Ticker

10/recent/ticker-posts

रंगारी बदक चाळीचा राजा ‘‘लाडका लंबोदर’’ माझा

मंडळाच्या स्थापनेपासून पौराणिक विषयांवर देखावा सादर करणे ही मंडळाची खास परंपरा 

-दादासाहेब येंधे

लोकमान्य टिळकांनी श्री गणेशाला घरातून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतिमेतून बाहेर काढून रस्त्यावर आणून गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून अन्यायाने भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांविरोधी असंतोष निर्माण केला. जनतेला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जागृत केले. त्याच काळात ब्रिटीशांनो ‘‘चले जाव’’ हा नारा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या हाकेला ओ देत मंतरलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील, देशभक्तीने भारलेल्या आणि तारूण्याने मुसमुसलेल्या रंगारी बदक चाळीतील वि. ल. काकडे, शांताराम मयेकर, यशवंत मोरे, बाबुराव रसाळ या मोजक्या तत्कालीन नवयुवकांनी सन १९४० साली राष्ट्रीय मित्र मंडळाची स्थापना केली.


लोकमान्य टिळकांनी आणि महात्मा गांधीनी स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या कार्यात हयाच राष्ट्रीय मित्र मंडळामार्फत रंगारी बदक चाळीत स्वातंत्र्यप्राप्तीचा श्री गणेशा गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू झाला. ‘‘इवलेसे रोप लावलीया दारी, तयाचा वेणू गेला गगनावरी’’ या उक्तीप्रमाणे स्वातंत्र्य चळवळीत रंगारी बदक चाळीने खारीचा वाटा उचलला. 

स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाचे संदर्भ बदलले, सामाजिक समरसता, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक आणि सामाजिक सौहार्द राखणे हे गणेशोत्सवाचे मुख्य कार्यक्रम झाले. रामायण, महाभारत, हरीविजय, भक्ती विजय, गणेश पुराणातील उद्धबोधक आणि समाजाला मार्गदर्षन/दिशादर्शन  करणारी कथानके हे रंगारी बदक चाळीच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण झाले. हिंदूंच्या महान ग्रंथातील कथानके महाराष्ट्रातच नव्हे तर गणेशोत्सवात गर्दीने येणाऱ्या भारतातील अनेक गणेशभक्तांचे भाविकतेचे केंद्र झाले. भक्त चोखामेळा, विठू माझा लेकुरवाळा, शेषशाही श्री विष्णू, शेगांवचे श्री गजानन महाराज, सुर्य कुंती मिलन, संत गोरा कुंभार, शीषुपाल वध, पंचमुखी हनुमान, वामन अवतार, दशावतार, श्रीकृष्ण तुला, भक्त पुंडलिक, साडेतीन शक्तीपिठे, तिरूपती बालाजी अशा एक ना अनेक कथानकांनी गणेशभक्तांच्या डोळयांचे पारणे फेडले. या कथानकातील धार्मिकतेतून सामाजिक संदर्भ देण्याचा प्रयत्न मंडळाने नेहमीच केला व आजमितीपर्यंत करीतही आहे.

गिरणगाव कात टाकत असताना केवळ उत्सवासाठी उत्सव न करता सामाजिक जाणिवेतून कला, क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल उत्सव काळात येथे नेहमीच असते. इयत्ता पहिली ते पदवी आणि पदविका परिक्षेत उज्ज्वल यश मिळविणाऱ्या स्थानिकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येते. वक्तृत्व, निबंध, वेषभुशा, एकांकीका, एकपात्री स्पर्धा येथे प्रतिवर्षी घेण्यात येतात. हया सर्व स्पर्धांमध्ये महिलांचा प्रतिसाद मिळण्यासाठी स्वतंत्र महिला गट करण्यात येतो. महिलाही अशा स्पर्धांमध्ये मोठया हिरीरिने भाग घेऊन गणेशोत्सवाचा आनंद लुटतात. केवळ मात्र रु. १००/- वर्गणीत वर्षभर दहिकाला-श्रीकृष्ण जयंती, होलीकात्सव, रामनवमी, हनुमान जयंती या धार्मिक सणांबरोबरच शिवजयंती, १५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे राष्ट्रीय उत्सव देखील साजरे केले जातात. 

रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सवाने मागील काळात राष्ट्रीय नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला यथायोग्य आर्थिक सहकार्य केले असून गणेशोत्सव मंडळाच्या कार्यालयातून ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र, पॅन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जन्म-मृत्यु नोंदणीचे प्रमाणपत्राचे अर्ज देऊन संबंधितांस मार्गदर्शन व मदत केली जाते. मंडळाच्या माध्यमातून आजवर अनेक प्रकारची विनामुल्य आरोग्य शिबिरे, आरोग्यविशयक चाचणी शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत. 

स्वातंत्र्यवीर सावरकर, एस.एम.जोशी, काॅम्रेड श्रीपाद अमृत डांगे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उप-पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, आचार्य प्र.के.अत्रे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, मनोहर जोशी, नारायण राणे, माजी उप-मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, छगनराव भुजबळ, वसंतराव नाईक, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदी आजमितिपर्यंतच्या अनेक सामाजिक आणि राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कामगार क्षेत्रातील नामवंत महानुभावांनी/मान्यवरांनी गणेशोत्सव काळात हया उत्सवास आवर्जून सदिच्छा भेट देऊन मंडळाच्या कार्याबद्दल गौरवौग्दार काढले आहेत. 

तरूण व हौशी कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस गणेशोत्सव सुरळीत पार पाडून रंगारी बदक चाळीच्या या गणरायाला प्रेमाने ‘‘लाडका लंबोदर’’ असे नाव ठेवले आहे. मंडळाच्या माध्यमातून कामाला सुरूवात करून आज विविध स्तरांवर रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते, रहिवाशी आज नावारूपाला आले आहेत. वैचारिक अधिष्ठान आणि सेवा हाच स्थायीभाव असलेले हे मंडळ सामाजिक जीवन संपन्न आणि सुसंस्कृत करते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. समाजाची सगळी दुःखे जरी दूर करता आली नाहीत, तरी ती सुसहय करण्यासाठी मंडळ सतत झटते आणि समाजात जागल्याचे काम करते हाच या मंडळाचा मोठेपणा आहे. मंडळाच्या स्थापनेपासून पौराणिक विषयांवर देखावा सादर करणे ही मंडळाची खास परंपरा असून विसर्जनाच्या दिवशी  गणरायाबरोबरच इतर संपूर्ण देखावा (मुर्त्या) हा बैलगाडीवरून गिरगांव चैपाटीपर्यंत विसर्जनासाठी नेण्यात येतो. अख्ख्या महाराष्ट्रातील एकमेव असा हा गणपती विसर्जनासाठी बैलगाडीवरूनच दरवर्षी विसर्जनासाठी जातो हे खास वैशिष्टय रंगारी बदक चाळीच्या राजाचं आहे.    


बैलगाडीवरून विसर्जन मिरवणूक



१२ सप्टेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या