Ticker

10/recent/ticker-posts

किशोरावस्थेतील इंटरनेटचे व्यसन घातक

किशोरावस्थेतील इंटरनेटचे व्यसन घातक
-दादासाहेब येंधे 

सध्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन दिसून येतोय. जाग्यावर बसल्या बसल्या सगळी कामे करून देणारा हा स्मार्टफोन माणसाला आळशी  बनवत चालला आहे. पण, त्यासोबतच तो अनेक आजारांसाठीही आमंत्रण देणारा ठरत आहे.

दोघेही पालक नोकरीपेशात असतील तर एकटया राहणाऱ्या  मुलांकडे खूप कोवळया वयात मोबाईल येतो. तेथूनच खरी समस्या निर्माण होते. शाळांची असाइनमेंट ही इंटरनेटवर पाहून करायची, असे म्हणता म्हणता ही मुले कधी वेगवेगळया साइटसकडे वळतात हे त्यांनाही कळत नाही.

किषोरवयीन मुले एकदा का मोबाईल वापरायला लागली, की त्यांचे घराबाहेर खेळणे, छंद जोपासणे कमी होत जाते. इंटरनेटवर व्हिडीओ पाहण्यात त्यांचे कित्येक तास निघून जातात. त्यामुळे गृहपाठ अर्धवट राहतो. रात्रीची झोप कमी-कमी होत जाते. सकाळी जाग लवकर येत नाही. आसपासच्या मुला-मुलींशी संबंध कमी होतात. एकटेपणा वाढतो. प्रसंगी नैराश्य येते. मानसिक समस्या वाढतात. शरीराचा व्यायाम कमी होत जातो. परिणामी, लठठपणा वाढतो.

अनेकदा मोबाईलवर आक्रमक खेळ बघून मुलांची मानसिकता आक्रमक बनू लागते. त्यातून दिसणारे चित्रविचित्र प्रकार त्यांना वस्तुस्थिती वाटू लागतात. अशा वयात किशोरवयीनांचा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण नसते. ते क्षणात आनंदी होतात. क्षणात खूप रागीट होतात. त्यामुळे त्यांच्या इंटरनेटच्या सवयींवर मर्यादा ठेवाव्या लागतात. सतत मोबाईल, फेसबुक, व्हाॅटअॅप आणि नको त्या साइटसपासून त्यांना दूरच ठेवावे. सतत मोबाईलवर गेम खेळत राहिल्याने मुलांची विचार करण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे. गेम खेळण्याच्या सवयींमुळे त्यांची बौद्धिक वाढ खुंटत आहे. एकाच जागी चार-चार तास मुलं बसत असल्याने ती मैदानी खेळंच विसरून गेली आहेत. इमारतींच्या आवारतही हल्ली मुले जास्त उपलब्ध नसतात. ज्या जागा असतात त्या पार्किंगसाठी वापरात येतात. 

नवीन पिढी यात जास्तच गुरफटज चालली आहे. या पिढीला या चक्रव्यूहातून बाहेर काढणे कठीण असले तरी अशक्य नाही. स्मार्टफोनपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी इंडोनेशियातील सरकारने शाळांमधून विद्यार्थांना  कोंबडीची पिले, फळ-फुलांची रोपे आणि बियांचे वाटप केले आहे. जेणेकरून, मुले स्मार्टफोन सोडून त्यांचा सांभाळ करू शकतील. इंडोनेशियात इंटरनेट वापरणारे लोक दररोज आठ तास फोनवर असतात. आजकालची मुलेही स्मार्टफोनच्या अतिवापराची शिकार बनत चालली आहेत. अशात मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवण्यासाठी हे अभियान यशस्वी ठरले. अशी माहिती इंडोनेशियाच्या बांडुंग शहराच्या महापौरांनी दिली. यामुळे मुलांना शिस्त लागेल, झाडे, प्राणी यांची देखभाल करण्यात त्यांचा वेळ जाईल, ज्यामुळे ते आपोआपच स्मार्टफोनपासून दूर राहतील, असं तेथील पालक म्हणतात. कोंबडीची पिले पाहायला मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. इंडोनेशियातील हा उपक्रम आगळावेगळा असाच म्हणावा लागेल. मुलांचं मन रमविण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीने केलेला हा अभिनव असा उपक्रम म्हणावा लागेल. 

मोबाईल ही आजच्या धावत्या युगाची गरज आहेच. ज्या गोष्टी अत्यावश्यक असतात. त्यांना पुष्कळ मागणी असते. कारण, त्यांचा उपयोग करणारेही तितकेच मोठया प्रमाणात असतात. पण, त्याचे धोके ओळखणंही गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून दारू, सिगारेट, अंमली पदार्थ यांच्या व्यसनमुक्ती केंद्राप्रमाणेच मोबाईल व्यसनमुक्ती केंदे्रही सुरू झाली आहेत. त्याचसोबत त्यामुळे होणाÚया आजारांबाबत मानसोपचारतज्ज्ञांकडून, डाॅक्टरांकडून जनजागृती केली जात आहे. मुलांना इंटरनेट, स्मार्टफोनच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करण्याबरोबरच वाचन, संगीत, नाच, कलेची जोड द्यावी.





टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. लहान मुलांना इंटरनेट नकोच. अभ्यास सोडून इतर काहीतरी बघत बसतात, तासनतास गेम खेळतात. आपण लेखात लिहिल्याप्रमाणे मुलांना किशोर वयात मैदानी खेळ खेळायला सांगितले पाहिजे.

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.