चेंजिंग रूममधील छुप्या कॅमेऱ्यापासून पासून सावधान

एखादा छुपा कॅमेरा तुमच्या ड्रेसिंग रूममधील हालचालींवर नजर ठेवत तर नाही ना! 

-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmai.com)

सणवार म्हटले की गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक जण खरेदी करत असतो. त्यातच सध्याच्या बदलत्या लाईफ स्टाईलमुळे अनेक तरुण-तरुणींची पावले आता बाजारात खरेदी करण्याऐवजी शॉपिंग मॉल्स कडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत. शॉपिंग मॉल मधील झगमगाट, आकर्षक जाहिराती वस्तूवरील सेल, मोठमोठी दालने तसेच खाणेपिणे या सर्वांचे जबरदस्त आकर्षण. त्यामुळे या कडे तरुण-तरुणी, महिला अधिक फिरताना दिसतात. अलीकडे मॉल्स संस्कृतीमुळे खरेदीलाही उधाण आले आहे. कोणाला साडीचे असतं तर कोणाला ड्रेसचं आकर्षण असते. या साडीमध्ये किंवा या ड्रेसमध्ये आपण कसे दिसतो याची उत्कंठा सर्वांनाच असते. आपण घेतलेल्या किंवा घेत असलेला ड्रेस आपल्याला कसा उठून दिसतो, तो आपल्याला योग्य पद्धतीने बसतो का?, त्याचा रंग आपल्या शरीरावर कसा दिसेल? इतक्या बारीक-सारीक गोष्टींकडे तरुण-तरुणींचे लक्ष असते. हे सर्व पाहण्यासाठी दुकानदारांनी ड्रेसिंग रूम बनवलेली असते. 

तरूणी हातात नवीन ड्रेस घेऊन अतिउत्साहिपणाने त्या ड्रेसिंग रूमकडे जुना ड्रेस काढून नवीन ड्रेस किंवा साडी परिधान करण्यासाठी आत जातात तेव्हा सर्व तरुणींना व महिलांनी सावध राहण्याची गरज आहे. कारण एखादा छुपा कॅमेरा तुमच्या ड्रेसिंग रूममधील हालचालींवर नजर ठेवत तर नाही ना! याची खबरदारी शॉपिंग मॉल मध्ये किंवा दुकानात कपडे खरेदी करताना प्रत्येकीने घेतली पाहिजे.

मोठ्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करायची... तेथील मॅकडोनाल्ड्स सारख्या हॉटेलमध्ये जाऊन भरपेट पोटपूजा करत ताव मारायचा... ही कॉलेजमधील तरुण-तरुणींची फॅशन नव्हे गरज बनली आहे. तरुण-तरुणीबरोबर, महिलाही शॉपिंगच्या खरेदीवर अधिक पसंती दर्शवितात. ट्राउझर, टी-शर्ट आणि फॅशनेबल कपडे विकणाऱ्या दुकानांमधील चेंजिंग रूम किंवा तेथील रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतागृह किती सुरक्षित आहे याकडे कोणाचेही लक्ष नसते. किंवा याचा कोणी विचारही करीत नाही. त्यामुळे आपण राहिलेल्या बेफिकिरीमुळे आपला घात होतो. अशा मॉलमध्ये शॉपिंग करणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणींनी महिलांनी सावध राहणे ही आजच्या काळाची गरज आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आदी मोठ्या शहरांमध्ये मॉलचे साम्राज्य सुरु झालेले आहे. उच्चभ्रू लोक मॉलमधील खरेदीवर अधिक जोर देतात. यातील काही विशिष्ट मॉल्स वगळता उर्वरित बहुसंख्य मॉल्समध्ये सुरक्षा व्यवस्थेचे तर तीन तेरा वाजलेले आहेत.

गतवर्षी ठाणे येथील एका मोठ्या मॉलमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेला धक्कादायक अनुभव आला ती महिला टॉयलेटमध्ये गेली असता छताला लावून ठेवलेल्या एका मोबाईलद्वारे थेट व्हिडिओ शूटिंग सुरू असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने हा प्रकार टॉयलेट बाहेर उभ्या असणाऱ्या तिच्या पतीला सांगताच तो संतापला त्याने थेट नजीकच्या पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेत एका सफाई कामगाराला अटक केली. पोलीस चौकशीत अटक आरोपीने इतरही अनेक महिलांचे, तरुणींचे आपल्या मोबाईल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केल्याचे कबूल केल्याचे पोलिसांना सांगितले.

आज पुरुषांपेक्षा महिलाच प्रत्येक क्षेत्रात  आघाडीवर आहेत. मात्र, समाजात वावरत असताना या महिलांना पदोपदी समाजातील काही उपद्रवी पुरुषांचा अत्यंत वाईट अनुभव येत असतो असे असभ्य वर्तन करणाऱ्या पुरुषांना आता वेळीच धडा शिकवायला हवा. सगळेच पुरुष वाईट नसतात. परंतु, काही विकृत मनोवृत्तीचे पुरुष महिलांना सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा विकृत पुरुषांकडून महिलांवर अत्याचार होतात. त्यावेळी इतर सुसंस्कृत पुरुषांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता पीडित महिलांच्या मदतीला धावून आले पाहिजे. हॉटेलमधल्या रुम, मॉल्सच्या चेंजिंग रूम, टॉयलेट, बाथरूम ही ठिकाणे महिलांसाठी आणि तरुणींसाठी धोकादायक बनत आहेत. तिथल्या छुप्या कॅमेराच्या नजरेपासून स्वतःला कसे वाचवता येईल याचा प्रथमत: सर्वांनी विचार केला पाहिजे. 

चेंजिंग रूममध्ये गेल्यावर प्रथम मुलींनी, महिलांनी चेंजिंग रुमच्या आरशाला, आजूबाजूला जिथे जिथे तुम्हाला संशय वाटेल अशा ठिकाणी हात लावून तपासून पहावे की कुठे छुपा कॅमेरा तर नाही ना? याची खात्री झाल्यानंतरच कपडे बदली करा. इथे घाई करणे म्हणजे आपल्या इभ्रतीशी खेळण्यासारखे आहे. हे कायम लक्षात असू द्या. चेंजिंग रूममध्ये कोणी आपल्यावर नजर ठेवून तर नाही ना याची खात्री करा. काही स्त्रीलंपट दुकानदार किंवा मॉल, शॉप, भाड्याने घेतलेल्या शॉपमध्येही असे घृणास्पद प्रकार करतात. याकडे डोळेझाक नको.

चेंजिंग रूममध्ये कपडे पडताळून पाहून गप्प न बसता आतील फॅन, लाईट आदी वस्तूंनाही हात लावून तपासून घेतले पाहिजे. रूममधील, हँगरमध्येही छुपा कॅमेरा असेल यातही शंका नाही. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे तुम्ही ज्या आरशासमोर कपडे चेंज करत आहात तो आरसाही तुम्हाला धोका देऊ शकतो. आरशामध्ये ही कॅमेरा असू शकतो हे ओळखायचे असेल तर तुम्ही तुमच्या हाताचा पंजा आरशातल्या प्रतिमेपासून थोडासा लांब आहे असे वाटल्यास तर तो आरसा आहे असे समजा. पण, तो पंजा प्रतिमेला चिकटला तर त्या आरशात काहीतरी गडबड आहे आणि संशय घेण्यासाठी जागा आहे असे समजा.

इथे तुम्ही सावध राहिले पाहिजे. असा प्रकार आढळताच तात्काळ याची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्यात कळवावी. जेणेकरून, इतर महिलांना त्याचा त्रास होणार नाही. अनोळखी दुकानात किंवा मॉलमध्येही खरेदी करताना ते दुकान खात्रीशीर आहे का... हे नीट पडताळूनच मुलींनी चेंजिंग रूममध्ये जावे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हा ब्लॉग शोधा