मान्सूनचा पाऊस लहरी असला तरी गाण्यातला पाऊस मात्र लाडिक आहे. दर वेळी वेगळ्या आनंदाची बरसात करणारी पाऊसगाणी म्हणूनच तर पुन:पुन्हा ऐकावीशी, गुणगुणाविशी वाटतात…
-दादासाहेब येंधे
कधी रिमझिम, कधी मुसळधार, कधी वादळवाऱ्यासह कोसळणारा पाऊस कितीतरी आपण अनुभवत असतो. प्रत्येकाच्या मनात दडलेला पाऊस निराळा. या पावसावर जेव्हा गाण्याचे शब्द लिहायचे असतात, तेव्हा गीतकारांच्या, कवींच्या प्रतिभेलाही बहर येतो. चिंब भिजलेले शब्द घेऊन त्यातून साकारलेली अशी शेकडो पाऊसगाणी चित्रपटांमध्ये, अल्बममध्ये आली आहेत. अनेक गीतकरांना, कवींना तो जसा दिसला, भावला तसा त्यांनी तो त्यांनी शब्दबद्ध केला. अशाच काही गाजलेल्या पाऊस गाण्यांच्या मराठी चित्रपटांतील गाण्यांनी जागवलेल्या आठवणी...

'एका पावसात दोघांनी भिजायचं...' हे या लेखाचे हेडिंग. १९८६ ला प्रदर्शित झालेल्या 'तुझ्या वाचून करमेना, या चित्रपटातील आहे. अलका कुबल आणि अशोक सराफ या चित्रपटातील प्रमुख कलाकार होते. अलका कुबलच्या चित्रपटातील गाजलेले हे पाऊस गीत. यात अलका कुबल ऑर्केस्ट्रा मधील एक गायिका असते. ती आपला पती अशोक सराफ बरोबर हे पावसाचे गाणे गाते. 'गुज ओठांनी ओठांना सांगायचं..., एका पावसात दोघांनी भिजायचं' हे गाणे उषा मंगेशकर यांनी गायलेले असून सुहासचंद्र कुलकर्णी यांचे या गाण्याला संगीत लाभले आहे. पावसातील अशोक सराफ आणि अलका कुबल चे गाणे सहज सुंदर प्रणय गीत आहे. मराठी संयमी मर्यादा राखून कुठेही मर्यादा भंग न करणारे असे सुरेख हे गाणे आहे. पाण्यात भिजण्यासाठी अलका कुबलला या चित्रपटात साडीची गरज नव्हती. तर चक्क पंजाबी ड्रेस मधील अलका कुबल आपल्याला बघायला मिळते. प्रचंड लोकप्रिय झालेले मराठीतील हे चित्रगीत आहे. गाण्याच्या चालीतही विविधता आणि शब्दांना न्याय देण्याचे काम या गीताने केलेले आहे.

याप्रमाणेच १९७७ साली 'हा खेळ सावल्यांचा' या चित्रपटातील पाऊस गीत हे वेगळ्या धाटणीचे आहे असे म्हणावे लागेल. 'आला आला वारा संगे पावसाच्या धारा..' हे पाऊस गीत सदाबहार मराठी गीत म्हणून ओळखले जात होते. शेतात काम करणाऱ्या महिलांचे हे गाणे माहेरवाशीन आणि सासुरवाशीणीची लगबग दाखवणारे ठेकेबाज हे गाणे आहे. सुधीर मोघ्यांच्या या पाऊस गीताला हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले असून अशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांनी हे गीत गायले आहे.
मराठी चित्रपट संस्थेतील वेगळ्या धाटणीचा अभिनेता निर्माता दिग्दर्शक म्हणजेच दादा कोंडके. हिट गाणी हे दादांच्या चित्रपटाचे मोठे स्थान होते. त्यांचेच असे एक पाऊस गीत म्हणजे 'वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ' या गीताला पावसाचे दृश्य कमी आणि इतर बाबी जास्त असल्या तरी पावसाच्या गीतात आणि शेतीच्या वर्णनाचे या हे धमाल गीत आहे असे म्हणावे लागेल. तसेच दादा कोंडके यांच्या पहिल्याच १९७१ साली आलेल्या 'सोंगाड्या' चित्रपटातील एक लावणी पावसावरची आहे. 'अहो राया मला पावसात नेऊ नका..' ही पुष्पा पागधरे यांनी गायलेली लावणी पावसावरचीच आहे. या गीताला राम कदम यांचे सुंदर असे संगीत लाभले आहे.

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.