Ticker

10/recent/ticker-posts

दैवी स्वर निमाला!

  लता मंगेशकर यांनी एकूण ३६ भारतीय भाषेत गाणी गायली...

-दादासाहेब येंधे

लतादीदींइतके घराघरात पोहोचलेले दूसरे नाव नाही. दुसरा, सूर नाही. लतादीदींचे जाणे वार्धक्याचे कारण ज्ञात असूनही अकाली वाटते, यातच सारे काही आले. भारतीय सांस्कृतिक अवकाशातले 'लतापर्व' अखेर संपले. गेल्या साठ-सत्तर वर्षात असा एकही दिवस उजाडला नसेल, की त्या दिवशी पृथ्वीचा कोपऱ्यात कुठे ना कुठे लतादीदींचा स्वर ऐकूच आला नसेल. तबकड्या, स्पूल, कॅसेट, सीडी, रेडिओपासून ते थेट मोबाईल फोनपर्यंत अनेक टप्पे पार करत हा स्वर्गीय सूर पिढ्यान पिढ्यांना रिझवत राहिला.  देवटाक्याच्या पाण्यासारखा विशुद्ध आणि निर्मळ राहिला. तानपुऱ्याच्या षड्ज- गंधारासारखा अखंडपणे दरवळत राहिला. एक काळ असा होता की, माजघरात स्वप्नाळूपणे गुणगुणणाऱ्या एखाद्या   नवपरिणीतेच्या सामान्य गळ्यातही लतादीदींनी गायलेल्या सुरावटीच उमलत होत्या. 'चाफा बोलेना, चाफा चालेना...' यासारखी भावमधुर गीते माजघरात गुणगुणतच गृहिणींची एक पिढीच्या  पिढी आपले तारूण्य ओलांडून गेली. भारतीय भावविश्वाचाच हा स्वर होता. दीदींनी पार्श्वगायिका म्हणून आपली कारकीर्द घडवली. त्या क्षेत्रात त्या एव्हरेस्टपेक्षाही उत्तुंग ठरल्या. त्यांच्या जाण्याने आपण एका महान आवाजाला मुकलो आहोत.




असं म्हणतात की पंडित उस्ताद बडे गुलाम अली खाँ सकाळच्या वेळी आपले पुत्र मुनावर अली खाँ यांच्याकडून रियाज करून घेत असताना मध्येच थांबायचे आणि शेजारच्या घरातल्या रेडिओवरून ऐकू येणारं लतादीदींचं मधाळ गाणं त्याकाळी ऐकत राहायचे. गाणं संपलं की, हर्षभराने म्हणायचे, "बेटा, जे काळजाला भिडतं, ते खरं गाणं! या मुलीला ती जाण आहे आणि  देनही! एखादा बडा खयाल आळवूनही जे सांगता येणार नाही, ते ही मुलगी साडेतीन मिनिटांच्या गाण्यातून सहजी सांगून टाकते."  हे अलौकिकत्व कमवून येत नाही, ते वरूनच आणावं लागतं. वडील मास्टर दीनानाथांच्या ओजस्वी गायकीचे संस्कार तिच्यावर होत होते. त्यांच्यासोबतच जलसे रंगत होते. तोवर लतादीदींचं पितृछत्र हरपलं. संपूर्ण कुटुंबाच्या अर्थार्जनाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते आणि वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी शास्त्रीय संगीताची मैफल रंगवणारी, गाजवणारी ऐन वेळी नारदाची भूमिका झोकात सादर करून वडिलांचे नाव राखणारी ही 'ताई' अवघ्या तेराव्या वर्षी गळ्यातला सूर एवढ्या भांडवलावर चित्रपट सृष्टीत प्रवेश करते. आरंभ काळात 'माझं बाळ', 'पहिली मंगळागौर', 'चिमुकला', 'संसार', 'गजाभाऊ', 'छत्रपती शिवाजी' अशा मराठी चित्रपटांत तर 'बुडी माँ',  'जीवनयात्रा',  'सुभद्रा', 'मंदिर' अशा चित्रपटांतून अभिनय करते. वडिलांच्या अखेरच्या काळात खंबीरपणे भावंडांना पाठिशी घेते.


१९४२ साली 'नाचूया गडे खेळ सारी मनी हौस भारी' हे गाणं निर्माते वसंतराव जोगळेकर यांच्या  'किती हसाल' या चित्रपटासाठी लतादीदी गाते. १९४७ साली 'आपकी सेवामें' या जोगळेकरांच्याच चित्रपटात दत्ता डावजेकर 'पा लागूं कर जोरी' हे गीत तिच्याकडून गाऊन घेतले आणि तेव्हापासून लता मंगेशकर युगाची नांदी सुरू झाली. असं म्हणतात की, 'आप की सेवामें' पासून छोटीसी गुडिया की लंबी कहानी सुरू होते. राष्ट्रभक्त, प्रतिभावान वडिलांची स्वाभिमानी कन्या ईश्वरी गळा, वडिलांकडून मिळालेली गायन कला आणि जिद्द एवढ्या भांडवलावर संगीत क्षेत्रात वाटचाल करू लागली. गुलाम हैदर यांनी संगीत दिलेल्या 'मजबूर' चित्रपटातील 'दिल मेरा तोडा', 'पिया मिलनको आ' या गाण्यांनी चित्रपट सृष्टीचे कान टवकारले जातात.


खेमचंद्र प्रकाश, गुलाम हैदर, श्यामसुंदर, वसंत देसाई, अनिल विश्वास, नौशाद, सी. रामचंद्र‍साऱ्यांनाच या आवाजाची भुरळ पडते आणि नूरजहान, सुरय्या, शमशाद बेगम अशा तत्कालीन गायिकांच्या गायिकेचा प्रभाव हळूहळू दूर करत 'लता मंगेशकर' साम्राज्य पसरू लागलं होतं. एक गाणं इतिहास घडू लागत होतं. 'महल', 'अंदाज', 'बडी बहन', 'आवारा', 'बैजू बावरा', दुलारी नागिन', 'आझाद', 'मदर इंडिया', 'अनारकली' अशा चित्रपटांतलं एकेक गाणं इतिहास घडू लागलं होतं. सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन, सलील चौधरी, शंकर-जयकिशन, मदनमोहन, आर. डी. बर्मन, रोशन, जयदेव, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल ते थेट ए. आर. रहेमान अशा १८० हून अधिक संगीतकार आणि तीनशेहून अधिक गीतकारांच्या रचनांना न्याय देत 'पार्श्वगायिका' ते 'पुरोगायिका' असा विस्मयजनक प्रवास सुरु राहतो. मधुबाला, मीनाकुमारी, नूतन, वहिदा, माला सिन्हा, वैजंतीमाला ते थेट माधुरी दीक्षित, काजोल, प्रीती अशा कित्येक अभिनेत्रींच्या पिढ्या पडद्यावर याच स्वरात गात राहिल्या आणि एक वास्तव अधोरेखित झालं. हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्व नायिकांच्या सौंदर्यपूर्ण अभिनयाला न्याय देणारा अविस्मरणीय दैवी आवाज म्हणजे लता मंगेशकर.



नायिकांच्या दोन पिढ्या, संगीतकारांच्या दोन पिढ्या लता मंगेशकर या एकाच नावाचा मंत्र जपत मोठ्या झाल्या. माय-लेकी दोघींसाठीही लताचा आवाज दिला गेल्याची भली मोठी यादीच तयार होईल. परंतु एकाच गाण्यात तीन नायकांसाठी तीन पुरुष स्वर आणि तीन नायिकांसाठी मात्र एकट्या लताचाच स्वर, असेही एक उदाहरण आहे. 


हिंदी, मराठी आणि इतर अनेक भाषांमधील चित्रपटगीतांच्या पलीकडेही लता मंगेशकरांच्या स्वरांचे साम्राज्य तेवढेच मोठे, तेवढेच तेजस्वी आहे.  हिंदीत पंडित हृदयनाथांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेली मीरेची भजने किंवा पंडित भीमसेन जोशींसोबतचे 'राम-श्याम गुणगान' आणि इतर अनेक. मराठीमध्ये तर अभंग, ज्ञानेश्वरांच्या विराण्या आणि इतर शेकडो गाणी आपल्या जगण्याचाच भाग झाल्या आहेत. एकेका गाण्याच्या उल्लेख आपण शहारत जातो आणि हे अधिक श्रेष्ठ की ते अधिक,  यांच्या गोड गुंत्यात गुंतत जातो. मात्र, तरीही आणि हजारो फिल्मी, गैरफिल्मी गाण्यांच्या सर्वात पुढे लता मंगेशकर यांच्या नावाची पताका घेऊन पुढे हजारो वर्षे उभे असणार आहे. हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे पसायदान, आता विश्वात्मके देवे! आपल्या स्वरवैभवने लाखो लोकांना 'सुखिया' करीत भारतीय संगीतविश्वाची लता मंगेशकर नामक चेतना आता आपल्याला सोडून गेली आहे. 



जवळजवळ सहा दशकांच्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान कारकिर्दीत दीदींनी जितक्या संगीतप्रेमींना मग तो सर्वसामान्य श्रोता असो किंवा दर्दी ज्या प्रमाणात आनंद दिला आहे. तो आनंद देशाच्या पॉप्युलर कल्चरच्या इतर कुठल्याही कलाकाराने आजवर दिलेला  नाही.


पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या म्हणण्यानुसार लतादीदींचा आवाज सातही स्वरात आणि सगळ्या २८ श्रुतींना स्पर्श करू शकतो. अशी किमया असणाऱ्या त्या बहुदा एकमेव गायिका असाव्यात. पुरुषी आवाजामध्ये बडे गुलाम अली खान साहेब यांच्याबाबत असे म्हटले जाते. लताजींना सहा वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांनी या स्पर्धेतून दुसऱ्या गायिकांना संधी मिळावी म्हणून माघार घेतली. याशिवाय त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पारितोषिक, भारतरत्न आणि किमान दहा विद्यापीठांची डि.ली.ट ही पदवी मिळाली आहे. लता मंगेशकर यांनी एकूण ३६ भारतीय भाषेत गाणी गायली आहेत. सोबतच सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान डच, फिजिशियन, रशियन, स्वाहिली आणि इंग्रजीत सुद्धा त्या गायल्या आहेत.


हृदय आणि मन यापासून देवाने आवाज सारख्याच अंतरावर ठेवला आहे असं म्हणतात. कोणतीही महान गायकी ही भावना आणि तंत्र या घटकांचा समन्वय असते. लतादीदींच्या आवाजात या दोन्ही घटकांच्या अप्रतिम संगम झाला होता  लतादीदींची प्रतिभा बऱ्याच प्रमाणात निसर्गदत्त असली तरी त्यात उत्कट संगीत साधना आणि कुशाग्र बुद्धिमत्ता यांचा खूप मोठा सहभाग होता. 


जोवर भारतीयांच्या मनात धर्मप्रेम व देशप्रेम जागे आहे, तोवर सर्व जनतेला गणेशोत्सवात, स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनी लतादीदींची गाणी ऐकू येत राहतील. लता मंगेशकर यांचे निधन हे देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांचे अनेक संगीत पिढ्यांना स्मरणात राहील.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या