२१/६/१९

योगाने साधा मनःशांती

योगाने साधा मनःशांती
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

आरोग्यतज्ञांच्या मते, तणाव आणि मानसिक रोग यांसारखे आजार दूर करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याचबरोबर तणावासंबंधित हाॅर्नाेमल नियंत्रित करण्यासदेखील मदत करतो. हे आता सिद्ध होत आहे.
उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्राॅल आणि लठठपणा यांसारख्या समस्येवर योगा हा उपाय आहे. योगा हा आयुष्य जगण्याचा एक चांगला मार्ग आहे. असे तज्ञांचे मत आहे. एखादा रोग झाल्यानंतर त्याच्यापासून सुटका होण्यासाठी लोक औषधे खावीत की योगा करावा अशा द्विधा मनःस्थितीत असतात. पण, लोकांनी हे समजणे गरजेचे आहे की, मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक रोगावर योगा हे एक उत्तम औषध आहे. बऱ्याच जणांना रोग हे त्यांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. त्यावर योगा हा एकच उपाय आहे. योगामुळे तुमचे जीवन हे आनंदी आणि सुखी राहिल्यामुळे रोग होण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते.
शरीर व मनाच्या शुद्धीचे साधन म्हणजे ‘प्राणायम’ प्राणाचा आयाम करणे म्हणजेच श्वास लांबविण्याची क्रिया. जास्तीत जास्त श्वास लांबविणे म्हणजेच श्वासावर नियंत्रण आणणे होय. प्राण म्हणजे वायू. अर्थात, प्राणाची व्याप्ती मोठी म्हणून त्याचा अर्थ प्राणशक्ती होय. प्राणशक्तीचा संबंध मनाशी येतो. मनाचा संबंध हा बुद्धीशी येतो. बुद्धीचा संबंध आत्म्याशी येतो व आत्म्याचा संबंध हा परमात्म्याशी येत असतो. प्राणायाम म्हणजे लयबद्ध पद्धतीने केलेले श्वसन.
७ ते ७० वर्षांपर्यंतच्या स्त्री-पुरुषांना प्राणायाम क्रिया करण्यास हरकत नसते. या आयुर्काळात रक्ताभिसरण, रक्तपुरवठा निसर्गतः चालते. प्राणायाम करणारे रागलोभविरहीत, सदैव प्रसन्न असणारे, शरीर व मनाने पवित्र जपणारे आणि प्राणायामाचा अभ्यास करायला उत्सुक असे हवेत. प्राणायाम शिकायला आरंभण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी पदमासन, सिद्धासन अशी आसने अभ्यासावीत. त्यामुळे शरीरातल्या नाडया मृदू बनतात. ही आसने दोनदोन वा तीनतीन तास एकाठिकाणी स्थिर बसण्याची तयारी करतात. ती सिद्ध झाल्यावरच प्राणायामाभ्यास करायला हवा.प्राणायाम जिथे करायचा ती जागा शांत, पवित्र, शुद्ध वातावरण असलेली हवी. तिथे जोरदार वारा वेगाने वाहणारा नसावा. यासाठीच उघडया जागेत, माळावर कधीही प्राणायाम करू नये. जोरदार हवेमुळे घाम वाळविला जातो. रंध्राबाहेर तो येत नाही. असं होण अयोग्य आहे. घाम शरीराबाहेर यायलाच हवा. तसा तो येत नसेल तर नाडी शुद्ध नाही, हे नक्की.
प्राणायाम दिवसातून दोनदा करावा. काही प्राचीन योगग्रंथात दुपार, सायंकाळ आणि मध्यरात्री तो करावा असे लिहिले आहे. एका वेळी दहा प्राणायामांनी आरंभ करून नंतर दैनंदिन पाच आवृत्ती वाढ असा क्रम ठेवला तर सहा तासांत ३२० प्राणायाम संख्या होईल. पण इतका वेळ आहे कुणाकडे? तेव्हा उपलब्ध वेळ, शरीरावस्था, आरोग्य यांचा मेळ घालून मगच अभ्यासाची मर्यादा ठरवावी. सर्वदा अनुभवी योगाभ्यासाकडून मार्गदर्शन  घेत राहावे.
दोन वेळा प्राणायाम करणाऱ्यांनी सायंकाळी शरीर थकले असता, दिवसभरात अतिकष्ट  झाले असल्यास रात्रीचा अभ्यास आटोक्यात करावा. अन्यथा फुफफुसांमध्ये बिघाड होऊन त्रास होऊ शकतो. अजीर्ण असणाऱ्यांनीही हीच काळजी घ्यावी. जेवणापूर्वी ३-४ तासांपूर्वी प्राणायाम करू नये. आहार हलका ठेवावा. जड पदार्थ टाळावेत. तापटपणा वाढविणारे, आळस आणणारे अन्न सेवन करू नये. सात्विक आहार म्हणजे वरण-चपाती, मुगाची खिचडी, पालेभाज्या, दूध, तूप, फळे, सुकामेवा असे पदार्थ भोजनात ठेवावेत.पालघर येथे पोलीस दल योगा करताना१३/६/१९

प्रत्येकाने सार्वजनिक वाहनांचा वापर करावा

प्रत्येकाने सार्वजनिक वाहनाचा वापर करावा
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
मुंबईतील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून शहरातील वाहनांची वाढती संख्या पार्किंगच्या समस्येत भर घालत आहे. वास्तविक, मुंबईत रस्त्यांचे प्रमाण कमी आहे. शहरात केवळ दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. मुळात रस्त्यांच्या लांबीत वाढ करणे शक्य नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत वाढ करणे गरजेचे आहे. सध्या शहरात मेट्रोचे जाळे विणण्याचे काम सुरू आहे; मात्र आतापर्यंत वेगवेगळ्या भागात सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. खरेतर नागरिकांनीदेखील खाजगी वाहनांचा कमीत कमी वापर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
काही दिवसांपूर्वी टीव्ही वर एक जाहीरात दिसत होती. एक पत्नी आपल्या पतीकडे डायमंडची मागणी करते. तुमची बचत होत असल्याने ती गिफ्ट मागते. मग बचत कशी झाली, असे पती विचारतो. तेव्हा ती सांगते तुम्ही मित्र एकाच वाहने जात असल्याने पेट्रोलसाठी होणारा खर्च वाचतो. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत होत असल्याचे ती सांगते. पेट्रोल आयातीवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. तर दुसऱ्या बाजूला वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी सह प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. ही जाहिरात खूपच काही सांगून जाते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात खाजगी वाहनांचा वापर कमी केल्यास वाहनांची गर्दी कमी होईल. यासह पेट्रोलची देखील बचत होईल.
मुंबईत कितीही प्रयत्न झाले तरी जोपर्यंत नवीन वाहन येणे थांबत नाही तोपर्यंत मुंबईतील पार्किंग आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. बाहेरील देशांमधल्या नवीन वाहन खरेदी करायचे असल्यास तुम्ही राहत असलेल्या सोसायटी किंवा नोकरी करीत असलेल्या ऑफिसचे पार्किंग उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक आहे. असाच नियम मुंबईतही लागू करणे गरजेचे आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत दारू पाठोपाठ वाहन विक्रीतून सर्वात जास्त महसूल जमा होतो. प्रत्येक वर्षांला संदेश हजार कोटी महसूल वाहन विक्री आणि नोंदणीतून सरकारला मिळतो. त्यामुळे नवीन वाहन खरेदी थांबविणे सरकारला परवडणारे नाही. 
मुंबईसारख्या शहरात दररोज सरासरी पन्नास किलोमीटर प्रवास होत असतो. यासाठी दररोज दोन ते तीन लिटर पेट्रोल किंवा डिझेल, सीएनजी सारख्या इंधनाचा खर्च होतो. म्हणजे इंधन खर्च दोनशे आणि टोल तसेच गाडीचा मेंटेनन्स खर्च, रोजचा पार्किंग खर्च याचा विचार केला तर सरासरी आपल्या वाहनावर दररोज ३०० रुपये खर्च होतो. त्याच अंतरासाठी सार्वजनिक वाहनांचा बस, रिक्षा, टॅक्सी, लोकलचा मार्ग अवलंबला तर दिवसाला ५० रुपयेही खर्च होत नाही. मुंबईत नाक्यानाक्यांवर या वाहनांची उपलब्धता असते. रिक्षा, टॅक्सी बऱ्याच मार्गांवर शेअरमध्ये उपलब्ध असल्याने स्टेशन ते ऑफिस फक्त दहा रुपयांत प्रवास करता येतो. पण, जर का आपण स्वतःची गाडी असली की ती रिकामी घेऊन जातो. कारमधील अन्य सीट रिकाम्या असतात. म्हणजे तीन ते चार माणसांचा खर्च आपण आपल्या एकटयावरच करत असतो. याशिवाय, वाहतूक कोंडी, अन्य तणाव याचा त्रास खूप सहन करावा लागतो. बस आणि रेल्वेच्या गर्दीबाबत मनात भीती बाळगली जाते. पण, ती अनाठायी आहे. बस आणि रेल्वेच्या इतक्या फेऱ्या सातत्याने होत असतात की, काही ठराविक वेळ सोडली तर कोणालाही सहजपणे त्यात प्रवास करणे शक्य होईल. विशेष बाब म्हणजे रेल्वे प्रवासी एकमेकांना सहकार्य करण्यात तत्पर असतात. एखादी महिला किंवा ज्येष्ठ व्यक्ती आली तर तिला आपली जागा रिकामी करून देण्याचे सौजन्य सगळेच दाखवितात.
सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्यांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यावर भर दिला तर ३०टक्के वाहने कमी होतील. रस्त्यावरील कोंडी कमी होईल. दुसरीकडे खाजगी वाहनांचा वापर प्रत्येकवेळी करण्यात येत असल्याने एखाद्या ठिकाणी पार्किंग केल्यास पार्किंग सुविधा नसल्यास रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. अशा वेळी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. त्यामुळे मुंबईत प्रत्येकवेळी वाहतूककोंडी होऊ नये यासाठी प्रत्येकाने खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा. जेणेकरून, मुंबईत वाहतूक कोंडी होणार नाही. सार्वजनिक सेवा ही सर्वांसाठी आहे, सुरक्षित आहे मग स्वतः च्या वाहनासाठी आग्रह कशासाठी धरायचा? आपणच आपली मानसिकता बदलली तर पेट्रोल, डिझेलची बचत करू शकतो.


३/६/१९

घरातली स्त्री सुदृढ तर घर सुदृढ

घरातली स्त्री सुदृढ तर घर सुदृढ
-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)
मी बाई आहे सारखे सारखे आजारी पडून कसं चालेल?? माझ्या नवऱ्याला रोज सकाळी डबा कोण बनवून देणार? माझ्या लहान मुलाला कोण सांभाळणार..? अशी एकंदरीत विचारसरणी महिलांच्या मनात दडलेली असते. प्रत्येक महिलेला वाटत असते की, आपण आजारी पडायला नको. नाहीतर या सगळ्यांचे हाल होतील. आणि हेच कारण  अनारोग्याचे मूळ बनते. ती महिला वेळीच आरोग्य सेवेपर्यंत पोहोचत नाही, आणि केव्हा कोलमडून पडते याचे तिलाही भान राहत नाही. मग दोष द्यायचा तरी कोणाला?
स्वतःच्या आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष. सगळया स्त्रियांमध्ये आढळणारा हा एक समान गुण. गृहिणी स्वतः लक्ष देत नाही म्हटल्यावर घरातले इतरही तिची काळजी घेत नाही. आणि मग इथूनच सुरू झालेले आजार उतारवयापर्यंत आपले पाय घट्ट रोवतात.
आजकल धावपळीत प्रत्येकजण इतका अडकून गेला आहे की, आपल्या आरोग्यासाठी वेगळा वेळ देणे कठीण होऊन गेले आहे. प्रत्येकाने आपल्या शरीराचं आरोग्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे नाहीतर आपलं मन कदापि खंबीर आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही, असा गौतम बुद्धांनी म्हटलंय.  या त्यांच्या संदेशाचे थोडे आत्मचिंतन केल्यावर लक्षात आले की, आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य बाबतही किती निष्काळजीपणा दाखवतो.
कधीकधी थोडी- थोडी दुखणारी पाठ, कंबर, डोकं याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर कधी दिवसागणिक वाढत चाललेल्या या नॉर्मल आजाराकडे दुर्लक्ष करण्याची आपण चूक करतो. थोडक्यात आपण आपल्या शरीराला काय पाहिजे हे गृहीत धरत नाही. मग, एक दिवस हेच शरीर दुर्धर आजारपणामुळे बंड करुन उठते आणि आपले सगळे व्यवहार ठप्प करून टाकते. परिणामी, सक्तीने विश्रांती घेण्याशिवाय आपल्या समोर काहीच पर्याय उरत नाही. डॉक्टरांची अव्वाच्या सव्वा बिले पाहून तर चक्कर यायची वेळ येते. कामाच्या धबडग्यात आजकाल प्रत्येक वेळी थोडंसं काही दुखलं-खुपलं की लगेच डॉक्टरकडे धावता येत नाही. कधी- कधी वेळेअभावी तर कधी घरच्या घरी घरगुती उपचारांवर आपला अधिक विश्वास असल्याने आपण योग्य उपचारांना टाळण्याचाच प्रयत्न करतो.
बऱ्याचदा काही गंभीर आजारांचे निदान केवळ दुर्लक्ष झाल्यामुळे पुढे येते. काही प्रसंगात तर वेळही आपल्या हातून निघून गेलेली असते. स्त्रियांमध्ये वयोमानानुसार अनेक बदल घडत असतात. त्यामुळे योग्य वेळी सावधपणा दाखवून जरुरी असलेले उपचार करून घेण्यातच शहाणपण आहे. आपल्याकडे स्त्रियांमध्ये थायरॉईड, कर्करोग, स्तनांचा कर्करोग, मासिक पाळीच्या समस्या, लठ्ठपणा, रक्ताची कमतरता, आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता हे सर्वसाधारणपणे आढळणारे आजार आहेत. त्यातले काही जीवघेणेही आहेत. त्यामुळे ठराविक वेळेनंतर आणि विशेषतः लग्न करण्यापूर्वी सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचा नियम प्रत्येकीने स्वतःहून स्वतः साठी  बनवून घ्यायला हवा.
घरातल्या इतर सदस्यांची काळजी घेताना आपली नोकरी संसार सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडेही आपण दुर्लक्ष करत आहोत हे महिलांनी विसरता कामा नये. घरातली स्त्री सुदृढ असेल तर घरही सुदृढ होईल.दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...