महापूर मानवनिर्मितच
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक पाऊस पडण्यासाठी देवाकडे साकडे घालताना दिसून येत होता. पण, गेल्या दहा-पंधरा दिवसात महाराष्ट्रातील काही भागांत एवढा पाऊस पडला की, कोल्हापूर, सांगली, कराड येथील नागरिकांचे संसार अक्षरशः पाण्यात वाहून गेले. एनडीआरएफ, नौसेनेच्या जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावत पुरात अडकलेल्यांना बोटीद्वारे बाहेर काढले.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच बेळगाव जिल्यातील सीमावर्ती भागातही या पुराचा प्रचंड तडाखा बसला आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलंयकरी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाच प्रामुख्याने कारणीभूत आहेत. त्यामुळे सरकार, प्रशासन आणि जनतेला दोन्ही हात वर करून केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही.
महाराष्ट्रातील बऱ्याच नद्यांच्या पात्रातील वाळू उपसा केल्याने त्यांचे निसर्गचक्रही बिघडले नदी ठिकाणी गाळ साठला आहे. नद्यांची पात्रे अरुंद झाली असून नद्यांच्या पात्रापर्यंत शेत जमीन तयार करून उसाची शेती नदी काठापर्यंत करण्यात आली आहे. या परिणामामुळे नद्यांच्या पात्रात पाणी कमी आणि उभ्या पिकांमध्ये अधिक अशी अवस्था बऱ्याच जिल्ह्यांत आपणास बघावयास मिळत आहे. नद्यांच्या पूरनियंत्रण रेषेत झालेली बांधकामे, धरणांचे अतिरिक्त पाणी एकाच वेळी सोडावे लागण्याचे संकट, नद्यांच्या रचनांमधील फेरबदल, नद्यांवरून जाणाऱ्या रस्त्यांमुळे अडणारे पाणी आदी मानवी चुकांचा मोठा फटका महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला आहे.
डोंबिवली, कल्याण आणि त्यापुढील उपनगरांत याच पावसात पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यासही माणूस मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे वाढते नागरीकरण करण्याबरोबरच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या परिसरावर अतिक्रमणे वाढत गेली. त्यांना नियोजनपूर्वक काही आकार देण्याऐवजी अनधिकृत बांधकामांना कामाचा पुरस्कार देण्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणा धन्य समजू लागल्या. त्याच वेळी नव्याने उदयास येणाऱ्या वस्त्या, कॉलनी तसेच गृहनिर्माण संस्था, सोसायटी येथील लोकांना मातीही शत्रुत्व वाटू लागली आणि दिसली मोकळी जागा की बनवा काँक्रीटचा रस्ता किंवा पेव्हर ब्लॉकचे रस्ते आणि मग पाणी मुरायला जागा तरी कुठे? एकीकडे जंगले, जमीन वाचवण्याचे नारे द्यायचे आणि प्रत्यक्षात आपणच जंगले तोडून काँक्रीटचे रस्ते, बंगले बांधायचे. आणि मग निसर्ग तरी तुम्हाला कसा सोडणार..?
वरील विविध कारणांवरून अख्ख्या महाराष्ट्रात पूरस्थिती ओढवण्यास माणूसच कारणीभूत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये कारण निसर्गाचे स्वतःचे काही नियम आहेत. त्यात जर कोणी हस्तक्षेप केला, त्यात ढवळाढवळ केली तर निसर्ग चक्रात असंतुलन निर्माण होऊन सुका दुष्काळ, ओला दुष्काळ, पूर, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींना माणसाला तोंड द्यावे लागते. कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्त नागरिकांपैकी काही सुजाण नागरिकांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'येथील नद्यांतून वाळूउपसा, नदीकाठी, किनारी पाण्याचे स्त्रोत बुजवून त्याठिकाणी हॉटेल, बंगले बांधले गेले आहेत. असे निसर्गावर अतिक्रमण केले तर नद्यांचे पाणी माणसांच्या वस्तीत शिरणारच.' माणसाने जर पाण्याची जागा घेतली, तर पाणी माणसाच्या जागा घेणारच ना!' आता या महापुरातून सरकार काही तरी बोध घेईल, स्थानिकांनी पाण्याचा प्रवाह बदलू नये. तसेच नदी, नाल्यांवर अतिक्रमणे होऊ नयेत. याकरिता कठोर कायदे बनवून त्याची तातडीने अंमलबजावणी करेल. अशी आशा करावयास हरकत नाही.
2 टिप्पण्या
Good article. Salute to indian Force.
उत्तर द्याहटवाSuperb Article.
उत्तर द्याहटवाPlease do not enter any spam link in the comment box.