खायला देतात. त्यामुळे साधारणपणे तीस मिनिटांत तिचा जीव गुदमरतो आणि मृत्यू ओढवतो. काही ठिकाणी कोरड्या विहिरींमध्येही स्त्रीअर्भकांना फेकून दिलं जातं. हे फक्त टीव्ही सिरियल्समध्ये घडत नाही, तर वास्तव आहे. परिणामी, मुलींचा जन्मदर घसरतोय.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास, स्त्रीकडे 'एक्स” क्रोमोजोम्स असतात आणि त्यांचा संयोग झाल्यानंतर येणारं बाळ मुलगा किंवा मुलगी हे निश्चित होतं. जर पुरुषांकडून आलेल्या “वाय” गुणसूत्र असलेल्या शुक्रजंतूमुळे स्त्रीबीज फलित झालं, तर मुलाचा गर्भ निर्माण होतो. यावरून वैद्यकीयदृष्ट्या स्पष्ट होतं की, मुलीच्या जन्माला स्त्री जबाबदार नसून, पुरुषच जबाबदार आहे. तरीही आजचा समाजही स्त्रीलाच दोष देतो. हे विज्ञान समाजाला पटवून देणं गरजेचं आहे.
कठोर पावलं उचला
आजही कित्येक ठिकाणी लपून हुंडा घेतला जातो. परिणामी, हुंडा द्यावा लागणार म्हणून मुलींचा जन्मच नाकारला जातोय. हुंडा प्रथेविरुद्ध समाज किंवा शासन जोपर्यंत कठोर पाऊल उचलत नाही, तोपर्यंत स्त्रीभ्रूण हत्या होत राहणार. त्यासाठी असे करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धाड घालायला हवी, संबंधित डॉक्टरांवर गुन्हे नोंदवायला हवेत आणि मोठमोठे विचारवंत बोलावून व्याख्याने आयोजित करून समाजाला जागृत करायला हवं. तरच स्त्रीभ्रूण हत्या थांबू शकेल आणि समाजाची मानसिकताही बदलेल. अर्थात, हुंड्याची भीती त्यांच्या मनात राहणार नाही.
शासनाच्या नियमांप्रमाणे “हम दो, हमारे दो” मग तो मुलगा असो किंवा मुलगी, हा विचार समाजमनात रुजू लागेल. “वंशाचा दिवा" या स्वार्थी प्रवृत्तीतून आलेल्या समस्या आपोआप नष्ट होतील. स्त्रीभ्रूण हत्येमुळे मुलींच्या घटत्या गुणोत्तराकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर मुलींचा जगण्याचा हक्क नाकारण्याच्या गुन्ह्याबरोबर बलात्कार, लग्नासाठी मुलीचं अपहरण या गुन्ह्यांचंही प्रमाण वाढेल. त्याशिवाय लग्नासाठी मुलीच नसल्याने अविवाहित राहिलेल्या मुलांचं प्रमाणही वाढेल. म्हणूनच ज्याप्रमाणे महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचे इतर-अधिकार संघर्ष करून मिळवले, त्या पद्धतीने त्या जन्मण्याचा नाकारला जाणारा अधिकारही संघर्ष करून मिळवतील अशी आशा आहे. तिचा ठाम निर्णय हा तिच्या घरातल्यांचेही आचारविचार बदलायला कारणीभूत ठरू शकतो, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. संघर्ष यशस्वी व्हायला काही वेळ जाईल. तो काही प्रमाणात कठीणही आहे; पण अशक्य नाही.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.