Ticker

10/recent/ticker-posts

खेळांना सुगीचे दिवस यावेत


खेळांना सुगीचे दिवस यावेत
-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)

भारतीय मानसिकतेत खेळाने एका छंदापासून सुरू केलेला प्रवास व्यावसायिक पर्यायापर्यंत पोहोचण्यास बराच काळ लागला आहे. त्यातही अर्धीअधिक मने ही क्रिकेटने व्यापून गेली आहेत! अब्जांच्या घरात लोकसंख्या पोहोचलेला भारत एखाद्या राज्याएवढी लोकसंख्या किंवा आकारमान नसलेल्या, सुधारणेच्या बाबतीतही मागासलेल्या देशापेक्षा या फुटबॉलमध्ये एवढा मागे का? आणखी किती वर्षे आपण असेच मागे राहणार आहोत? अर्थात, फुटबॉल वर्ल्डकप हेच आपले अंतिम उद्दीष्ट असले पाहिजे असेही नव्हे, पण आशिया स्तरावर जरी विचार केला तरीही आपली अवस्था सगळे काही सांगून जाते. मग वर्ल्डकप तर खूपच दूरची गोष्ट राहिली. आपल्याकडे गुणवत्ता नाही? आपण त्या स्तरापर्यंत पोहोचण्यास लायकच नाही? काय कारण असेल यामागे. आज प्रत्येकालाच हा प्रश्न पडला आहे.

भारतात क्रिकेटला धर्म समजले जाते आणि क्रिकेटपटूंना देव. क्रिकेट हा खेळ देशवासीयांच्या नसानसांत भिनला आहे. आज सर्वत्र क्रिकेटचा बोलबाला असला तरी काही वर्षांपूर्वी क्रिकेटसाठी पोषक वातावरण नव्हते, पण कालांतराने परिस्थिती बदलत गेली. क्रिकेटच्या प्रशासकांनी आपल्या खेळाला इतक्या उंचीवर आणून ठेवले की वर्षभर क्रिकेट एके क्रिकेट अशीच चर्चा रंगू लागली आहे. अन्य खेळ मात्र अजूनही आपला लौकिक वाढवण्यासाठी झगडत आहेत. क्रिकेटप्रमाणे अन्य खेळ संघटनात्मक, व्यवस्थापकीय, प्रशासकीय पातळीवर कमी पडत आहेत.

पुरस्कर्त्यांचा अभाव.. अनुकरणीय, आदर्श खेळाडूंची कमतरता.. खेळापेक्षा शिक्षणाला असलेले अवाजवी महत्त्व तसेच पालकांची मानसिकता यामुळे अन्य खेळ बरेच मागे पडू लागले आहेत. तळागाळापर्यंत खेळ पोहोचवायला आणि रुजवायला संघटना कमी पडल्या. त्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचा वेग फारच संथ गतीचा आहे. खेळाचे उपयोग, आवाका, संशोधन, मार्केटिंगचं तंत्र लोकांपर्यंत पोहोचवलं तर अन्य खेळांनाही सोनेरी दिवस येतील.

खेळाचा पाया विस्तृत करायला हवा. आपल्याकडे शिक्षणाला बरेच महत्त्व दिले जाते. मुलगा दहावीत, बारावीत गेला की त्याचा खेळ बंद होत जातो. परीक्षा आल्या की व्यायामशाळा ओस पडू लागतात. परीक्षेत चार गुण कमी पडले तरी चालतील, पण खेळल्याने आयुष्यभर फायदे होतील, हा संदेश पालकांपर्यंत पोहोचला तरी हे चित्र बदललेले दिसेल. मुलगा खेळला तर तो जीवनात हमखास यशस्वी होईल. आपल्याला ऑलिम्पिक विजेते खेळाडू घडवायचे नाहीत, तर संगणकासमोर बसणारी मुले मैदानावर आणायची आहेत. प्रसारमाध्यमांनी हा संदेश पालकांपर्यंत पोहोचवला तर आमच्या प्रयत्नांना यश मिळेल.

भारतात फुटबॉलमय वातावरण व्हावंच, पण ते एका दिवसासाठी असू नये. आपण फुटबॉलमध्ये मागे का, सुविधांची वानवा का, शालेय स्तरावर मुले मोठ्या संख्येने फुटबॉल खेळत असताना मग त्याचे प्रतिबिंब राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर का उमटत नाही या व अशा अनेक मुद्द्यांचा साकल्याने विचार व्हायला हवा. तो सरकारनेच करायला हवा असे नाही पण सरकारने एक दिवसाचा उपक्रम करतानाच दीर्घकालीन उपाययोजनांचाही विचार करावा.

आपल्या देशी खेळांना जितका वाव द्यायला हवा, जितके कौतुक व्हायला हवे, तितके आपण करत नाही. शाळा, गल्लीत खेळ वाढला पाहिजे, रुजला पाहिजे, तरच तो राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचेल. आपण आपल्या खेळांना प्रोत्साहन दिल्याशिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व येणार नाही. चीनसारख्या देशाने पाठपुरावा करून आपले देशी खेळ ऑलिम्पिकमध्ये पाठविले. आपण मात्र आहे तिथेच आहोत. ही उदासिनता टाळायला हवी. 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.