Ticker

10/recent/ticker-posts

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ

'हरु नका, मरू नका, जगायला शिका,

-दादासाहेब येंधे

कोवळ्या वयात विवाह, लादलेली बाळंतपणे, दिवस-रात्र करावे लागणारे काबाडकष्ट, दोन वेळचे जेवण मिळतानाही सहन करावी लागणारी उपेक्षा, प्रसंगी छळवणूक; आज एकविसाव्या शतकातही देशातील काही महिलांच्या वाट्याला येणारं जीवन याहून वेगळे नाही. आपल्या नशिबाचे भोग म्हणून बहुतेक महिला मुकाट्याने त्याला सामोऱ्या जातात. काही या परिस्थितीवर मात करून प्रगतीपथावर जातात. तर काही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतात. सिंधुताई सपकाळ यांनी मात्र या दोन्ही गोष्टी केल्या. त्यांनी हार न मानता परिस्थितीशी दोन हात केलेच. शिवाय  अन्यायालाही वाचा फोडली. स्वतः बिकट परिस्थितीतून जात असताना इतरांसाठी मदतीचा हात पुढे केला आणि त्यातून साकारत गेले अनाथांसाठीचे त्यांचे मोठे सामाजिक कार्य. आई-वडिलांच्या मायेपासून वंचित असणाऱ्या हजारो मुला-मुलींना सिंधुताईंनी आपलेसे केले. आपली लेकरे समजून त्यांच्या डोक्यावर मायेचे छत्र  धरले. काबाडकष्ट करीत खस्ता खात आणि समाजाकडून मदत गोळा करीत त्यांना आयुष्यात उभे केले. 


तीन दशकाहून अधिक काळ अनाथांची माय बनून राहिलेल्या सिंधुताईचा जीवन प्रवास आता त्यांच्या जाण्याने थांबला आहे. आपल्या वाट्याला आलेल्या जगण्याची रडकथा न गाता समाज उभारण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या सिंधुताईंच्या संघर्षाची कहाणी आणि त्यांचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. खूप मोठा संघर्ष करावा लागला म्हणून आयुष्याबद्दल आणि समाजाबद्दल त्यात कडवट झाल्या नाहीत. 'मी आई आहे, म्हणून सारे सहन करते,' असे सांगत त्या केवळ आपल्या मुलांच्या नव्हे तर हजारो लेकरांच्या आई बनल्या.   प्रत्येकाचे जीवन दुःखद घटनांनी भरलेले असते या दुःखांना न  घाबरता आयुष्याला भिडण्याचा सल्ला सिंधुताई नेहमी देत. 'हरु नका, मरू नका, जगायला शिका,' असे त्या कायम सांगत त्यांची ही उक्ती स्वानुभवातून आलेली होती. म्हणूनच त्यांची उक्ती आणि कृती यात अंतर नव्हते. अनाथांबद्दल त्यांना कमालीची तळमळ होती. आपल्या मुलांना उत्तम महत्त्व असे सारे काही मिळावे यासाठी त्यांची धडपड सच्ची होती. म्हणूनच त्यांच्या हाकेला ही समाजाकडून 'ओ' मिळत गेला.


सिंधुताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली तरी प्रेरक आहे. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेल्या सिंधुताईंची कथा याहून वेगळी नाही. अतिशय गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. मुलगा हवा असताना मुलगी झाली म्हणून द्वेषाने त्यांना सगळे 'चिंधी' म्हणायचे. चिंधी म्हणजे एक फाटलेल्या कापडाचा निरुपयोगी तुकडा हे आपणास माहितच आहे. केवळ नऊ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह एका सव्वीस वर्षांच्या तरुणाशी लावण्यात आला. तीन मुलींना जन्म दिल्यानंतर चौथ्या वेळी गर्भवती असताना कुटुंबकलह झाले. यामधून त्यांच्या पतीने बेशुद्ध होईपर्यंत त्यांना बेदम मारहाण केली आणि नाजूक परिस्थितीमध्ये त्यांना घराबाहेर अक्षरशः हाकलून दिलं. दरम्यान त्यांनी एका गाईच्या गोठ्यात मुलीला जन्म दिला आणि तिथून सुरू झाला सिंधुताईंच्या संघर्ष.


बेघर झाल्यानंतर त्या भटकत राहिल्या. पोटात भुकेचा आगडोंब घेऊन हिमतीने उभे राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अन्नाच्या एका तुकड्यासाठी स्मशानभूमीत देखील फिरल्या, प्रेतावर ठेवलेले नैवेद्य अन्न म्हणून त्यांनी खाल्ले.  स्मशानात प्रेत जाळायला येणारे लोक त्यांना पीठ आणि पैसे देऊ लागले त्यांनी तिथे वरचं निखाऱ्यावर भाकरी करून दिवस काढले.अशा अनेक रात्री स्मशानभूमीत घालवल्या. 


नंतर पुण्यात एक अनाथ मुलगा रस्त्यावर रडत बसला होता. त्याला घेऊन पोलिसांत तक्रार नोंदवण्यासाठी त्या गेल्या असता त्यांची तक्रारही कोणी घेतली नव्हती. या मुलांचा सांभाळ करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यावर त्यांना काही दिवसांनी अशीच अनाथ असलेली आणखी काही मुले आढळली. त्यांचाही सांभाळ त्यांनी सुरू केला. या अनाथ मुलांसाठी त्यांनी 'बालसदन' ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आणखी अनेक मुला-मुलींना आश्रय दिला. या आश्रमाद्वारे मुलांच्या राहण्या-खाण्याची, शिक्षणाची सोय करण्यात आली. त्यांना स्वावलंबी बनवून त्यांचा विवाह लावून दिला जातो. राज्यात त्या 'अनाथांची माई' म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या. पोटापाण्याच्या गरजेपेक्षा जास्त कमाई करता येणे हे बऱ्यापैकी अवघड आहे. पण, आपल्या कष्टाच्या कमाईचा मोठा भाग दुसऱ्याला देऊन टाकणं, हे त्यापेक्षाही कठीण आहे. पण, जेव्हा स्वतःलाच पुरेसे अन्न मिळत नाही, तेव्हा त्यातला तुकडा इतरांना देण्यातही अतिशय महान कार्य आहे. अंगावरचं लुगडं आणि कडेवरची चिमुकली याव्यतिरिक्त फक्त खंबीर मन आणि प्रेमळ हृदय घेऊन त्या हजारो अनाथांच्या आई बनल्या. हा प्रेरणादायी प्रवास एक गोष्ट सिद्ध करतो कि, आपला जन्म कुठे आणि कशा परिस्थितीत होतो हे आपल्या हातात नाही. तर त्यावर आयुष्यात आपल्याला काय सोसावं लागेल याची कधी खात्री नसते; पण त्यानंतर आपण काय करतो आणि कसे वागतो यावर आपलं भविष्य ठरतं. 


गरिबीमुळे त्या चौथीच्या पुढे शाळेत जाऊ शकल्या नाहीत. पण, त्यांनी रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ मुलांना वाढवून, शिक्षण देऊन त्यांना डॉक्टर, वकील आणि इतर कामे करणारे जबाबदार नागरिक निर्माण करण्यात मोलाचा वाटा उचलला. सुरुवातीच्या काळात अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागलेल्या सिंधुताईंना नंतरच्या काळात समाजाकडून आणि सरकारकडून मदत मिळाल्याने मुलांचा सांभाळ करण्याचे काम त्यांनी अधिक जोमाने केले. त्यांनी नंतर महाराष्ट्रात चार आश्रम स्थापन केले. आजपर्यंत त्यांनी अडीच हजाराहून अधिक अनाथांना आश्रय दिला आहे. 

सिंधुताईंना सन २०१६ मध्ये सामाजिक कार्यासाठी डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्चतर्फे डॉक्टरेट देण्यात आली. सिंधुताई यांना एकूण २७३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महिला व बालकांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान केला जाणारा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' त्यांना मिळाला आहे. महिलांना समर्पित भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना सन २०१७मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रदान केला होता. सन २०१०मध्ये सिंधुताई यांच्यावर जीवनावर आधारित 'मी सिंधुताई सपकाळ' हा एक मराठी चित्रपट प्रसिद्ध झाला होता. ५४व्या लंडन फिल्म फेस्टिवलसाठीही या चित्रपटाची निवड केली गेली होती. गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या