Ticker

10/recent/ticker-posts

पाण्याची साठवण, पुनर्वापर गरजेचा

आपल्याकडे मुबलक पाणी असतानाही पाण्याची चिंता आपल्याला का भेडसावते. तर ७५ टक्के पाणी वाया जाते म्हणून... याचा अर्थ साठवणूकीचे आपले भांडे खूप लहान आहे. त्यासाठी पाणी साठवण्याच्या योजना वाढवल्या गेल्या पाहिजेत.

-दादासाहेब येंधे


उन्हाळा सुरू झाल्यावर पाण्याची गरज वाढते. अनेक भागात एक दिवसाआड पाणी येते. अनेक ठिकाणी नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतो. या स्थितीत आपल्या दैनंदिन कामांमध्ये पाण्याचा वापर कसा कमी करता येईल हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे. मुंबई शहराची वाढती लोकसंख्या व शहराला होणारा पाणीपुरवठा याची गणिते झपाट्याने बदलत आहेत. त्यानुसार महापालिकानेही पाणी वितरणाच्या नियोजनात बदल करणे गरजेचे आहे.


मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असतानाच रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अंमलबजावणीकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मोठ्या बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सक्तीची असली तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. पाण्याच्या तुटवड्यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा सर्वात उत्तम पर्याय आहे. मात्र, पाऊस कमी झाल्याने धरणात कमी पाणी जमा झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालिकेला रेन वॉटर हार्वेस्टिंगची आठवण येते. पाऊस चांगला पडला की या योजनेचा विसर पालिका व मुंबईकर अशा दोघांनाही पडतो. परिणामी, धरणांत पाणी कमी असल्याचे कारण पुढे करत महापालिका मुंबईत पाणी कपात करते.


जगात सर्वात जास्त पाऊस भारतात पडतो. भारतात चेरापुंजी येथे सर्वाधिक १३ हजार ५०० मिलिमीटर पाऊस पडतो. तर राजस्थानात केवळ २५० मिमी पाऊस पडतो. महाराष्ट्रात लातूर, नगर या ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात पडतो. याउलट कोकणात मुसळधार पडतो. अनेक भागात मुबलक पाऊस होऊनही पावसाळा गेला की पाण्याची चणचण भासते. याचे मुख्य कारण म्हणजे पाणी साठवण्याच्या योजनांचा अभाव.


एकूण भूभाग त्यावर पडणारा पाऊस, साठणारे पाणी, लोकांची गरज असे सगळे गणित ते पाहता पडणाऱ्या पावसाच्या २५ टक्के पाण्याचा वापर होतो. तर ७५ टक्के पाणी नदी मार्गे समुद्रात पुन्हा वाहून जाते. तलावातील ५० टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते. हे थांबवणे गरजेचे आहे. जैतापूर येथे पाण्यासाठी तलाव बांधले. त्यावर तरंग ते सोलर पॅनल बसवले गेले. वीजेची निर्मिती झाली. पॅनल ठेवल्याने तलावतील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात कमी झाले.


मुंबईच्या तलावांचा विचार करता या तलावांमध्ये पुरेसे पाणी असते याचे श्रेय महापालिकेला देणे गरजेचे आहे. पाणी साठवण्याच्या कमी झालेल्या जागा हा खरेतर चिंतनाचा विषय आहे. आज शहरात कोठेही मातीचा रस्ता दिसत नाही किंवा रस्त्याच्या दुतर्फा मातीचा पट्टा दिसत नाही. साहजिकच पाणी जमिनीत मुरत नाही. तसेच सध्या सगळीकडे सिमेंटचा रस्ता बनवण्याचे काम होताना दिसत आहे. परिणामी, पाणी मुरायला जागा राहणार नाही. पूर्वी जमिनीखाली साठवून राहिलेले पाणी आसपासच्या विहिरींमध्ये झिरपायचे आणि पाणी उपलब्ध व्हायचे आता तसे होत नाही. ही परिस्थिती फक्त आपल्याकडे आहे असे नाही तर मध्यपूर्वेकडील काही देशांमध्येही पाण्याचा प्रचंड उपसा झालेला आहे. लोकांनी जमिनीखालील पाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर ओढले आहे की, जमिनीखाली पाणी कमी होऊन जमीन खचली आहे. पाण्याने व्यापलेली मोकळी जमीन एकदा का खचली की ती पुन्हा पूर्ववत होत नाही.


आपल्याकडे मुबलक पाणी असतानाही पाण्याची चिंता आपल्याला का भेडसावते. तर ७५ टक्के पाणी वाया जाते म्हणून... याचा अर्थ साठवणूकीचे आपले भांडे खूप लहान आहे. त्यासाठी पाणी साठवण्याच्या योजना वाढवल्या गेल्या पाहिजेत. मुंबईत काही ठिकाणी २४ तास पाण्याचा प्रयोग सुरू आहे. २४ तास पाण्याचा एक फायदा म्हणजे आपण पाणी साठवून ठेवत नाही. इतर वेळेस आपण पाणी साठवून ठेवतो. दुसऱ्या दिवशी पाणी शिळे झाले असे समजून फेकून देतो. त्यातून पाण्याची नासाडी होते. तीन-चार तास पाणी असेल तर वापर मर्यादित होईल. पाण्याच्या बचतीसाठी फार मोठे काही करण्याची गरज नाही. आपल्या गरजा बदलल्या तरी खूप होईल. नव्याने उभ्या राहणाऱ्या बिल्डिंगमध्ये अंघोळीच्या पाण्याच्या पुनर्वापर करून ते पाणी शौचालयासाठी वापरता येऊ शकते. अशा अनेक लहान-सहान प्रयोगांमधून आपण पाण्याची सहज बचत करू शकतो. पावसाळ्यात पाऊस किती पडेल हे सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे सांगणे कठीण आहे. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या इमारतीत अथवा संकुलात पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणे गरजेचे आहे आणि ती जबाबदारी त्या त्या संकुलाची आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. भोगवाटा प्रमाणपत्र दिल्यानंतर हा प्रकल्प इमारतीत कार्यरत ठेवण्याची जबाबदारी विकासक, मालक आणि रहिवाशांची असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते; मात्र नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारती असो, नवीन बांधकाम, कुठेही रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवताना दिसून येत नाही.‌ त्यामुळे काळाची गरज लक्षात घेता रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी आणि दुर्लक्ष करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला तर अन् तरंच मुंबईतील पाणीप्रश्न थोड्याफार प्रमाणात सोडवणे शक्य होईल.


भविष्यात पाणीकपातीचा सामना वारंवार करावा लागू शकतो. त्यामुळे आतापासून पिण्याव्यतिरिक्त पाण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणे गरजेचे असून भविष्यात हा प्रकल्प राबवला तर मुंबईतील पाणीप्रश्नावर काही प्रमाणात दिलासा मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या