हळवं मन, स्वच्छतेसाठी नेहमी अग्रेसर
सकाळचे आठ वाजले आणि मग नेहमीच्या सवयीनुसार हातात झाडू घेतली. स्वयंपाक खोलीचा केरकचरा काढून बाहेरच्या मोठ्या खोलीतला केर काढायला सुरुवात केली. सौ. नलिनी बिछान्यावरून नेहमीप्रमाणेच माझ्या केर काढण्याचे काटेकोरपणे अवलोकन करीत आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही.
'बाकी सगळी कामं तुम्ही ना अगदी चांगली पार पाडता, पण केरकचरा मात्र तुम्हाला अजून जमत नाही. झाडू अशी फिरविता की तो कचरा परत मागे येतोय. आणि हे तुम्हाला समजत कसं नाही? तिने नेहमीप्रमाणेच अभिप्राय व्यक्त केला. 'तो पहा, तिथे कोपऱ्यात अजून केराचा पुंजका तसाच पडून आहे!'. तिच्या काटेकोर निरीक्षणाचे फलित शब्दांकित झाले होते.
पण, तेवढ्या त्या तिच्या सहज बोलण्याने माझं मन माञ दुखावले गेले होते. रागानेच मी तिला प्रत्युत्तर दिले; 'माझं इकडे कंबरडं साफ मोडून पडलंय. कपडे धुवायचे, भाजी आणायची, दूध आणायचे, समृद्धीला शाळेत सोडायचे अन तेथून थेट कामावर जायचं आणि तुला तिथे बिछान्यावर पडल्या पडल्या दोष द्यायला काय जातंय?'.
माझ्या रागाच्या पाऱ्याने व्यक्त झालेल्या आकस्मिक प्रतिक्रियेने ती पार दुखावली होती. असं असूनही ती संयमाने म्हणाली, "माझ्या अशा या दुखण्याने, आजारपणामुळे तुम्हाला अपार कष्ट होत आहेत. कमालीचा त्रासही होतोय हे मला अहो समजत नाही का? पण तुम्ही कष्ट घेऊनही असा कचरा मागे राहिला, तर त्याचा काय उपयोग?
'नलिनी, तू काही बोलू नकोस आता? माझ्या दुखावलेल्या मनाने तिचं बोलणं असं मधेच तोडलं आणि मी पुढे त्राग्यातच म्हणालो, 'तुझं ना, काही केल्या समाधानंच होत नाही! मी सगळा कचरा रोजच्या रोज बरोबर काढतो आहे!' माझं बोलणं मध्येच तोडून ती म्हणाली, 'अहो, असे रागावू व चिडू नका हो! अधून मधून कमरेचं दुखणं सुरूच आहे. मी जर बरी असते तर तुम्हाला असं वाकावं लागलं असतं का? तुम्हाला अशी रोज घरातली कामं करावी लागतात ना त्याने माझा जीव असा तिळ-तिळ तुटतो. पण, मी तरी काय करू?
मी तिच्या या बोलण्याने पार विरघळून गेलो. तिच्याजवळ जाऊन आजारपण पाहिले आणि तिच्या बोलण्यातील तथ्य त्याचक्षणी जाणवलं. ते पाहून मी पटकन बोलून गेलो, आता यापुढे तुझ्यावर अशी बोलण्याची संधी येणार नाही. याची काळजी मी घेईन. तिच्या डोळ्याच्या पापण्या पाणावल्या होत्या. आता रोज घरातील केरकचरा काढताना ती घरात असो किंवा नसो, तिचे ते शब्द नेहमी समोर येतात. स्वच्छतेवरचा तिचा मनापासूनचा भर एवढा जबरदस्त आहे की, त्यासाठी पडेल ते कष्ट उपसायला ती जराही कसूर करत नाही.
गेल्या ११ वर्षांच्या वैवाहिक जीवनाच्या एकत्रित वाटचालीतील तिच्यात गुंतलेल्या किंबहुना पाण्यात विरघळलेल्या साखरेसमान व आता तर फार हळवे व संवेदनशील असलेले व झालेले माझे मन तिलाच मोलाचा आधार मानते. अत्यंतिक गोडव्याने व कमालीच्या जिव्हाळ्याने भरलेली "अहो..!" या शब्दाने निरंतरपणे घातली जाणारी व विशेष म्हणजे मनापासून ऐकत रहाविशी वाटणारी हवीहवीशी वाटणारी तिची ती सुंदर साद ऐकल्यावर माझं मन अधिकच भांबावून जाते. आत्यंतिक आतुरतेने, आंतरिक ओलाव्याने, ओतप्रेत जिव्हाळ्याने कोणीतरी तुमची दारात वाट पहात उभी असणार याची घरी परतणाऱ्याला आशाच नव्हे तर, त्याची पक्की खात्री असते. माझ्या बाबतीत अशी वाट पाहात दारात उभ्या राहणाऱ्या सौ. नलिनी...
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.