Ticker

10/recent/ticker-posts

प्रत्येकाने सार्वजनिक वाहनांचा वापर करावा


-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
मुंबईतील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून शहरातील वाहनांची वाढती संख्या पार्किंगच्या समस्येत भर घालत आहे. वास्तविक, मुंबईत रस्त्यांचे प्रमाण कमी आहे. शहरात केवळ दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. मुळात रस्त्यांच्या लांबीत वाढ करणे शक्य नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत वाढ करणे गरजेचे आहे. सध्या शहरात मेट्रोचे जाळे विणण्याचे काम सुरू आहे; मात्र आतापर्यंत वेगवेगळ्या भागात सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. खरेतर नागरिकांनीदेखील खाजगी वाहनांचा कमीत कमी वापर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 



काही दिवसांपूर्वी टीव्ही वर एक जाहीरात दिसत होती. एक पत्नी आपल्या पतीकडे डायमंडची मागणी करते. तुमची बचत होत असल्याने ती गिफ्ट मागते. मग बचत कशी झाली, असे पती विचारतो. तेव्हा ती सांगते तुम्ही मित्र एकाच वाहने जात असल्याने पेट्रोलसाठी होणारा खर्च वाचतो. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत होत असल्याचे ती सांगते. पेट्रोल आयातीवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. तर दुसऱ्या बाजूला वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी सह प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. ही जाहिरात खूपच काही सांगून जाते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात खाजगी वाहनांचा वापर कमी केल्यास वाहनांची गर्दी कमी होईल. यासह पेट्रोलची देखील बचत होईल.


मुंबईत कितीही प्रयत्न झाले तरी जोपर्यंत नवीन वाहन येणे थांबत नाही तोपर्यंत मुंबईतील पार्किंग आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. बाहेरील देशांमधल्या नवीन वाहन खरेदी करायचे असल्यास तुम्ही राहत असलेल्या सोसायटी किंवा नोकरी करीत असलेल्या ऑफिसचे पार्किंग उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक आहे. असाच नियम मुंबईतही लागू करणे गरजेचे आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत दारू पाठोपाठ वाहन विक्रीतून सर्वात जास्त महसूल जमा होतो. प्रत्येक वर्षांला संदेश हजार कोटी महसूल वाहन विक्री आणि नोंदणीतून सरकारला मिळतो. त्यामुळे नवीन वाहन खरेदी थांबविणे सरकारला परवडणारे नाही. 



मुंबईसारख्या शहरात दररोज सरासरी पन्नास किलोमीटर प्रवास होत असतो. यासाठी दररोज दोन ते तीन लिटर पेट्रोल किंवा डिझेल, सीएनजी सारख्या इंधनाचा खर्च होतो. म्हणजे इंधन खर्च दोनशे आणि टोल तसेच गाडीचा मेंटेनन्स खर्च, रोजचा पार्किंग खर्च याचा विचार केला तर सरासरी आपल्या वाहनावर दररोज ३०० रुपये खर्च होतो. त्याच अंतरासाठी सार्वजनिक वाहनांचा बस, रिक्षा, टॅक्सी, लोकलचा मार्ग अवलंबला तर दिवसाला ५० रुपयेही खर्च होत नाही. मुंबईत नाक्यानाक्यांवर या वाहनांची उपलब्धता असते. रिक्षा, टॅक्सी बऱ्याच मार्गांवर शेअरमध्ये उपलब्ध असल्याने स्टेशन ते ऑफिस फक्त दहा रुपयांत प्रवास करता येतो. पण, जर का आपण स्वतःची गाडी असली की ती रिकामी घेऊन जातो. कारमधील अन्य सीट रिकाम्या असतात. म्हणजे तीन ते चार माणसांचा खर्च आपण आपल्या एकटयावरच करत असतो. याशिवाय, वाहतूक कोंडी, अन्य तणाव याचा त्रास खूप सहन करावा लागतो. बस आणि रेल्वेच्या गर्दीबाबत मनात भीती बाळगली जाते. पण, ती अनाठायी आहे. बस आणि रेल्वेच्या इतक्या फेऱ्या सातत्याने होत असतात की, काही ठराविक वेळ सोडली तर कोणालाही सहजपणे त्यात प्रवास करणे शक्य होईल. विशेष बाब म्हणजे रेल्वे प्रवासी एकमेकांना सहकार्य करण्यात तत्पर असतात. एखादी महिला किंवा ज्येष्ठ व्यक्ती आली तर तिला आपली जागा रिकामी करून देण्याचे सौजन्य सगळेच दाखवितात.


सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्यांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यावर भर दिला तर ३०टक्के वाहने कमी होतील. रस्त्यावरील कोंडी कमी होईल. दुसरीकडे खाजगी वाहनांचा वापर प्रत्येकवेळी करण्यात येत असल्याने एखाद्या ठिकाणी पार्किंग केल्यास पार्किंग सुविधा नसल्यास रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. अशा वेळी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. त्यामुळे मुंबईत प्रत्येकवेळी वाहतूककोंडी होऊ नये यासाठी प्रत्येकाने खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा. जेणेकरून, मुंबईत वाहतूक कोंडी होणार नाही. सार्वजनिक सेवा ही सर्वांसाठी आहे, सुरक्षित आहे मग स्वतः च्या वाहनासाठी आग्रह कशासाठी धरायचा? आपणच आपली मानसिकता बदलली तर पेट्रोल, डिझेलची बचत करू शकतो.




Everyone should use public transport

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. आपला लेख वाचला.लेखात म्हटल्याप्रमाणे सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास वाहतूककोंडी होणार नाही. लोक आपली वाहने बाहेर काढणार नाहीत. छान लेख 👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्येकाने सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास वाहतुकोंडी कमी होईल.छान लेख.

    उत्तर द्याहटवा
  3. छान लेख.प्रत्येक नागरिकाने हा लेख वाचून त्यात सांगितलेल्या सूचना अंमलात आणल्यास वाहतूककोंडी होणार नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. मुंबईत प्रत्येकवेळी वाहतूककोंडी होऊ नये यासाठी प्रत्येकाने खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा. छान लेख.🙏🙏

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.