लेख

१/३/२०

लैंगिक शिक्षणातून छेडछाडीला लगाम!

लैंगिक शिक्षणातून छेडछाडीला लगाम!
-दादासाहेब येंधे
 सृष्टीच्या निर्मात्याने नर-नारी अशा भिन्नलिंगी मानवाची तथा प्राण्यांची उत्पत्ती करतांनाच त्यांना प्रजननाच्या दृष्टीने कामक्रीडेची, लैंगिक सुखाची जाण करून दिली आहे. प्राण्यांमधील शरीरसंबंध आपण लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण पाहत असतो. परंतु, मानवामध्ये गुप्त इंद्रियांबाबत चर्चा करणे अथवा शरीरसंबंध ठेवणे म्हणजे मोठे लज्जास्पद आणि गोपनीय गोष्ट मानली जाते.
मानवाचे शिस्त लावणे, काम वाटप करणे, विवाह मर्यादा, नाती-गोती ठरविण्यासंदर्भात विशिष्ट सद्वर्तनाचे नियम ठरवले. त्यातून धर्म उदयास आला. धर्मचाराप्रमाणे मानवामध्ये विवाह, नाती-गोती, शरीर संबंध आणि लैंगिक सुखाच्या बाबतीत विशिष्ट बंधने, नियम व कायदे पाळावे लागतात.
संगणकीय आधुनिक आणि प्रगत विज्ञानयुगात सुद्धा लैंगिक सुख, शरीरसंबंध, गुप्त इंद्रियांबाबत निर्माण होणाऱ्या अडी-अडचणी गुप्तरोगांबाबत गोपनीयता राखली जाते. यासंदर्भात पाल्य आणि पालकांमध्ये उघडपणे चर्चा होताना दिसत नाही. मुलांमधील जिज्ञासूपणामुळे त्यांच्यात विविध शंका निर्माण होणं स्वाभाविकच आहे. किंबहुना पालक आपल्या हजरजबाबी पाल्यांच्या शंकांचे निरसन करण्यास कमी पडतात. पालकांना कळत नाही की मुलांना काय सांगायचे आणि कसे समजायचे. त्यामुळे मुलांना काहीतरी थातूर-मातूर उत्तरे देऊन ते गप्प करतात.
 विशेषतः नोकरी-व्यवसाय मुळे आपल्या मुलांशी हितगुज करण्यास वेळ देत नाहीत किंवा त्यांना शक्यही नसते अशा वेळेस मुलांच्या शंकांचे समाधानकारक निरसन न झाल्यामुळे मुलं त्यातील रहस्य जाणून घेण्यास आतुर झालेली असतात. नैराश्यामुळे पर्याय शोधू लागतात. मग अशी मुलं संगणकाच्या सायबर सुविधांमुळे इंटरनेट तसेच व्हिडीओ पार्लरच्या माध्यमातून अर्धवट लैंगिक ज्ञान मिळवतात. अपूर्ण ज्ञान हे अज्ञानापेक्षाही अधिक घातक असते असे म्हटले जाते. शिवाय प्रौढावस्थेत कडे कूच करणाऱ्या मुली मुलांमध्ये वाढत्या वयोमानानुसार त्यांच्यातील शारीरिक बदल विकसित होताना अगदी बारकाईने बदलत्या शरीराचे निरीक्षण ते करत असतात. त्याच काळात त्यांना शारीरिक कुतूहल आणि एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागते आणि हळूहळू त्यांची लैंगिक भावना जागृत होऊ लागते. इंटरनेट, व्हिडिओ पार्लर सारख्या सुविधांमुळे असलेले चित्रपट पाहून, लेखन वाचून त्यांची कामोत्सुकता वाढीस लागते. त्याचवेळेस त्यांना हवे असलेले शरीरसुख घेण्याचे त्यांचे वय नसते पण अतिउत्साहामुळे त्यांच्यात लैंगिक मनोवृत्ती जागृत होऊन त्यांना मर्यादेचे भान राहत नाही. त्यांच्या मनावरील संयम सुटल्यामुळे त्यांच्याकडून विनयभंग, बलात्कार सारखे अपराध घडताना दिसतात. उदाहरण द्यायचे झाले तर विवाहित महिलेवर अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची बातमी नुकतीच वाचनात आली होती. अशा प्रकारच्या बलात्काऱ्यांना आपण नराधम, लिंगपिसाट म्हणू लागतो.
बलात्कारी पीडितांचे कौमार्यभंग झाल्याने अब्रू लुटली गेल्याने समाजात त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. बलात्कारी स्त्रिया कुमारिका आत्महत्या करतात. त्यात भर म्हणून इंटरनेट, व्हिडिओ पार्लर सारख्या सुविधांमुळे विविध दूरदर्शन वाहिन्यांवरून दाखवले जाणारे चित्रपट, अर्धनग्न पोशाख, नंगानाच पाहून शालेय मुले मुली तरुण-तरुणींना लैंगिक आणि शारीरिक सुखासंबंधी उत्सुकता वाढू लागते. तर बहुतांशी मुलांमध्ये भय, न्यूनगंड, मनोविकृती, वासनाविकार झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास येते.
त्यामुळे कामवासनेच्या मनोविकृतीने पछाडलेले नराधम नाती-गोती विसरून बाल, विवाहित, अविवाहित, वयोवृद्ध स्त्रियांवर बलात्कार, विनयभंग करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. बलात्काराची भावना लैंगिक मनोविकृतीमुळेच निर्माण होते. याचे कारण म्हणजे लैंगिक अज्ञान. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार ११ ते १६ वर्षे वयोगटातील शालेय मुलामुलींना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे झालेले आहे. लैंगिक सुख ही नैसर्गिक गरज असून त्यासंदर्भात शास्त्रशुद्ध आणि निर्मळ भावना मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी विशिष्ट वयोमर्यादेच्या संवाद माध्यमातून तज्ज्ञ व्यक्तींकडून किंवा डॉक्टरांकडून उघडपणे आवश्यक तेवढेच लैंगिक शिक्षण देण्यास काहीच हरकत नसावी.
लैंगिक सुखाची नैसर्गिक गरज, मुलींमधील मासिक पाळी, विवाह व शारीरिक सुख उपभोगण्यासाठी व्योमर्यादेची आवश्यकता आणि लैंगिक सुखासंबंधी भय, भीती, न्यूनगंड, मनोविकृती याबाबत सखोल ज्ञान आणि माहितीचा समावेश लैंगिक शिक्षणात असावा. त्याचबरोबर विनयभंग, बलात्कार, छेडछाड, रॅगिंग सारखा गुन्हा केल्याने होणारा फौजदारी दंड, शिक्षेबाबत उदाहरण दखल्यांसहित सखोल ज्ञान व माहिती विद्यार्थ्यांना देण्याची अत्यंत गरज आहे. जेणेकरून, अशा अपराधाबद्दल त्यांच्या मनात भीती निर्माण होईल. आणि त्यांच्याकडून अतिरेक किंवा दुरुपयोग होणार नाही.

२ टिप्पण्या:

असे करा उकडीचे मोदक

मुंबई, दादासाहेब येंधे : गणेशोत्सव तसेच अंगारकी चतुर्थी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते उकडीचे मोदक आणि उकडीचे मोदक बनवायचे म्हटलं की, बराच वे...

हा ब्लॉग शोधा