Ticker

10/recent/ticker-posts

मी तू पण गेले वाया, भेटता पंढरीच्या राया

मी तू पण गेले वाया, भेटता पंढरीच्या राया
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

आषाढी वारी म्हणजे, चैतन्याचा महामेळा, वारी म्हणजे विठूरायाच्या दर्शनाची लागलेली ओढ. वारी म्हणजे अमाप उत्साह.... 'ज्ञानोबा, माऊली तुकाराम... बोला पुंडलिका वरदे हरी विठठल. श्री ज्ञानदेव तुकाराम' या जयघोषाने सगळा आसमंत दुमदुमून निघतो. विठूरायाच्या दर्शनासाठी आतूर झालेला वारकरी आषाढी एकादशीला भक्तीच्या जल्लोषात न्हाऊन निघतो आणि वर्षभरासाठीची अखंड ऊर्जा आपल्यासोबत घेऊन निघतो.


महिनाभर आधीपासूनच तयारी झालेला हा सोहळा म्हणजे भक्तीचा महापूरच असतो. २१-२२ दिवसांचा प्रवास करून आल्यानंतर विठठलाच्या दर्शनाने या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहायला मिळणं म्हणजे परमोच्च आनंद मिळाल्याचा भाव जसा मनात येतो. तशी ती अवस्था असते. 

भाग गेला क्षीण गेला।
अवघा झाला आनंद।।

हीच त्यावेळी वारकऱ्यांची भावना असते. खरेतर आषाढी वारी आपल्यामध्ये असलेलं मीपण काढून टाकते. 'मी तू पण गेले वाया, भेटता पंढरीच्या राया' असं संतांनी म्हटलं आहे. वारी म्हणजे जीवनातल्या व्यावहारिक शिक्षणाची खरी पंढरी आहे. इथं वावरताना आपल्यातली सांघिक भावना जागृत होते. त्याचा सहवास पुढे वर्षभर आपल्यात राहतो. त्यामुळे वास्तवातलं जीवन जगत असताना आपल्याला अनेक गोष्टीत याचा वापर करताना कितीतरी फायदा होतो. पांडुरंगाची भेट आणि वारीचा सहवास यातून जीवनातलं अमूल्य शिक्षण आणि शिदोरी आपल्या पदरात पडते. एवढंच नाही तर, एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची सवय आपल्याला जडते. वारीत ८० वर्षांच्या आजी-आजोबांपासून ते ५ वर्षांच्या मुलांपर्यंत सगळेचजण एकमेकांना 'माऊली' म्हणतात. कारण, वारकरी एकमेकांना माऊलीच्या रूपातच पाहतो आणि मुखातून माऊलीचंच नाव घेतो. यातून आपापसातली उच्च-नीचता गळून पडते. वारी तुमच्या आमच्यातला भेदभाव नष्ट करते.


महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि विशेष म्हणजे पाश्चिमात्यांनासुद्धा या पंढरीच्या विठुरायाने वेड लावले आहे. समस्त भारतातील विविध संप्रदायापेक्षा वारकरी संप्रदाय निश्चितच वेगळा ठरतो. भक्ती हे अंतिम ध्येय या संप्रदायाने मानले आहे. ज्ञानयुक्त व सदाचरणयुक्त भक्ती हे या संप्रदायाचे वैषिश्टय आहे. त्यामुळे वारीचं व ववारकऱ्यांचे असाधारणत्व सहजच प्रत्ययास येते. विठूनामाचा गजर करत लहान थोर वारकरी आषाढात पालख्या, दिंडयासहित पंढरीच्या दिशेने धाव घेतात. 

विठठल विठठल गरजत ।
जाऊ पंढरीत टाळ मृदुंग वाजवीत ।
न्हाऊ गाऊ चंद्रभागेत
ठेवूनिया कर कटावर ।
वाट पाहतो माझा पांडुरंग
कसा होईल हो विसर ।
सदा विठू नामात आम्ही दंग

अशा विलक्षण आंतरिक ओढीने वारकरी पंढरीची वाट चालतात. जणू हा भगवंत आपल्या भक्तीची आतुरतेने वाट पाहतोय. इतक्या उत्कटतेने हा वारकरी आपल्या लाडक्या देवतेच्या भेटीसाठी पंढरीत दाखल होतो. पालखी, रिंगण, झिम्मा, फुगडी इत्यादी खेळातून भक्तीची उधळण करीत त्यात समरस होतो. भौतिक सुखःदुखाचा विचार न करता भक्तीचा खेळ खेळतो. भेदाभेद भ्रम अमंगळ हे तो जाणतो. समत्वाची आणि समन्वयाची वारी घराघरात पोहचवितो. हा वारकरी साधासुधा नाही. तर 'देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो' अशी संत नामदेवांची दृढ भक्ती अनुसरणारा आहे आणि 'अहंकाराचा वारा न लागो राजसा' या वृत्तीने वर्तन करणारा आहे. 


आषाढी वारी म्हणजे भक्ती, शक्ती तृप्तीचा महोत्सव आहे. त्यात कुठेही डामडौल नाही. नटणं, मुरडणं नाही. सजणं-धजणं नाही. तुळशी, अबीर, बुक्का, गोपीचंद, लाहया व अंतःकरणयुक्त भक्ती इतकीच त्याची साधने आहेत. वारकरी संप्रदायातील भक्तीचा साधेपणा व सच्चेपणा अद्वितीय आनंदाची पर्वणी देणारा आहे. आणि हे सर्व देणारे संत वारकरी आहेत. पंढरीची वारी करणाÚया वारकऱ्यांची मुख्य ओळख म्हणजे तुळषीमाळ. ही माळ धारण करणे म्हणजे लाडक्या विठूरायाच्या नावानं गळयात घातलेलं मंगळसूत्र. वारकरी नित्य कपाळी गोपीचंदनाचा टिळा व बुक्का लावतो. हा टिळा म्हणजे विठुरायाच्या नावानं कपाळी रेखलेला सौभाग्यतिलक. वारकऱ्यांच्या खांद्यावर असलेली भगवी ध्वजा म्हणजे सदाचाराची आठवण देणारी सांस्कृतिक निषाणी. शरीरावर धारण केलेली ही सारी प्रतीकं, लक्षणं संस्कृतीची आठवण करून देणारी आहेत. 


अध्यात्मिक वारीत मनाच्या शिस्तीचं, व्यवस्थापनाचं मौलिक शिक्षण मिळतं. मनाच्या शिक्षणाच्या या संस्कारक्षम वाटेवर संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची भेट होते. तुकोबारायांच्या अभंगाच्या सहवासात जीवनातील वाटा पवित्र होऊन जातात. वारीच्या आध्यात्मिक वाटेवर सांस्कृतिक धनाचा खजिना हाती येतो. 'वाट धरिता हरिची। चिंता हारे संसाराची।' याची प्रचिती येते. जगावेगळया पंढरीच्या या आनंदवारीत आपल्या संस्कृतीचं थेट दर्षन घडतं. संस्कृतिमय, देवमय झालेल्या आपल्या मनात सांस्कृतिक लेण्याच्या दर्शनामुळे आत्मोद्धाराची वाट सापडते. 'अंतर्मुखी सदा सुखी' याचा अर्थ समजतो. जीवन ही आंतरिक तीर्थयात्रा बनून जाते. प्रत्येक मराठी माणसाने मनानं एकदा तरी वारीतील 'देवाच्या द्वारी' क्षणभर विसावा घेऊन, मुक्तीच्या आनंदाचा अनुभव घेऊन अध्यात्मिक जीवन सत्कारणी लावायला हवे.





माझी सहेली या मासिकात प्रसिद्ध झालेला लेख


पंढरपूर विठ्ठल मंदिर



वारीत सहभागी झालेल्या दिंड्या 


पंढरपुरात तुळशीच्या माळा विकणारी महिला 



वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची गर्दी 
पंढरपूरच्या वारीत प्रसाद विक्री 

वारकरी 

टिप्पणी पोस्ट करा

9 टिप्पण्या

  1. माऊली, राम कृष्ण हरी!! छान लेख लिहिला आहे. आपले लेख उत्तम असतात.

    उत्तर द्याहटवा
  2. आपण आमच्या, सर्वसामान्यांच्या मनातील लिहिता. कधी-कधी मलाही असेच म्हणायचे होते असे वाटते. पण, आपल्यासारखे लिहिता येत नसल्याने ते पोटातच राहते. पण, आपले लिखाण वाचल्यावर बरोबर लिहिले आहे असे वाटते. धन्यवाद! असेच लिहीत राहून प्रबोधन करावे.

    उत्तर द्याहटवा
  3. जय हरी!, मला आपला लेख वाचून पंढरपूरला एकदा तरी जायचेच अशी इच्छा झाली आहे. विठ्ठल विठ्ठल.

    उत्तर द्याहटवा
  4. मला एकदा पंढरपूरला जायचे आहे. जय हरी विठ्ठल. छान लेख. ��

    उत्तर द्याहटवा
  5. आपला लेख वाचला. छान लिहिला आहे. वाचून वारीचे महत्त्व समजले.

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.