देशातील सर्वच राज्यातील महाविद्या लयांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात. मात्र, त्यातील क्वचितच एखादी उघडकीस येते. ज्यांच्यावर रॅगिंग झालेले असते. कदाचित अपमानाच्या भावनेने असेल किंवा भीतीने असेल त्याबाबत कोणाशीही बोलू शकत नाही.
-दादासाहेब येंधे
महाविद्यालयातील रॅगिंगचे वाढते प्रकार थांबवण्यासाठी समित्या स्थापन कराव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. या संदर्भात न्यायालयाने कठोर शब्दांत टिप्पणी देखील केली आहे. यापूर्वीही रॅगिंगच्या संदर्भात अशा प्रकारचे आदेश राज्य सरकारांना तसेच शिक्षण संस्था महाविद्यालयांना दिले गेले आहेत. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी किती होते हे रॅगिंगचा एखादा बळी गेल्यानंतरच लक्षात येते.
महाविद्यालयांपेक्षा विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहांमध्ये होणाऱ्या रॅगिंगचे प्रमाण खूप जास्त आहे. वस्तीगृहातील सीनियर विद्यार्थी नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले रूम टॉयलेट साफ करायला लावतात, आपले कपडे धुवायला लावतात, त्यांच्या वाट्याचे अन्न संपवून टाकतात, त्यांना जबरदस्तीने दारू पाजतात. गेल्या काही वर्षात रॅगिंगच्या नावाने केल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाच्या देखील अनेक घटना उघडतीस आल्या आहेत. सहाजिकच हे प्रकार वस्तीगृहांमध्येच मोठ्या प्रमाणात आढळतात. विद्यार्थ्यांना मूत्रप्राशन करायला लावणे, बळजबरीने त्यांची अंतर्वस्त्रे उतरवणे, त्यांच्याशी लैंगिक चाळे करणे. एक प्रकारे समलिंगी बलात्कार प्रकारांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची काय अवस्था होत असेल याचा तर विचार न केलेलाच बरा.
रॅगिंग चे प्रकार हे विशेषतः अकरावीला किंवा पहिल्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या मुलांसोबत घडतात. त्यापर्यंत त्यांनी पाहिलेले जागे फारच मर्यादित आणि सुरक्षित असते. या नव्या जगाविषयी, नवीन कॉलेज विषयी त्यांच्या मनात फार उत्सुकता असते. त्याचवेळी भीतीची भावनाही. असल्या रॅगिंग विषयी किमान ऐकलेले असते. पण, त्याला कसे सामोरे जायचे हे त्यांना माहीत नसते. नवीन असल्यामुळे स्वतःचा ग्रुप नसतो, संरक्षण नसते, प्रतिकार करण्याची हिम्मत नसते, रॅगिंगच्या या विभत्स प्रकारांना सामोरे गेल्यानंतर उमलत्या वयातील या मुलांच्या मनावर खोल परिणाम होतो. अपमानाची, शरमेची भावना मनात खोलवर रुतून बसते. रॅगिंगचा प्रकार जेवढा जास्त विचित्र, किळसवाणा तेवढा मानसिक आघात जास्त. या त्रासाविषयी कॉलेज व्यवस्थापन किंवा वसतिगृह अधिक्षकांसमोर तोंड न उघडण्याची धमकी देखील दिलेली असते. तसा प्रयत्न केल्यास अधिकच त्रास सहन करावा लागतो. घरापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तर हे सगळे अगदीच कठीण असते. त्रास अगदीच असह्य झाला तर कॉलेज किंवा वसतिगृह सोडून जायचे. टोकाचा पर्याय म्हणजे आत्महत्या. अनेक मुले रॅगिंगमुळे आपले मानसिक संतुलन हरवून बसतात. तर काही भीतीने शिक्षणाचा अर्धवट सोडून देतात. त्या कटू अपमानाचे सावट त्यांच्या भावी आयुष्यावरही कायम असते.
अनेक महाविद्यालयांमध्ये रॅगिंगच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जाते. एखादे प्रकरण उघडकीस आले तर प्रतिष्ठा जपण्यासाठी किंवा दबावाखाली ते दडपून टाकले जाते. मोजक्याच महाविद्यालयात रॅगिंग रोखण्यासाठी सीसीटीव्ही लावण्याचा पर्याय निवडला जातो. न्यायालयाने रॅगिंग बाबत मुलांची मानसिकता बदलण्यासाठी व मद्यप्राशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाचा पर्यायही सुचवला आहे आणि तो अधिक संयुक्तिक आहे. रॅगिंगला विरोध असणाऱ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनीही याबाबत ठोस पाऊल उचलले पाहिजे.
*रॅगिंगचे बळी न होण्यासाठी आत्मविश्वास बाळगा.
*कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसात लक्ष वेधून घेणारे कपडे घालणे टाळा.
*नवीन मित्र, मैत्रिणी मिळवा.
*एकट्याने न फिरता गट करून फिरा.
*आपल्याला किंवा अन्य मित्रांना कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केल्यास प्राध्यापक, प्राचार्य, वस्तीगृह अधीक्षक किंवा पोलिसांना त्वरित सांगा.
*पालकांच्या संपर्कात रहा.
रॅगिंगच्या भीतीने दबून न जाता नवीन आयुष्याला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी या सूचनांचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल.






0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.