१२/७/१९

मी तू पण गेले वाया, भेटता पंढरीच्या राया

मी तू पण गेले वाया, भेटता पंढरीच्या राया
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
आषाढी वारी म्हणजे, चैतन्याचा महामेळा, वारी म्हणजे विठूरायाच्या दर्शनाची लागलेली ओढ. वारी म्हणजे अमाप उत्साह.... 'ज्ञानोबा, माऊली तुकाराम... बोला पुंडलिका वरदे हरी विठठल. श्री ज्ञानदेव तुकाराम' या जयघोषाने सगळा आसमंत दुमदुमून निघतो. विठूरायाच्या दर्शनासाठी आतूर झालेला वारकरी आषाढी एकादशीला भक्तीच्या जल्लोषात न्हाऊन निघतो आणि वर्षभरासाठीची अखंड ऊर्जा आपल्यासोबत घेऊन निघतो.
महिनाभर आधीपासूनच तयारी झालेला हा सोहळा म्हणजे भक्तीचा महापूरच असतो. २१-२२ दिवसांचा प्रवास करून आल्यानंतर विठठलाच्या दर्शनाने या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहायला मिळणं म्हणजे परमोच्च आनंद मिळाल्याचा भाव जसा मनात येतो. तशी ती अवस्था असते. 
भाग गेला क्षीण गेला।
अवघा झाला आनंद।।
हीच त्यावेळी वारकऱ्यांची भावना असते. खरेतर आषाढी वारी आपल्यामध्ये असलेलं मीपण काढून टाकते. 'मी तू पण गेले वाया, भेटता पंढरीच्या राया' असं संतांनी म्हटलं आहे. वारी म्हणजे जीवनातल्या व्यावहारिक शिक्षणाची खरी पंढरी आहे. इथं वावरताना आपल्यातली सांघिक भावना जागृत होते. त्याचा सहवास पुढे वर्षभर आपल्यात राहतो. त्यामुळे वास्तवातलं जीवन जगत असताना आपल्याला अनेक गोष्टीत याचा वापर करताना कितीतरी फायदा होतो. पांडुरंगाची भेट आणि वारीचा सहवास यातून जीवनातलं अमूल्य शिक्षण आणि शिदोरी आपल्या पदरात पडते. एवढंच नाही तर, एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची सवय आपल्याला जडते. वारीत ८० वर्षांच्या आजी-आजोबांपासून ते ५ वर्षांच्या मुलांपर्यंत सगळेचजण एकमेकांना 'माऊली' म्हणतात. कारण, वारकरी एकमेकांना माऊलीच्या रूपातच पाहतो आणि मुखातून माऊलीचंच नाव घेतो. यातून आपापसातली उच्च-नीचता गळून पडते. वारी तुमच्या आमच्यातला भेदभाव नष्ट करते.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि विशेष म्हणजे पाश्चिमात्यांनासुद्धा या पंढरीच्या विठुरायाने वेड लावले आहे. समस्त भारतातील विविध संप्रदायापेक्षा वारकरी संप्रदाय निश्चितच वेगळा ठरतो. भक्ती हे अंतिम ध्येय या संप्रदायाने मानले आहे. ज्ञानयुक्त व सदाचरणयुक्त भक्ती हे या संप्रदायाचे वैषिश्टय आहे. त्यामुळे वारीचं व ववारकऱ्यांचे असाधारणत्व सहजच प्रत्ययास येते. विठूनामाचा गजर करत लहान थोर वारकरी आषाढात पालख्या, दिंडयासहित पंढरीच्या दिशेने धाव घेतात. 
विठठल विठठल गरजत ।
जाऊ पंढरीत टाळ मृदुंग वाजवीत ।
न्हाऊ गाऊ चंद्रभागेत
ठेवूनिया कर कटावर ।
वाट पाहतो माझा पांडुरंग
कसा होईल हो विसर ।
सदा विठू नामात आम्ही दंग
अशा विलक्षण आंतरिक ओढीने वारकरी पंढरीची वाट चालतात. जणू हा भगवंत आपल्या भक्तीची आतुरतेने वाट पाहतोय. इतक्या उत्कटतेने हा वारकरी आपल्या लाडक्या देवतेच्या भेटीसाठी पंढरीत दाखल होतो. पालखी, रिंगण, झिम्मा, फुगडी इत्यादी खेळातून भक्तीची उधळण करीत त्यात समरस होतो. भौतिक सुखःदुखाचा विचार न करता भक्तीचा खेळ खेळतो. भेदाभेद भ्रम अमंगळ हे तो जाणतो. समत्वाची आणि समन्वयाची वारी घराघरात पोहचवितो. हा वारकरी साधासुधा नाही. तर 'देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो' अशी संत नामदेवांची दृढ भक्ती अनुसरणारा आहे आणि 'अहंकाराचा वारा न लागो राजसा' या वृत्तीने वर्तन करणारा आहे. 
आषाढी वारी म्हणजे भक्ती, शक्ती तृप्तीचा महोत्सव आहे. त्यात कुठेही डामडौल नाही. नटणं, मुरडणं नाही. सजणं-धजणं नाही. तुळशी, अबीर, बुक्का, गोपीचंद, लाहया व अंतःकरणयुक्त भक्ती इतकीच त्याची साधने आहेत. वारकरी संप्रदायातील भक्तीचा साधेपणा व सच्चेपणा अद्वितीय आनंदाची पर्वणी देणारा आहे. आणि हे सर्व देणारे संत वारकरी आहेत. पंढरीची वारी करणाÚया वारकऱ्यांची मुख्य ओळख म्हणजे तुळषीमाळ. ही माळ धारण करणे म्हणजे लाडक्या विठूरायाच्या नावानं गळयात घातलेलं मंगळसूत्र. वारकरी नित्य कपाळी गोपीचंदनाचा टिळा व बुक्का लावतो. हा टिळा म्हणजे विठुरायाच्या नावानं कपाळी रेखलेला सौभाग्यतिलक. वारकऱ्यांच्या खांद्यावर असलेली भगवी ध्वजा म्हणजे सदाचाराची आठवण देणारी सांस्कृतिक निषाणी. शरीरावर धारण केलेली ही सारी प्रतीकं, लक्षणं संस्कृतीची आठवण करून देणारी आहेत. अध्यात्मिक वारीत मनाच्या शिस्तीचं, व्यवस्थापनाचं मौलिक शिक्षण मिळतं. मनाच्या शिक्षणाच्या या संस्कारक्षम वाटेवर संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची भेट होते. तुकोबारायांच्या अभंगाच्या सहवासात जीवनातील वाटा पवित्र होऊन जातात. वारीच्या आध्यात्मिक वाटेवर सांस्कृतिक धनाचा खजिना हाती येतो. 'वाट धरिता हरिची। चिंता हारे संसाराची।' याची प्रचिती येते. जगावेगळया पंढरीच्या या आनंदवारीत आपल्या संस्कृतीचं थेट दर्षन घडतं. संस्कृतिमय, देवमय झालेल्या आपल्या मनात सांस्कृतिक लेण्याच्या दर्शनामुळे आत्मोद्धाराची वाट सापडते. 'अंतर्मुखी सदा सुखी' याचा अर्थ समजतो. जीवन ही आंतरिक तीर्थयात्रा बनून जाते. प्रत्येक मराठी माणसाने मनानं एकदा तरी वारीतील 'देवाच्या द्वारी' क्षणभर विसावा घेऊन, मुक्तीच्या आनंदाचा अनुभव घेऊन अध्यात्मिक जीवन सत्कारणी लावायला हवे.

वारीत सहभागी झालेल्या दिंड्या 


पंढरपुरात तुळशीच्या माळा विकणारी महिला वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची गर्दी 
पंढरपूरच्या वारीत प्रसाद विक्री 

वारकरी 

१/७/१९

रॅगिंगला आळा घाला

-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmail.com)

मुंबईतील नायर रूग्णालयात तीन वरिष्ठ महिला डाॅक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून डाॅ. पायल तडवी या पदव्युत्तर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. तारूण्याला पोखरून टाकणारी ही भीषण कीड किती वाढत चालली आहेयाचे ते द्योतक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
नायर रूग्णालयातील डाॅ. पायल तडवींची आत्महत्या ही सर्वसाधारण नाही. किंबहुना ती आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे. ती सुद्धा महिला डाॅक्टरांनी केलेली. डाॅ. तडवींचा छळ सुरू होता.  तीन सहकारी महिलांकडून. त्यांची नावेही प्रसिद्ध झालीत. मुंबईतील आग्रीपाडा पोलीसांकडून त्या तीन महिला डाॅक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. डाॅ. पायल तडवी हिस सहकारी तीन महिला तिला सतत त्रास देत होत्या. तिच्या अभ्यास आणि कामात अडथळे आणत होत्या. डाॅ. तडवी ही कनिष्ठ जातीय. मागासगर्वीय. तिच्या जातीवरूनच तिचे मानसिक खच्चीकरण केले जात होते. यालाच रॅगिंग असे म्हणतात. जात नाही ती जात. असे म्हटले जाते. जातीभेदाची भीषणता दर्शवण्यासाठी ही उक्ती वापरण्यात येते. यात काही खोटे नाही. जातीभेद हा नष्ट  होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. इतका की डाॅक्टरसारख्या पवित्र पेशालाही जातीयतेने मतिभ्रष्ट केले आहे.
महाविद्यालयात येणारे विद्यार्थी हे आपल्या स्वप्नांचे, अपेक्षांचे ओझे घेऊनच प्रवेश करत असतात. इथे त्यांना वरिष्ठ आणि कनिष्ठ अर्थात सिनिअर आणि ज्युनिय अशा दोन वर्गांचा सामना करावा लागतो. परंपरागत चालत आलेल्या तथाकथित रॅगिंगचा रथ तो पुढे चालवत असतो. सिनिअर विद्याथ्र्यांनी नवीन विद्याथ्र्यांची ओळख विचारण्यापासून सुरूवात झालेल्या या गोष्टीचा शेवट मात्र किती टोकाचा असू शकतो याचा अनुभव अख्खा महाराष्ट्र घेतोय. रॅगिंगची सुरूवात ही अगदी लहान-सहान गोष्टींपासून  होते. समोरच्याचं म्हणणं ऐकून न घेणं, मनात राग धरणं, मस्करी केली म्हणून जातीवाचक शिवीगाळ. या गोष्टी कधी-कधी एवढं भीषण रूप धारण करतात की, शेवटी विद्यार्थी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात. आपला दरारा दाखविण्यासाठी, ज्युनिअर विद्याथ्र्यांना भीती दाखविण्यासाठी रॅगिंगसारख्या चुकीच्या गोष्टींचा  अवलंब केला जातो. जोे कायद्याने गुन्हा ठरतो.
       रॅगिंगच्या विरूद्ध महाराष्ट्र शासनाने वीस वर्षांपूर्वी कायदा करूनही व रॅगिंगविरूद्ध समिती आणि अन्य उपाययोजना असतानाही रॅगिंगच्या घटना विविध व्यवसायिक प्रशिक्षण संस्थांमधून उघडकीस आल्याचे दिसते. जेवढया घटना घडतात त्यातील अतिषय थोडया घटनांबाबत वाच्यता होते व त्यातील फारच थोडया घटनांमध्ये कारवाई होते. आपल्या कुटुंबाची बेअब्रु होऊ नये म्हणून भीतीने व व्यवसायातील अन्य लोकांनी आपल्याला बहिष्कृत करू नये या भावनेने नवीन विद्यार्थी-विद्यार्थींनी त्याविरूद्ध तक्रार करत नाहीत. कारण कुणालाही पंगा घ्यायचा नसतो. तक्रार करूनही पुन्हा इथेच राहायचं आहे. छळात दुप्पट वाढ होईल. ही भिती त्यांना वाटत असते.
       राज्यातच नव्हे तर देषभरात रॅगिंगच्या घटनांची संख्या पाहिली तर समाजाला लागलेली हि एक किड असल्याचे समोर येते. कारण याचे मूळ हे शिक्षणासारख्या पवित्र आणि अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात रूजलेले असल्यामुळे याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे. यासाठी प्रत्येक घटकांनी चिंतन करण्याची गरज आहे. रॅगिंगसाठीची मानसिकता तयार होण्यास कोणकोणत्या प्रवृत्ती, कौटुंबिक, सामाजिक आणि सामूहिक व्यवस्था कारणीभूत असतात याचा नव्याने विचार होण्याची गरज आहे. महाविद्यालयांमध्ये विद्याथ्र्यांकडून होणारे रॅगिंग बंद व्हावे यासाठी महाविद्यालयांच्या स्तरांवर समित्या नेमणे.  विद्यार्थ्यांना प्रवेश देताना  त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणे गरजेचे आहे.
       रॅगिंग किंवा लैंगिक त्रास किंवा अनुसूचित जाती जमातींच्या नावाखाली अत्याचार, जात व धर्माच्या नावाखाली त्रास देणे, हिणवणे हा कायदेशीर गुन्हा आहे व ते महाविद्यालयांमध्ये खपवून घेतले जाणार नाहीत हे विद्याथ्र्यांना प्रवेश देताना स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. हाॅस्टेलमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये केवळ सीसीटिव्ही लावून रॅगिंगच्या घटना थांबणार नाहीत तर त्यासाठी हाॅस्टेल प्रमुख, सल्लागार, शिक्षक यांनी नवीन विद्यार्थ्यांशी वारंवार संपर्क करून त्यांना होणाÚया त्रासाबददल सहानुभूतीने चौकशी करणे आणि त्याची कडक अंमलबजावणी गरजेचे आहे. महाविद्यालयांमधील प्राध्यापक, शिक्षक,  वरिष्ठ विद्यार्थी नवीन प्रवेश केलेले ज्युनियर विद्यार्थी यांच्यात वारंवार चर्चा, सभा, स्पर्धा आयोजित करून रॅगिंगच्या घटना घडणार नाहीत असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.
दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...