१२/२/२०

महिला कल्याणासाठीचे कायदे

महिला कल्याणासाठीचे कायदे
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
आधुनिक काळात मानवाच्या नीतिमूल्यांतील घसरणीमुळे आणि वाढत्या औद्योगिक विकासामुळे महिलांचे शोषण अधिक प्रमाणात वाढले आहे. कौटुंबिक हिंसाचार हा सध्या वाढत चाललेला महिलांच्या स्वातंत्र्याविरुद्ध वाद. एकवेळ महिला घराबाहेर सुरक्षित राहतील; परंतु स्वत:च्याच घरात त्यांना असुरक्षित वाटू शकतं. हुंडा, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन, घटस्फोट, गर्भलिंग अशा विविध कारणांवरून महिलांना मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागतो आहे. त्यासाठी स्त्रियांवर होणा-या निरनिराळ्या अत्याचारांपासून व कौटुंबिक हिंसाचारांपासून तिला संरक्षण व हक्क प्राप्त करून देण्यासाठी आजपर्यंत काही कायदे अस्तित्वात आलेले आहेत.
हुंडा प्रतिबंधक कायदा :
१९६१च्या कायद्यान्वये हुंडा मागणे आणि हुंडा देणे गुन्हे आहेत. हा कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी भारतीय दंड संहितेमध्ये ३०४ (ख) आणि ४९८ (क) ही नवीन कलमे अंतर्भूत आहेत.
महिला संरक्षण कायदा :
कौटुंबिक छळ (महिला संरक्षण) प्रतिबंधक कायदा स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व शारीरिक संरक्षण देतो. हा कायदा फक्त पुरुषांविरुद्धच लागू होतो. यात अंतरिम आदेश देणे, नुकसानभरपाई देणे, संरक्षण अधिका-याची नियुक्ती करणे, भागीदारीच्या घरात राहण्याचा अधिकार, कायदेशीर व वैद्यकीय मदत देण्याची तरतूदही आहे.
अश्लीलताविरोधी कायदा :
भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ ते २९४ मध्ये महिलांशी अश्लील वर्तन करणा-यांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे जाहिराती, पुस्तकं, चित्र आदी माध्यमांतून महिलांची विटंबना करणा-या चित्र किंवा लेखनातून अश्लीलता सादर करणा-याविरोधी कायदा १९८७ नुसार वॉरण्टशिवाय अटक करण्याचा अधिकारही आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायदा :
बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी ‘बालविवाह प्रतिबंधक अधिनियम (शारदा अ‍ॅक्ट)’ १९८७ मध्ये सुधारणा झाल्या आहेत. लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान १८ आणि मुलाचे वय २१ वर्षाहून कमी असल्यास शिक्षेची तरतूद आहे. हा कायदा सर्व जाती-धर्माच्या लोकांना सारखाच लागू आहे.
कौटुंबिक न्यायालय कायदा :
दाम्पत्य व कौटुंबिक कलहाची प्रकरणे एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी कौटुंबिक अधिनियम १९८४ लागू करण्यात आला आहे. कुटुंब न्यायालय नसल्यास तिथल्या जिल्हा कोर्टाना कुटुंब न्यायालयाचा दर्जा देण्यात आला आहे.
छेडछाड करणे गुन्हा :
स्त्रीची अब्रू लुटणे, हात धरणे, तिच्या वस्त्रांना हात घालणे अशा प्रकारे विनयभंग करणा-यांना भारतीय दंड संहिता ३५४ खाली शिक्षेची तरतूद आहे. तसेच छेडछाड केल्याबदल भारतीय दंड संहिता कलम ५०९ अंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल करता येते.
मुलावर हक्क :
एखाद्या स्त्रीचा घटस्फोट झाल्यास तिच्या पाच वर्षापर्यंतच्या मुलांना ती स्वत:जवळ ठेवू शकते. मात्र पाच वर्षाहून अधिक वयाच्या मुलांच्या बाबतीत कोर्टाचा निर्णयच बांधील असतो.
समान वेतन कायदा :
समान वेतन कायद्यानुसार एकाच कामासाठी स्त्री व पुरुष दोघांना समान वेतन मिळाले पाहिजे. विशिष्ट कार्यक्षेत्रातील नोक-या सोडता अन्य ठिकाणी स्त्रियांना रात्रपाळीला कामाला बोलावता येत नाही.
लैंगिक गुन्हे :
लैंगिक गुन्ह्यांसंबंधात भारतीय दंडसंहिता कलम ३७५ व ३७३ अनुसार कडक शिक्षा देण्यात येतात. लैंगिक प्रकरणाची सुनावणी कोर्टाच्या बंद खोलीत होते.
हिंदू उत्तराधिकार :
१९५६ मध्ये निर्माण झालेल्या हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार महिलांना संपत्तीमध्ये व्यापक अधिकार देण्यात आले असून स्त्रीधनाचा उपभोग घेण्याचा आणि ते धन खर्च करण्याचा अनिर्बंध अधिकार स्त्रीला मिळाला आहे. हिंदू स्त्रीला एकत्र कुटुंबाच्या संपत्तीतसुद्धा वाटणी मागता येते. स्त्रीधन मिळावे म्हणून स्त्री कोर्टात खटला दाखल करू शकते. स्त्रीला मुलाप्रमाणेच वडिलोपार्जित संपत्तीमध्येही समान हक्क दिला गेलाय.
हिंदू विवाह कायदा :
भारतीय दंड संहिता कलम १२५अनुसार स्त्रीला पोटगीची मागणी करण्याचा हक्क आहे. हिंदू विवाह कायदा १९५५ कलम २५नुसार अर्ज दाखल केल्यानंतर कोर्ट पोटगीची रक्कम देण्याचे आदेश देते. पती-पत्नीच्या वादामधे निकाल लागेपर्यंतच्या मधल्या काळातसुद्धा पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी अंतरिम पोटगी रक्कम देण्याची तरतूद कायद्यात आहे.

प्रसूती सुविधा कायदा :
नोकरीपेशातील स्त्रियांसाठी बाळंतपणाची आणि नवजात बाळाची देखभाल करण्यासाठी रजेची तरतूद असून त्या काळात स्त्रीला विशिष्ट दिवसाची भरपगारी रजा मिळते. मात्र कायद्यानुसार ती रजा व इतर फायदे फक्त दोन बाळंतपणासाठी असतात. गर्भपात झाल्यावरही स्त्रीला भरपगारी रजा मिळण्याची तरतूद कायद्यात आहे.
विशेष विवाह अधिनियम :
विशेष विवाह अधिनियम १९५४च्या तरतुदीनुसार मानसिकदृष्टय़ा सक्षम आणि १८ वर्षे पूर्ण झालेली स्त्री प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह स्वत:च्या इच्छेनुसार करू शकते. या विवाहाची नोंदणी करणे आवश्यक असून पुरुषाचे वय २१ वर्षापेक्षा अधिक असावे.
गर्भिलग चाचणी :
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे व गर्भाचे लिंग जाणून घेण्याच्या तंत्राचा दुरुपयोग करणे यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रसूतीपूर्व निदान आणि तंत्रज्ञान विनिमय व दुरुपयोग निवारण अधिनियम १९९४ आहे.
नोकरीच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. खासगी, सार्वजनिक तसेच अन्य संस्थांमध्येसुद्धा ती लागू आहेत. लैंगिक चाळे आणि तक्रारी थांबवण्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर तसेच कर्मचा-यांवर आहे. तसेच, तक्रारींच्या झटपट निवारणासाठी प्रत्येक विभागात महिला अध्यक्षासह अध्र्यापेक्षा अधिक महिला असणारी समिती स्थापन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महिलांच्या अटकेसंबंधी :
महिलांना फक्त महिला पोलीस सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अटक करू शकतात. कुटुंबाच्या सदस्यांच्या उपस्थितीत व योग्य कारण असेल तरच स्त्रीला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावता येते. स्त्रीला अटक केल्यास तिला फक्त महिला कक्षामध्येच ठेवता येते.
या कायद्याअंतर्गत स्त्रियांना मिळणारे हक्क किंवा संरक्षण अधिक सक्षम होण्याकरिता २००६ साली ‘कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा २००५’ पारीत करण्यात आला. अत्याचारग्रस्त स्त्रीला लवकरात लवकर न्याय मिळावा या हेतूने या कायद्याची विशेष तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यामध्ये पीडित स्त्रीला साहाय्याचे आदेश मिळविण्यासाठीची कार्यप्रणाली दिली गेली आहे. त्याशिवाय पीडित स्त्रीला तिच्या हक्क बजावणीसाठी वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत निरनिराळे दावे करण्याची आता गरज राहणार नाही.


५/२/२०

नास्ता करा, आजार पळवा

नास्ता करा, आजार पळवा
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
शाळेत, कॉलेजला जाणारी मुले क्लासमध्ये लेक्चर चालू असताना झोपेची डुलकी का घेतात? अभ्यासात त्यांचं लक्ष का लागत नाही? ऑफिसला जाणाऱ्या मंडळींना सकाळी सकाळी जांभई का येते? त्यांना स्फूर्ती का नसते? घरातील काम करणाऱ्या गृहिणी दुपार होताच का थकून जातात? आपल्यातील बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे ना..? त्याचं एकमात्र कारण म्हणजे सकाळचा नास्ता न करणे.
खरेतर संतुलित आहारात नाश्त्याची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण रात्रभर व्यक्तीचं शरीर तथा मेंदू १० ते १२ तास कुठल्याही आहारापासून वंचित असते. आपले शरीर हे एखाद्या कारप्रमाणे असते. जोपर्यंत कारला पेट्रोल, डिझेल, गॅस मिळत नाही तोपर्यंत तिला आपण चालवू शकत नाही. त्याचप्रमाणे शरीरालाही चालवायला, दिवसातील विविध कार्य संपन्न करण्यासाठी शक्तीची गरज असते. जी आपल्याला सकाळी नास्ता (ब्रेकफास्ट) करण्याने मिळते. आपले पूर्वजदेखील या गोष्टीवर जोर देत होते आणि दररोज वेळ काढून नाश्ता करत होते. ज्यामुळे संपूर्ण दिवसभराची मेहनत ते न थकता करत होते. 
सध्याच्या धकाधकीच्या जमान्यात रात्री झोपण्यास उशीर होतो. परिणामी, सकाळी उठायला उशीर होतो. सकाळी वेळेची मारामारी. त्यामुळे सकाळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाश्त्याला जराही महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे दिवसभर आळस, सुस्ती वगैरे येते. या समस्यांपासून वाचण्यासाठी सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे. कारण शरीर आणि मेंदूला सगळ्यात प्रथम ग्लुकोज देणारा, त्याला सजक ठेवणारा नाष्टा हाच महत्त्वाचा खुराक आहे.
 नाश्ता (ब्रेकफास्ट) केल्यामुळे होणारे फायदे:-
संशोधनादरम्यान असे सांगण्यात येते की, जे व्यक्ती दररोज सकाळी नास्ता करतात ते लोक दिवसभर तंदुरुस्त राहतात. 
लहान मुलांची बुद्धी आणि स्मरणशक्ती तसेच क्लासमध्ये शिकण्याची इच्छा सकाळी योग्य नास्ता केल्याने वाढते.
सकाळी नाश्ता (ब्रेकफास्ट) केल्याने भूक कमी लागते आणि एकदम भरपेट खाण्याची इच्छा कमी होते. 
नास्ता (ब्रेकफास्ट) न केल्याने होणारे नुकसान:-
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नास्ता (ब्रेकफास्ट) न केल्याने हृदयरोग, स्थूलता, शारीरिक शक्ती तसेच स्मरणशक्तीत कमीपणा येतो. जे सकाळी नाश्ता करत नाही त्यांचे वजन अधिक असते. नाश्ता न केल्याने शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण बदलते आणि कोलेस्ट्रॉल वाढते. 
नास्ता (ब्रेकफास्ट)कसा असायला हवा:-
संपूर्ण रात्रभर काहीही न खाल्ल्याने शरीरातील प्रमाण घटत परिणामी सकाळी संतुलित मस्त २४ ते २५ टक्के कॅलरीज असा असावा नाश्त्यामध्ये योग्य प्रकार मात्रेमध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन तथा फायबरचा समावेश असणे गरजेचे आहे काय कार्बोहायड्रेट मध्ये हिरव्या भाज्या हिरवी फळे यांचा समावेश असणे गरजेचे आहे ते एनर्जी सोबतच फायबर देखील शरीराला पुरवितात पदार्थ जसे दूध अंडी, पनीर वगैरे घेणेदेखील लाभदायक आहे. तळलेला, चरबीयुक्त नाष्टा अशा पदार्थांचा समावेश करू नये. कमी किंवा त्यातून बनवलेले पदार्थ दही, पनीर वगैरे घेता येईल. त्यापेक्षा इडली, डोसा, अंड्याची पोळी, ज्वारी, बाजरी किंवा गव्हाची चपाती दूध, चहाबरोबर किंवा फळांच्या रसाबरोबर घेता येईल. लहान मुलांनाही त्याची सवय करून देणे गरजेचे आहे. त्यामुळेच स्वस्थ जीवनासाठी कोणीतरी खरंच म्हटले आहे की, नाश्ता करावा राजासारखा, दुपारचे जेवण राणीसारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे.
दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...