लोकलने प्रवास करणारे इतर प्रवासी मात्र दहशतीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण हे हल्ले केवळ साधे हल्ले नसून, यामध्ये प्रवाशांचा जीव जात आहे.
-दादासाहेब येंधे
मुंबईकर आणि लोकल यांचे एक जिव्हाळ्याचे नाते आहे. मुंबईतील रेल्वे लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. मात्र, या लाईफलाईनला आता ग्रहण लागायला सरुवात झाली आहे. लोकल प्रवासामध्ये सध्या बिनधास्त एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. जे जीव गेल्यावरच थांबताना दिसून येत आहे. यामुळे घरातून कामावर गेलेला व्यक्ती संध्याकाळी कामावरून घरी येत नाही तोपर्यंत कुटुंबियांच्या जीवात जीव येत नाही. वरचेवर होणारे मुंबई लोकल रेल्वेतील हल्ले पाहता मुंबईकरांची लाईफलाईन डेडलाईन झाल्याचे जाणवत आहे.
उपनगरी रेल्वे म्हणजे केवळ वाहतुकीचे साधन नाही तर लाखो कष्टकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांचे रोजचे जीवन आहे. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत धावणाऱ्या लोकल गाड्या मुंबईचे आर्थिक चक्र अखंड सुरू ठेवतात. दररोज सुमारे ७० ते ८० लाख प्रवासी या रेल्वेवर अवलंबून आहेत. इतक्या मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुरक्षित प्रवास मिळणे हे शासन आणि रेल्वे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील घटनांनी ही सुरक्षिततेची भावना अक्षरशः कोलमडून पडली आहे. लोकलमध्ये चाकू हल्ले, लूटमार, व्यसनाधीनांकडून प्रवाशांना त्रास, किन्नरांकडून जबरदस्तीने पैसे उकळणे व मारहाण, जागेच्या किरकोळ वादातून जीवघेणे हल्ले अशा घटनांनी प्रवाशांच्या मनात भीतीचे घर निर्माण केले आहे. असे सध्या मुंबई लोकल ट्रेन मधील काही घटनांवरून जाणवत आहे.
मयांक रमेश लोहार (वय, २२) हा तरुण अंधेरी (पूर्व), चकाला परिसरातील वेस्टसाईड या कंपनीमध्ये सेल्समनचे काम करीत होता. विरारला राहणाऱ्या मयांकने चर्चगेटहून रात्री १० वाजून ५ मिनिटांनी सुटलेली नालासोपारा जलद लोकल अंधेरीला पावणे अकराच्या सुमारास पकडली. अशातच पाऊस सुरूच असल्याने, लोकलचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. परंतु फर्स्ट क्लासच्या मधल्या डब्यात अंधेरी येथे चढलेल्या रोशन रमेश सुवर्णा या तरुणाने लोकलचा दरवाजा बंद केला नाही. त्याला दरवाजात मनसोक्त भिजत उभे राहून प्रवास करायचा होता. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच होते. अंगावर पाणी पडत असल्याने आमचे कपडे भिजत आहेत, असे चढ्या आवाजात बोलून काही प्रवाशांनी लोकलचा दरवाजा बंद केला. तेव्हा रोशन आणि सहप्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली. चिडलेल्या रोशनने आपल्या बॅगेतील १७ सेंटिमीटर लांब असलेला एक धारदार चाकू बाहेर काढला. मजबूत शरीरयष्टी असलेल्या रोशन सुवर्णाचा आक्रमक पवित्रा पाहून सहप्रवासी घाबरले. त्यातच रोशनने मयांकला पकडले आणि त्याच्या छाती आणि पोटावर चाकूने तीन-चार वार करून त्याला अक्षरश: रक्तबंबाळ केले. मयांक एका क्षणात रेल्वेच्या फुटबोर्डवर रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार मालाड आणि कांदिवलीच्या दरम्यान घडला. बोरिवली स्टेशन आल्यावर रोशन धावत्या ट्रेनमधून उडी मारून पळून गेला. मयांकला जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तोपर्यंत त्याचे निधन झाले होते. मयांकच्या आई-वडिलांसाठी हा प्रचंड धक्का होता. मीरा रोड (पूर्व) ला राहणारा व मुंबई विमानतळाच्या कार्गो सेक्शनमध्ये कार्गो ऑपरेटर म्हणून काम करणारा रोशन रमेश सुवर्णा आपल्या कर्नाटकातील गावी पळण्याच्या तयारीत असताना पनवेल येथे सापळा रचून पोलिसांनी त्याला पकडले.
अशाच प्रकारची घटना २६ जानेवारी २०२६ रोजी घडली होती. एन. एम. कॉलेजचे प्राध्यापक आलोक कुमार सिंग (वय, ३३) यांची हत्या केली गेली. बोरिवली लोकलमध्ये मालाड येथे उतरणाऱ्या ओंकार एकनाथ शिंदे या माथेफिरु तरुणाने धातू पॉलिश करण्याचा अत्यंत टोकदार चिमटा पोटात घुसवून त्यांची हत्या केली. लोकलमध्ये गर्दी असल्याने चढण्या-उतरण्यावरून वाद झाल्याने ओंकार शिंदेने रागाच्या भरात टोकदार चिमटा आलोक कुमार यांच्या पोटात आरपार घुसवला. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
१९९८ साली जयबाला आशर या २३ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर चर्चगेटकडे निघालेल्या लोकलमध्ये सकाळच्या दरम्यान एका गर्दुल्याने पैशांसाठी हल्ला केला. तिची पर्स पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करताच तिला डब्याबाहेर ढकलून दिले होते. त्यावेळी ती धावत्या गाडीतून खाली पडली व तिचे दोन्ही पाय रेल्वेखाली येऊन कापले गेले होते. परिणामी, तिला कायमस्वरुपी अपंगत्व आले.
नुकतेच जुलै २०२६ मध्ये चार दिवसांपूर्वी मध्यरात्री अंबरनाथला निघालेल्या लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरुन किरकोळ वाद झाला. या वादाचे रुपांतर गंभीर मारामारीत होऊन एका प्रवाशावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. हे वार एवढे वर्मी लागले की, प्रवासी गंभीर जखमी झाला. तर मारेकऱ्याने तात्काळ स्थानक जवळ येताच गाडीतून उडी मारून पळ काढला. अचानक झालेल्या हल्ल्याने लोकलमधील सर्व प्रवासी घाबरुन गेले. मात्र, रेल्वे पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या. तर दोन दिवसांपूर्वी लोकल प्रवासात पुन्हा बसण्याच्या जागेवरुन तृतीयपंथी आणि प्रवाशात वाद होत प्रितेश कनोजीया आणि राजु वाघेला हे दोन तृतीयपंथी जखमी झाले. लोकलमध्ये सुरु असलेले वाद आणि हल्ले रोखण्यासाठी रेल्वे पोलीस आणि केंद्रीय रेल्वे पोलीस बल (आरपीएफ) यांनी धावत्या लोकलमध्ये गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्यापही अशा हल्यांना प्रतिबंध घालता आला नाही. या घटनेमुळे लोकलने प्रवास करणारे इतर प्रवासी मात्र दहशतीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण हे हल्ले केवळ साधे हल्ले नसून, यामध्ये प्रवाशांचा जीव जात आहे.
रेल्वे प्रशासनाने ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे सुरक्षा दलाचा वावर वाढविणे, स्थानके आणि लोकलमधील गस्त अधिक प्रभावी करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा अधिक सक्षम करावी.

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.