Ticker

10/recent/ticker-posts

एक होता सिंघम

हिमांशू रॉय हे एवढ्या मोठ्या पदावर असतानाही त्यांच्या वागण्याबोलण्यात कोणताही बडेजाव नव्हता. शिपायांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ते अदबीने वागायचे.

-दादासाहेब येंधे


पिळदार शरीरयष्टी कमावलेला बॉडीबिल्डर, कर्तव्यदक्ष, नेहमी हसतमुख असणारे आयपीएस हिमांशू रॉय हे पोलीस दलात भरती होणाऱ्यांसाठी 'आयडॉल' होते. त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

त्यांच्या पीळदार देहयष्टीमुळे पोलीस दलात त्यांना 'सिंघम' म्हणून संबोधले जाते होते. महाराष्ट्र राज्य आणि मुंबई पोलीस दलात अनेक महत्त्वपुर्ण जबाबदाऱ्या सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा यशस्वी तपास केला होता. उकल करण्यास अतिशय कठीण अशा प्रकरणांचा यशस्ची छडा लावण्यात रॉय यांचा हातखंडा होता. 


रॉय यांनी कर्तव्य बजावत असताना पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला झालेल्या फाशीच्या शिक्षेनंतर त्यांनी गोपनीयरित्या बजावलेली भूमिका. कसाबला फाशी सुनावली गेल्यानंतर शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्याला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून पुण्याच्या येरवडा कारागृहात नेण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय स्तरावरून घेण्यात आला होता. तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी ही जबाबदारी रॉय यांच्यावर सोपवली होती. अत्यंत गोपनियरीत्या त्यांनी ही जबाबदारी चोख पार पाडत कसाबला फासावर लटकविण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका तुणी बजावली होती. 


आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणाची यशस्वी उकल रॉय यांनी यशस्वीरीत्या केली. या प्रकरणांत कोणकोणते खेळाडू गुंतले आहेत, स्पॉट फिक्सिंगची व्याप्ती काय आहे, तसेच किती पैसा या अवैध धंद्यात आहे, अशा सर्व बाबी त्यांनी तपासद्वारे उघड करत आरोपींना बेडया ठोकल्या होत्या. 


मुंबईतील शक्ती मिल बलात्कार प्रकरणाच्या तपासातही रॉय यांच्या धडाडीची चुणूक दिसून आली. अल्पवयीन आरोपीचा समावेश असलेल्या या सामूहिक बलात्कार प्रकरणात जनभावना तीव्र होत्या. मात्र तो दबाव पेलत रॉय यांनी हे प्रकरण मार्गी लावले. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आझाद मैदान दंगलीदरम्यान हुतात्मा स्मारकाची तोडफोड करून महिला पोलिसांनाही मारहाण करणाऱ्या दंगलखोरांना अटक करण्यात हिमांशू रॉय आघाडीवर होते. 


कोणत्याही कठीण प्रसंगी नेत्याची चाल महत्त्वाची मानली जाते असे म्हणतात. त्या चालीत रॉय यशस्वी ठरले. प्रत्येक कारवाईवेळी लहानमोठे अधिकाऱ्यांपासून ते शिपायांपर्यंत ते सर्वांवरच १००टक्के विश्वास ठेवायचे. कामात संपूर्णपणे मोकळीक देतानाच आपला चमू यशस्वी होणारच, ही खात्री त्यांना नेहमी असायची. प्रत्येक अधिकाऱ्यापासून ते शिपाई पर्यंतच्या पोलिसांशी ते सौहार्दाने बोलताना कधीही अहंपणा न दाखवणाऱ्या रॉय यांनी कायम प्रत्येकाला पाठिंबा द्यायचे.


हिमांशू रॉय हे एवढ्या मोठ्या पदावर असतानाही त्यांच्या वागण्याबोलण्यात कोणताही बडेजाव नव्हता. शिपायांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ते अदबीने वागायचे. कोणालाही ताटकळत ठेवत नसत. त्यांनी कधीही कोणाला दुखावले नाही. त्यांना व्यायामाची आवड होती. आजारपणामुळे त्यांनी आयुष्य संपवले असल्याने पोलीस दलातील खऱ्याखुऱ्या 'सिंघम'ला आपण मुकलो आहोत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या