-दादासाहेब येंधे
मुंबई पोलीस! या नावातच सर्व काही आहे... एखाद- दुसऱ्याने वाईट काम केले म्हणून संपूर्ण मुंबई पोलीस खाते बदनाम होणार नाही. त्याला विशेष म्हणजे बदनामी करणारे एक..दोन आहेत. मात्र, खात्याची प्रतिमा उंचावणारे अनेक आहेत. त्यापैकीच एक नाव आहे. पोलीस नाईक रेहाना नासिर शेख (बागवान). रेहाना शेख यांनी कोरोना संकटकाळात कर्तव्यापलीकडे जाऊन माणुसकी जपली. याचीच दखल घेऊन मुंबई पोलीस दलाचे आयुक्त हेमंत नगराळे व पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस नाईक रेहाना शेख यांना प्रशिस्तपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.
गेल्या दिड वर्षांपासून देशात कोरोनाचे संकट आले. या संकटकाळात मुंबई पोलीस सर्व अधिकारी-कर्मचारी आपापल्या परीने रात्र न दिवस कर्तव्य बजावू लागले. या संकटकाळात अनेक पोलिसांनी कौतुकास्पद कर्तव्य बजावले, तर कोणी कर्त्यव्यापलीकडे जाऊन माणुसकी जपली. या पोलिसांमध्ये आवर्जून उल्लेख करणारे नाव म्हणजे श्रीमती रेहाना नासिर शेख (बागवान) यांना कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली. कोरोनावर मात करून त्यांनी कर्तव्य बजावताना रायगड जिल्ह्यातल्या ज्ञानाई विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेतले. तसेच कोरोनाच्या उपचारात संजीवनी ठरलेल्या प्लाझ्मा थेरपीसाठी रेहाना शेख (बागवान) यांनी मोलाचे योगदान दिले. कोरोना बाधित होणाऱ्या पोलीस तसेच सर्वसामान्यांसाठी त्यांनी प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. त्यामुळे अनेकांना आजच्या घडीला जीवनदान मिळाले आहे.
कोरोना संकटकाळात पोलीस नानाईक रेहाना शेख (बागवान) यांनी आपल्या कर्त्यव्यापलीकडे जाऊन जपलेल्या माणुसकीची दखल मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे व पोलीस सह-आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी घेतली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याहस्ते रेहाना नासिर शेख (बागवान) यांना स्मृतिचिन्ह व प्रशिस्तपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आपण पोलीस खात्याची मान आणखी उंचावली, असे गौरवोद्गार पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याप्रसंगी काढले.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.