श्रावणात पावसाच्या अजून मधून सरी येतात आणि सकाळी सकाळी अंगणात सडामार्जन करून जातात. आभाळात निळे-जांभळे, भुरके ढग जमू लागतात. हे थोडे सावळे झाले की, पावसाची सर उन्हाला भेटून जाते. सकाळी सकाळी कोवळे ऊन आणि त्यात पडणारा रिमझिम पाऊस हिरव्यागार गवतावर पडला की जणू काय पैंजणाचे घुंगरू गवतावर सांडलेले वाटतात.
-दादासाहेब येंधे
श्रावणातला पाऊस खरंतर ऊन पावसाचा सुंदर खेळ असतो. तो रिमझिम असतो, त्यामुळे तो अंगावर घ्यायला मजा वाटते. श्रावणातला रिमझिम मोरपंखी पाऊस खिडकीतून बघणाऱ्यांची मला कीव येते. जगातल्या एवढ्या सुंदर अनुभवाला आपण मुकत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही. खरंतर पाऊस घराबाहेर येता जाताना अनुभवायचा असतो. विशेष म्हणजे पाऊस आपल्या घराच्या अंगणात पडत असताना त्याचे नाचून स्वागत करायचे. पण, हल्ली घराला अंगण आहे तरी कुठे? म्हणजे सध्या २०-२५ माळ्याच्या बिल्डिंग असतात. मग मधल्याच एखाद्या फ्लॅटला अंगण कुठून असणार? अर्थात गॅलरी असते पण तिला अंगणाची सर मात्र येत नाही. सर्व कॉलनी म्हणून एक मोठे प्रांगण असते. पण ते लगेच घराच्या दारासमोर नसते. बहुतेक शहरात हीच परिस्थिती आहे. गावी मात्र घराच्या समोर अंग असल्याने रिमझिम पावसाची मजा घेता येते. पण, हल्ली गावाकडे देखील उंच इमारती वाढून कौलारू घरे कमी व्हायला लागली आहेत. श्रावणातला मऊ, रेशमी, रिमझिम पाऊस अंगावर घेताना त्याचा स्पर्श खरोखरच मोरपंखी वाटतो. आपण नुकतेच आषाढातील मुसळधार पावसाच्या तडाख्यातून वाचलेलो असतो. आठ आठ दिवस हा पाऊस मुक्काम ठोकून असतो. धड घराबाहेर पडता येत नाही की ऑफिसमधून घरी येता येत नाही. पण, श्रावणमास आला की सारं टेन्शन कमी होतं. छत्रीचा भार डोक्यावरून जातो. छत्री घेतलीच पाहिजे असं बंधन नसतं. ती नसली तरी चालतं. अगदी विसरलो तरी चालते. थोडक्यात आषाढातला पाऊस, त्यात मुसळधार असेल तर अगदी अंगावर येतो आणि तो डोक्यात जातो. मात्र, श्रावणातला रिमझिम पाऊस अंगावर घ्यावासा वाटतो आणि तो उन्हातला इंद्रधनुषी पाऊस असल्याने डोळ्यांचे पारणे फेडतो.
आषाढाचा पाऊस मनासारखा पडल्यावर तहानलेली झाडे तृप्त होतात. माती सुखावते. हवेत थोडासा गारवा येतो सगळीकडे हिरव्या रंगांची उधळण सुरू होते. त्यात सकाळ प्रसन्न असतानाच आभाळात इंद्रधनुष्याच्या रंगांचा उत्सव सुरू झाला की, श्रावण सुरू झाला असे समजावे. श्रावणात पावसाच्या अजून मधून सरी येतात आणि सकाळी सकाळी अंगणात सडामार्जन करून जातात. आभाळात निळे-जांभळे, भुरके ढग जमू लागतात. हे थोडे सावळे झाले की, पावसाची सर उन्हाला भेटून जाते. सकाळी सकाळी कोवळे ऊन आणि त्यात पडणारा रिमझिम पाऊस हिरव्यागार गवतावर पडला की जणू काय पैंजणाचे घुंगरू गवतावर सांडलेले वाटतात. दुपार झाली किंवा ऊन थोडसं धुसर होते. कारण ऊन पश्चिमेला आळशासारखे रेंगाळते. त्या सोनेरी उन्हात श्रावणातली एखादी चंदेरी सर नाचून जाते. सूर्य मावळत असताना मग आपल्याला भा.रा. तांबे यांच्या ओळी आठवतात.
तांबूस पिवळे ऊन कोवळे पसरे चौफेर|
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर||
म्हणजे तांबूस पिवळ्या सोनेरी उन्हात जेव्हा श्रावणाच्या रेशीम धारा मिसळतात तेव्हा उन्हात पाऊस पडतोय की, पावसात ऊन हेच कळत नाही. लहानपणी उन्हात पाऊस पडू लागला की आम्हाला मोठी माणसं म्हणायची उन्हात पाऊस पडतोय म्हणजे कोल्ह्याचे लगीन लागते. मग आम्हीही तेच म्हणत पावसात नाचायचो. पण, आता मोठे झाल्यावर असे वाटते की, श्रावणातल्या पावसात लग्न लावणारे कोल्हा-कोल्ही हे मोठे रसिक जोडपे असावे, निसर्गाने मात्र एवढा रसिकपणा माणसात दिला नाही.
श्रावणातल्या पावसाचं सुंदर वर्णन निसर्गकवी बालकवींनी आपल्या काव्यात अतिशय रेखीवपणे व वास्तविक केले आहे ते म्हणतात..,
'श्रावणमासी हर्ष मानसी|
हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येते सरसर शिरवे|
क्षणात पिवळे ऊन पडे|'
श्रावणातल्या पावसातला मातीचा हिरवा उत्सव साजरा होत असताना श्रावणातला पाऊस धरणीला कसे अधून मधून स्नान घालतो आणि मग रिमझिम पावसात भिजलेले ती ओली धरती कशी गर्भवती होऊन आपले हिरवे डोहाळे पुरवते हे सारं श्रावणमासात घडते. आषाढातला पाऊस मातीच्या गर्भ धानाचा सोहळा करतो. तर श्रावण मातीचे डोहाळे पुरवतो. अशावेळी निसर्ग प्रसन्न असतो. वातावरणात गारवा आलेला असतो. पशुपक्षी तृप्त होऊन आनंदाने नाचत बागडत असतात. म्हणूनच बालकवी म्हणतात, श्रावणात हिरवळी सारखाच हिरवा हर्ष मनात दाटलेला असतो. अशावेळी पावसाचा सुंदर खेळ सुरू असतो. एखाद्या लपंडावासारखी कधी हळूच सर येते तर कधी हळूच ऊन येते. ते लपाछपी खेळत असताना कधी उन्हात पाऊस पडतो. तर कधी पावसात ऊन पडते.
पाऊस वेडा असतो म्हणून श्रावणात पावसाचं घर उन्हात बांधत असावे किंवा आषाढात पाऊस माणसाला झोडपतो म्हणून निसर्ग श्रावणात पावसाचे घर उन्हात बांधत असावा. लहानपणी आम्हाला कोणी मारलं तर आई आमचं सांत्वन करताना म्हणायची, 'थांब त्याचं घर आपण उन्हात बांधू. खरंतर वेड्याचं घर उन्हात असतं; पण हल्ली साऱ्यांचीच घरे उन्हात बांधतात. म्हणजे आपण सारेच वेडे आहोत की काय? सारे जग नसले तरी बहुतेक जण पावसाचे वेडे असतात. अशांसाठी श्रावण पावसाचे घर उन्हात बांधतो.
श्रावणाचा महिना म्हणजे रिमझिम पावसाचा महिना. तसाच तो सणासुदीच्या दिवसांचा महिना असतो. आपल्या संस्कृती सणांची सुरुवात नागपंचमीच्या सणाने होते आणि वर्षभर आपण सण साजरे करत असतो.
.
Photo: google .
.


0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.