महाराष्ट्रातील देवीची साडेतीन शक्तिपीठे
-दादासाहेब येंधे
पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसतांना गेली. या यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही. त्यामुळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर हातात घेऊन महादेव त्रैलोक्यात हिंडू लागला. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक्र सोडले व सतीच्या शरीराचे ५१ तुकडे ठीकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पाडले हीच देवीची ५१ शक्तीपीठे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. अशी आख्यायिका आहे. त्यात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती, माहुरची महाकाली माता, तर वणीची सप्तशृंगी देवी ही पीठे आहेत.
कोल्हापूरची महालक्ष्मी
कोल्हापूरचे महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. मात्र, हे देवाले शिलाहारापूर्वी कऱ्हाड येथील सिंधू सिंधुवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. कोल्हापूरच्या शिलाहारांनी आपल्याला देवीचा प्रसाद मिळाल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे, तर सातव्या शतकात राजा कर्णदेव याने हे मंदिर बांधले याचाही उल्लेख आढळतो. विद्वानांच्या मते सध्याच्या मंदिराचा जो जुना भाग आहे, त्याचे बांधकाम चालुक्याच्या उत्तर काळात झाल्याचा अंदाज आहे.
कोल्हापूरच्या आजूबाजूला मिळणाऱ्या काळया दगडात देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले बांधलेले आहेत. मंदिराचे शिखर व घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले याचा उल्लेख आढळला आहे. हे देवालय एखाद्या फुलीप्रमाणे दिसते. हेमाडपंती वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून त्याच्याकडे पाहता येते. देवळाची बांधणी एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठ्या चौकोनी दगडात केलेली असून मंदिर पश्चिमा भिमुख आहे.
प्रवेशद्वारावर नगारखानाही आहे. देवळाच्या निरनिराळ्या ठिकाणी अनेक शिलालेख सापडले आहेत. मंदिरात दर शुक्रवारी देवीची मिरवणूक काढण्यात येते. कार्तिक आणि माघ महिन्यात एका विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून महालक्ष्मीच्या चरणावर पोचून हळूहळू मस्तकाला स्पर्श करतात, हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. नवरात्रात येथे तर यात्राच भरते.
श्रीक्षेत्र माहूरची रेणुका माता
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुकामाता होय. श्रीपरशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ शतकात देवगिरीच्या यादव कालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते.
तुळजापूरची तुळजाभवानी (भगवती)
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजाभवानी हे एक पूर्ण शक्तिपीठ. ही देवी भगवती किंवा तुळजाभवानी म्हणून प्रसिद्ध आहे. राजेश्री छत्रपतींची ही आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची तुळजाभवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. बालघाटाच्या कड्यावर वसलेल्या या तुळजाभवानीच्या मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता, ऊर्जा व तुळजा या नावाने ओळखली जाते. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून तुळजाभवानीला मान आहे. कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी तिने आशीर्वाद दिला. त्यामुळे येथे विविध प्रदेशातून विविध जाती-पंथांचे भाविक येतात. मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास 'परमार' दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या भक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केल्याचा श्लोक या दरवाजावर कोरला आहे. सभामंडपात पश्चिमेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात पूर्वाभिमुख अशी तुळजाभवानीची प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंडकी शिळेची असून अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे तिचे रूप आहे. मातेची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून तीन वेळा ही मूर्ती मंचकी विसावते, असे इतरत्र कोठेही आढळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी छोटी आकर्षक शिल्पे आहेत.
श्री क्षेत्र वनीची सप्तशृंगी देवी
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे पाचशे पायऱ्या, मंदिर सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम नव्याने येथे करण्यात आलेले आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. येथे नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.
अशी महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.