मका भाजून झाल्यावर त्यावर मस्तपैकी लिंबू, मीठ तिखट मिरची भुरभुरताना ते बघताच क्षणी तोंडाला पाणी आल्याशिवाय राहावत नाही...
-दादासाहेब येंधे
रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच झोंबणाऱ्या वाऱ्याचा खेळ सुरू आहे. अशावेळी खरपूस भाजलेल्या कोवळ्या मक्यावर लिंबू, तिखट मसाला टाकून आणि हिरव्यागार पानावर अलगद हातात धरत मक्याचे कणीस, भुट्टा खाण्याची मजा काही औरच.
सध्या पावसाचे दणक्यात आगमन झाले आहे. पावसाळ्यात खमंग भजी, कडक चहा अशी ऑर्डर आईला दिली जाते. मात्र, पावसाळ्यात टपरी वरील चहा, तळलेली मिरची आणि वडापाव, चायनीजचे गरमागरम सूप याचा आस्वाद घेण्यासाठी खवय्ये मंडळी घराबाहेर पडताना दिसतात. या पदार्थांवर खवय्ये तुटून पडतात. मात्र, या सर्वांमध्ये सर्वात जास्त मागणी असते ती म्हणजे भुट्टयाला.., भाजलेल्या मक्याच्या कणसाला...
मक्याच्या कणसामधून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मिळतं. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी चांगलं असतं तर व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतं. व्हिटॅमिन सी त्वचेसाठीही अतिशय उत्तम असतं.
मका सुद्धा झालाय 'मॉर्डन'
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी बदलत गेल्या. बदलत जात आहेत. त्यात आपल्या मक्यालाही मॉर्डन रूप प्राप्त झाले. हल्ली मका म्हणजे केवळ आपले कणीस राहिले नसून तो पॉपकॉर्न, मका पॅटीस, उकडलेले कॉर्न, सूप अशा नानाविविध रूपांमध्ये भेटतो. समुद्रकिनारी रस्त्याच्या कडेला १५ ते २० रुपयांमध्ये मिळणारा मका मल्टिप्लेक्स मध्ये गेल्यावर कॉर्न होतो. आणि त्याची किंमत थेट ५० ते ६० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचते. उकडून, बटर लावून, मसाला लावून, एका कागदी कपामध्ये आणि छोटा प्लास्टिकचा चमचा ठेवून दिले जाणारे हे स्वीट कॉर्न बच्चे कंपनीचा आवडता पदार्थ. पण, मक्याचे हे रुपडं कितीही बदललं तरी शेवटी लाल भडक निखाऱ्यावर भाजलेलं कणीस तेच खरं कणीस.. पावसात रस्त्यावर उभं राहून खाण्यात मजा काही औरच...



0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.