देवाच्या दारात कसली असमानता ?
शनिशिंगणापूर येथील चौथ-यावर महिलांनी दर्शन घेतले. या विषयावरून उगाचच राईचा पर्वत केला जात आहे. पूर्वी मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना बाजूला बसवले जात होते. आज मात्र स्त्रिया तेवढे पाळताना दिसत नाहीत. या चार दिवसांच्या काळात स्त्रियांनी सर्व कामे केलेली घरच्यांना चालतात, पण देवाचे दर्शन घ्यायचे नाही, हा अन्याय महिलांनी का सहन करायचा? घरातील एकही पुरुष या काळात ‘मी घरची कामे करतो’ असे म्हणत नाही. मासिक पाळीने स्त्रीला मातृत्व मिळते, तिचे मातृत्व मंगल आहे, तर मासिक पाळी अमंगल कशी होऊ शकते. स्त्रीची इच्छा असेल, तर तिने देवाचे दर्शन घ्यावे किंवा घेऊ नये, हा निर्णय तिचा तिला घेऊ द्या. आपण २१व्या शतकात वावरत आहोत, असे अभिमानाने सांगणारे आपणच लिंगभेद, जातीयवाद यासारखी अंधश्रद्धेची झापडे डोळ्यावर बांधून आहोत. एकीकडे स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या आणि महिलांना देवळाच्या गाभा-यात प्रवेश बंदी करायची, हा न्याय योग्य नव्हे.
स्त्रीयांनाही पुरुषांइतकाच समान दर्जा मिळाला पाहिजे
आपल्या समाजाने पुरातन काळापासून देवी-देवतांची मनोभावे पूजा केली आहे. ज्या स्त्रीची देवी म्हणून पूजा अर्चा केली आहे, त्याच स्त्रीला केवळ परंपरा आणि रूढी याचे कारण देत काही ठिका
णी पूजेसाठी प्रवेश नाकारणे म्हणजे पुरुष संस्कृतीला खतपाणी घालण्यासारखे आहे. महिला आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. पोलीस खाते, सेना, शैक्षणिक, सामाजिक, खेळ वा सांस्कृतिक असो सर्वच क्षेत्रात त्यांनी कर्तव्य सिद्ध केले आहे. केवळ पुरुषप्रधान संस्कृती, कर्मठ आणि बुरसट विचारसरणी, अनिष्ट प्रथा यामुळे समाजाच्या विविध घटकांत स्त्रीयांनाही पुरुषांइतकाच समान दर्जा मिळाला पाहिजे. ज्या ठिकाणी महिलांना मंदिरात प्रवेश बंदी आहे त्या ठिकाणी आज २१व्या शतकात महिलांना प्रवेश मिळाल्यास हे पाऊल स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने नक्कीच सकारात्मक ठरेल. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात महिला भटजींची नेमणूक होत आहे, तर काही मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही. हा कोणता न्याय?
विचारमंथनाची गरज
पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी-परंपरा आजही तशाच चालू आहेत. त्यात महिलांमध्येच मंदिर प्रवेशाबाबत एकमत दिसून येत नाही. एकीकडे आपण स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो आणि महिलांना मंदिरात प्रवेश नाकारतो हे न पटण्यासारखे आहे. आपण समस्त मानव जातीने हे नियम बनवले आहेत. देवाने किंवा कोणत्याही धर्मग्रंथाने याबाबतीत महिलांना प्रवेश नको, असे कुठेही म्हटले नाही. हा प्रश्न चर्चेद्वारे आपण सोडवू शकतो. त्या तेथील देवस्थानचा इतिहास, पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा कुठेही खंडित करण्यास आपणच तयार नाही. महिलांना समान वागणूकही नक्कीच मिळायला हवी. ही सर्वच पुरुषांची जबाबदारी आहे. या बाबतीत नक्कीच सकारात्मक विचार करायला हवा. जुन्या परंपरागत चालत आलेल्या रूढी-परंपरा बदलण्यासाठी विचारमंथनाची गरज आहे.
आजच्या युगातील ही दुर्दैवी बाब
स्त्री-पुरुष समानतेचे वारे पाश्चात्त्य देशाकडून वाहत आले. ते इथल्या धर्ममारतडांच्या व सनातन्यांच्या कानात शिवलेच नाहीत. इतक्या वर्षानी देखील या समानतेचा अंगिकार इथे न व्हावा हे त्या शनिमहाराजालाही पडलेले कोडेच म्हणावे लागेल! आमच्याकडे कायद्याने सर्वकाही कागदावर मिळालेय, पण प्रत्यक्षात समानता, जातीयता या बाबींना धार्मिक कुंपनात अडकवून ठेवले आहे. या सर्व बाबी मनकी बातने संकुचित करून त्याचा न संपणारा साठा शनिशिंगणापूर जशा मंदिराच्या रूपाने साक्षात उभा असलेला पाहतोय.
देवाच्या दारात कसली असमानता ?
देवाला सारे जण एकच आहेत. देवाच्या दारात कसली असमानता मानायची? महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी उभे राहिले पाहिजे. साने गुरुजींनी अस्पृशांना पांडुरंगाचे दर्शन खुले केले होते. तेव्हा त्यांनाही अनेक संघर्ष करावे लागले. पंरतु मंदिर महिला प्रवेश बंदी कोणताही वाद न होता उठली पाहिजे. कारण महिलांचा हक्क आहे. हा हक्क शांततेच्या मार्गाने मिळाला पाहिजे. संविधानाने दिलेले हक्क कोणतेही वाद न होता महिलांना मिळायला पाहिजेत.
बदलत्या काळानुसार आवश्यक बदल व्हायलाच हवेत
बदलत्या काळानुरूप सर्व गोष्टी बदलत आहेत आणि ते गरजेचेही आहे. पण या सर्व बदलांमध्ये धर्म, परंपरा यामध्ये अपेक्षित किंवा म्हणावा तसा बदल झालेला नाही. पूर्वापार चालू असलेल्या परंपरा, संस्कृतीचे जतन झाले पाहिजे यात काही वाद नाही. पण ज्या परंपरा, रूढींमुळे एखाद्या व्यक्तीचा मग ती व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष, त्या व्यक्तीचा हक्क हिरावला जात असेल तर त्या निश्चितच बदलायला हव्यात. त्यामुळे शनिशिंगणापूरमधील शनी चौथ-यावर महिलांना असलेली बंदी निश्चितच हटवायला हवी. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोप-यांत महिला मनोभावे देवाची पूजा- अर्चा करतात. अशा परिस्थितीत परंपरा, रूढीचे कारण देत त्यांना त्यांच्या धार्मिक भावना व्यक्त करण्यापासून अडवणे चुकीचे आहे.
आपल्या देशात विविध मंदिरात महिलांना गाभाऱ्यात जाऊन देवाचे दर्शन घेण्यास बंदी आहे. महिलांवर असलेला धार्मिक विषयांचा पगडा आजही तितकाच भक्कम आहे. नवीन पिढीने धार्मिक विषय, पूर्वीपासून ऐकत आलेल्या गोश्टी बाजूला सारून, सद्यस्थितीचा अभ्यास करून प्रत्येकाने याचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच काही राजघराण्यांतील महिलांना मंदिरात सहज दर्शन घेता येते. त्याचवेळी सर्वसामान्य घरातील महिलांना दर्शन नाकारले जाते. कायद्याने महिलांना समान हक्क मिळवून दिला आहे. समाज परिवर्तनामुळे हे शक्य झाले आहे असे नाही. मनातून जोपर्यंत बदल होत नाहीत, तोपर्यंत सर्वच अशक्य आहे. महिलांनी देवाचा प्रसाद, नैवेद्याचे व पूजेचे ताट इत्यादी गोष्टींची तयारी केलेली चालते. पण, तिला गाभा-यात जाऊन दर्शन घेता येत नाही. कारण म्हणे, महिलांनी दर्शन घेतले तर मंदिराचे पावित्र्य भंग पावते. ही कल्पनाच मुळी चुकीची आहे. त्यासाठी स्त्री-पुरूष असा भेदभाव बंद व्हायला हवा. न्यायालयाने मंदिर गाभारा दर्शन महिलांसाठी खुले करा असे सांगितले असले तरी प्रत्येकाने आपापल्या मनाचा गाभारा स्वच्छ करायला हवा. काळानुसार धार्मिक नियमांमध्येही शिथिलता आणणे गरजेचे आहे. स्त्री-पुरूष हा भेदभाव मना-मनातून नश्ट झाला पाहिजे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.