Ticker

10/recent/ticker-posts

पावसाळा व्हावा आरोग्यदायी

हा ऋतू जेवढा आल्हाददायक आहे, तेवढाच वेगवेगळे आजार पसरवणाराही आहे

-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)                

पावसाळा हा सर्वांना आवडणारा ऋतू. तरुण मंडळी तर या पावसाळ्याच्या स्वागतासाठी उत्सुक असते. पण याच दिवसांत अनेक विकार डोके वर काढतात. त्यामुळे पावसाळ्याचा आनंद लुटताना आरिग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. सदरणपणे पावसाळ्यात सर्दी, डोकेदुखी, हिवताप, उलट्या-जुलाब होण्याची शक्यता असते. याच्या जोडीला कावीळ असतेच असते. वास्तविक या दिवसांत पुरेशी काळजी घेतली, तर अनेक विकार दूर ठेवता येणे सहजशक्य आहे. 


पावसाळ्यात पाण्याच्या साठवणुकीची किंवा निचऱ्याची योग्य व्यवस्था नसेल, तर ते साठून राहते. अशा पद्धतीने जागोजागी साठून राहिलेल्या पाण्यात अनेक जीवजंतू वाढीस लागतात. शिवाय या दिवसांत तापमान कमी असते. तसेच वातावरणही ढगाळ असते. हे वातावरण अनेक विकारांना कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंसाठी पोषक ठरते. या दिवसांत मुख्यत्वे पाणी मोठया प्रमाणावर दूषित होते. यातून पोटदुखी, उलटया-जुलाब, कावीळ असे आजार निर्माण होतात. त्यामुळे पाणी उकळून, गाळून किंवा पुरेसे निर्जंतुक करून पिणे केव्हाही चांगले. तसेच या दिवसांत डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे डास होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. त्याकरिता घरात किंवा आवारात पाणी अधिक काळ साठू देऊ नये. त्यासोबतच डास साधनांचा वापर करावा. 


पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारणपणे सर्दी, खोकल्यासारखे आजार होतात. परंतु, या आजारांकडे दुर्लक्ष करणे महाग पडू शकते. यातून मोठे आजार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, परंतु आपण थोडी काळजी घेतली आणि नैसर्गिक जीवनशैली अंगीकृत केली तर अशा आजारांवर मत करू शकतो. इतकेच नव्हे तर आपली प्रतिकारशक्तीही वाढवू शकतो. यामुळे होणारव संभाव्य आजारही टाळता येतील. 


आयुर्वेद हे संपूर्ण जीवनाचे विज्ञान आहे. जडिबुटी आणि जीवनशैलीत परिवर्तन करणे याला आयुर्वेदात महत्त्व आहे. असेच काही सोपे उपाय तुम्हाला पावसाळ्यातील आजारांपासून दूर ठेवतील. १) तुळशीची पाने आणि आले थोड्या पाण्यात उकळून चहासारखे  घेणे. २) अर्धा चमचा सुंठ मधासोबत घेतल्यास पोटाच्या तक्रारी दूर राहतील. सांधेदुखीही दूर राहील. ३) कडुनिंबाची पाने वाटून त्यात आवळा चूर्ण मिसळावे. याचे मिश्रण काढून सेवन करा. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 


पावसाळ्याच्या दिवसांत लघू आणि गरम म्हणजेच उष्ण गुणांचा आहार घ्यावा. आपल्या आहारातील विविध अन्नपदार्थ तयार करण्यासाठी आपण जे धान्य वापरतो ते जुने असावे. एक वर्षापेक्षा अधिक जुने मात्र  ते असू नये. नवीन धान्य वापरायचे असल्यास, ते धान्य भाजून घेतल्यास अधिक चांगले. कारण ते पचण्यास हलके व सोपे असते. ज्वारीची भाकरी, कमी तेलाच्या चपात्या, गरम दूध, शक्यतो मुगाचे वरण, भट अशी आहाराची मांडणी असावी. दही घेण्यापेक्षा त्यामध्ये थोडे पाणी घालून, घुसळून ताक करून घ्यावे. आहाराचे प्रमाण पावसाळ्याच्या सुरुवातीस अधिक प्रमाणात असू नये. जसजसा अग्नी प्रदीप्त होईल म्हणजेच भूक वाढेल, तशी आहाराची मात्रा वाढवावी. पचण्यास जड, शिळा, थंड असा आहार टाळावा. 


पावसाळ्याची चाहूल लागली की, सारेजण स्वागतासाठी सज्ज होतात. तरुणाई तर पावसात चिंब भिजण्यासाठी आसुरलेली असते. पण, हा ऋतू जेवढा आल्हाददायक आहे, तेवढाच वेगवेगळे आजार पसरवणाराही आहे. त्यामुळे आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. त्यात बरेचसे आजार दूषित पाणी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे निर्माण होतात. या संदर्भात योग्य काळजी घेतली तर व्याधींना दूर ठेवत पावसाळ्याची मजा लुटता येईल.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या