Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मानव बिबट्या-संघर्ष

बिबट्या हे दिवसभर उसाच्या शेतीमध्ये आडोशाला लपून बसतात आणि रात्री अपरात्री नागरी वस्तीत येऊन हल्ले करून जीवितहानी करताना दिसत आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यात कित्येक लहान मुलांचे, नागरिकांचे, महिलांचे, दुभत्या जनावरांचे, पाळीव कुत्र्यांचे बळी गेलेले आहेत. रात्री अपरात्री ग्रामीण भागात एकट्याला घराबाहेर पडण्याची सोय राहिली नाही. 

-दादासाहेब येंधे

महाराष्ट्रात सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे राज्यातील विविध ग्रामीण भागांमध्ये माणूस तारांच्या कुंपणात स्वतःला बंदिस्त करून घेत आहे तर बिबट्या गावभर मुक्त संचार करताना दिसून येत आहे.

महाराष्ट्रात सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे आणि सर्वत्र वाढलेली उसाची शेती हे बिबट्यासाठी लपण्याची महत्त्वाची जागा आहे. दरम्यान यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बऱ्याच वेळेस ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांवर देखील बिबट्याकडून हल्ला झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. बिबट्यांची संख्या एक हजार पेक्षा जास्त असल्याचे वन विभागाकडील आकडेवारीतून दिसून येते.पण, गाव खेड्यातील शेतकरी तर यापेक्षाही जास्त असेल असे म्हणतात.

पुणे जिल्ह्यात जुन्नर, नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, आंबेगाव, शिरूर, खेड या भागांत बिबट्यांचा मुक्त संचार दिसून येत आहे तसेच लोणी काळभोर परिसरातही बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे त्यामुळे बिबट्यांची एकूणच वाढलेली संख्या यावरून स्पष्ट होत आहे.

जुन्नर येथे वन विभागाने बिबट्यांसाठी 'रेस्क्यू सेंटर' सुरू केले आहे. परंतु त्याचीदेखील क्षमता संपली असून पकडून आणलेले बिबटे ज्या पिंजऱ्यातून आणले जात आहे त्या पिंजऱ्यातच त्यांना ठेवावे लागत असल्याने नवीन बिबटे पकडण्यासाठी आणखी पिंजरे कुठून आणायचे असा प्रश्न वन विभागासमोर उभा आहे. सध्या जंगल क्षेत्र कमी कमी होत चालल्यामुळे बिबट्या मानवी वस्तीत येत आहे हे कारण जरी खरे असले तरी, बिबट्याला त्याची शिकार सहज मिळण्याची कला अवगत झाली आहे असे म्हणावे लागेल. बिबट्या सध्या मानवी वस्ती शेजारी असलेल्या शेतात राहत असल्यामुळे त्यांना माणसाचा वावर हा सहज जाणवणारा आहे. त्यामुळे बिबटे हे भटके कुत्री, घरांच्या समोर असलेल्या गोठ्यांमधील गाई-म्हशी, शेळ्या, मेंढ्या आदी जनावरांना आपले भक्ष्य बनवत सुटले आहेत. गाई-म्हशी, शेळ्या, मेंढ्या अशा दुभत्या जनावरांची भक्ष्यस्थानी पडल्याची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे जिल्ह्यातील पिंपरखेड गावात बिबट्यांचा धोका इतका वाढला आहे की, शेतकरी आता शेती करताना सुरक्षेसाठी स्वतःच्या  गळ्यामध्ये काटेरी खिळ्यांचे बेल्ट घालून शेती करताना दिसत आहे. गावकऱ्यांना असे वाटते की या अनोख्या उपायामुळे बिबट्यांच्या हल्ल्यापासून आपला बचाव होऊ शकतो. गावातील रहिवाशी विठ्ठल रंगनाथ जाधव यांनी सांगितले की, आम्ही हा बेल्ट गळ्यात घालतो कारण बिबट्या कुठेही अचानक हल्ला करू शकतो. शेती आमची उपजीविका आहे. त्यामुळे भीतीने घरामध्ये बसून राहणे आम्हाला शक्य नाही. माझी आई सकाळी सहा वाजता गुरांना चालण्यासाठी गेली असता बिबट्याने तिला उसाच्या शेतातून एक किलोमीटर ओढत नेले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हणून आम्ही घराबाहेर पडताना गळ्यात या काटेरी बेल्टचा वापर करतो.

बिबट्या हे दिवसभर उसाच्या शेतीमध्ये आडोशाला लपून बसतात आणि रात्री अपरात्री नागरी वस्तीत येऊन हल्ले करून जीवितहानी करताना दिसत आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यात कित्येक लहान मुलांचे, नागरिकांचे, महिलांचे, दुभत्या जनावरांचे, पाळीव कुत्र्यांचे बळी गेलेले आहेत. रात्री अपरात्री ग्रामीण भागात एकट्याला घराबाहेर पडण्याची सोय राहिली नाही. बाईकवरून जाताना देखील बिबटे आडोशाला लपून राहून मागून बाईकवर उडी मारताना दिसून येत आहेत. गाई-म्हशी, शेळ्या, मेंढ्या आदी जनावरे घरात बांधता येत नाहीत. बाहेर गोठ्यातच त्यांना बांधावे लागते. जनावरांचे मालक रात्रभर जनावरांजवळ थांबून शकत नाही. जनावरे मोकळी सोडावी तर शेतातील पीक खातात. यामुळे शेतीचे नुकसान होत असल्यामुळे ती बांधावीच लागतात. बिबट्या आला तर बांधलेल्या जनावरांना पळून देखील जाता येत नाही आणि प्रतिकारही करता येत नाही. परिणामी, तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतातील अनेक ठिकाणी पाण्याची मोटर चालू करण्यासाठी वीज पुरवठा नसल्यामुळे रात्री अपरात्री पिकास पाणी देण्यासाठी एकट्यालाच शेतात जावे लागते आणि शेतात थांबावे लागते. त्यामुळे प्रत्येक वेळेस सोबत म्हणून कोणाला घेऊनही जाता येत नाही. प्रत्येक शेतकऱ्याची शेती वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे एकत्र देखील थांबता येत नाही.

बिबट्याच्या दहशतीमुळे काही भागांत शाळा देखील वेगवेगळ्या वेळी भरवणे सुरू केले आहे. काही गावांमध्ये रात्री सात नंतर माणसे स्वतःला घरात किंवा ताराच्या कुंपणामध्ये कोंडून घेत आहेत. अशा घटना पाहता बिबट्या-मानव संघर्ष अटळ असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे असे वाटते. या संघर्षात 'वन्यप्राणी संरक्षण कायदा' भारतात अस्तित्वात असल्यामुळे बिबट्यांची हत्या करणे हा गुन्हा मानला जातो. या कायद्यामुळे मानव हतबल आहे. सरकार व वन खात्याकडूनच बिबट्यांवर प्रत्येक परिस्थितीत नियंत्रण आणणे गरजेचे आहे. सरकारने मानव-बिबट संघर्षावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Photo: google

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या