Ticker

10/recent/ticker-posts

तुझे पायी सर्व सुख आहे....

तुझे पायी सर्व सुख आहे

- दादासाहेब येंधे


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा 'पालखी सोहळा मोठया उत्साहाने पंढरीची वाटचाल करतोय. त्यांच्यासोबत राज्याच्या इतर भागांतून विविध संतांच्या पालख्या पंढरपुरकडं निघाल्यात. या वारीला एक हजार वर्षांपूर्वीची परंपरा आहे. सुरूवातीला वारकरी कोणतंही वाद्य न घेता वारी करत. सोबत कोणाची तरी पालखी असे. तुकाराम महाराजांनी टाळ-मृदूंगासह वारीत सहभागी होण्याची परंपरा सुरू केली. तशी ज्ञानेश्‍वरांच्या समाधीच्या वेळी नामदेवरायांनी पंढरपुरहून आळंदीला दिंडी नेली होती. ही दिंडीची सुरूवात म्हणावी लागेल. संत तुकाराम महाराजांच्या घराण्यातील १४ पिढयांपासून विठ्ठल भक्‍तीची परंपरा कायम राहिली आहे. 


“पंढरीची वारी, आहे माझे घरी ।

आणिक न करी तीर्थव्रत ॥ ''

असं तुकाराम महाराज म्हणत. ते स्वत: ज्ञानेश्वरांच्या पादुका घेत आणि पंढरपूरची वारी करत. तुकाराम महाराजांच्या वैफुंठगमनानंतर त्यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर या दोघांच्याही पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. या पालखी  सोहळयाला हैबतबाबांनी भव्य आणि शिस्तीचं रूप दिलं. हा पालस्वी सोहळा अधिक उत्तम व्हावा असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी सरदार शितोळे संस्थान तसंच अन्य काही संस्थानं, दानशूर व्यक्ती यांची मदत घेतली आणि पालखी सोहळा सुरू झाला. हा सोहळा लष्करी शिस्तीत पार पडू लागला. आज अशाच पद्धतीनं राज्याच्या विविध भागातून १०० ते १५० पालख्या पंढरपूरला जातात. या संपूर्ण सोहळयात लाखो वारकरी आपले देहभान विसरून सहभागी होतात. त्यांना या सोहळ्याची तसेच पांडुरंगाच्या भेटीची आत्मिक ओढ असते. काही घराण्यांमध्ये तर कुळधर्म, कुळाचाराप्रमाणे वारीची परंपरा चालत आली आहे. त्यामुळे घराण्यातील प्रत्येक पिढीतील किमान एका व्यक्तीने वारीला गेलेच पाहिजे असा अलिखित नियम तयार झाला. त्यातूनच मग वारीची परंपरा सुरू राहिली आणि उत्तरोत्तर त्यासाठीची ओढही वाढत गेली. प्रतिकूल परिस्थितीतही वारीचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. जणू प्रतिकुलतेतून अनुकूलता शिकण्यासाठीच ही  वारी असते. 

वारीची ही शिकवण प्रत्येकानेच अनुसरण्यासारखी आहे. एरवी आपण काही पावले चाललो तरी थकल्यासारखे होते. मात्र, वारीच्या काळात टाळ मृदूंगाच्या तालावर काही किलोमीटर चालूनही थकवा जाणवत नाही. वारीत जात्यावरील ओव्या, भारूड, अभंग, गवळणी यासारख्या लोकगीतांच्या प्रकारांचा आवर्जून समावेश केला जातो. त्यातूनच मनोरंजनाबरोबर प्रबोधनही होते.


"तुका म्हणे काही न मागो ।

आणिक तुझे पायी सुख सर्व आहे ।।"

असं याचं वर्णन संतांनी अभंगात करून ठेवलं आहे. कारण वारीला येणाऱ्या वारकर्‍याची कोणतीही आसक्ती नसते. त्याला कशाचीही अभिलाषा नसते. पांडुरंगाच्या पायाशी सर्व सुखं साठली आहेत. म्हणूनच त्या चरणावर डोकं ठेवून मी धन्य होतो, अशी वर्षानुवर्षांची धारणा अजूनही कायम आहे. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरात भक्तांचा महासागर लोटतो. अशा वेळी प्रत्येकाला पांडुरंगाचं दर्शन घेण्याची संधी मिळतेच असं नाही. मात्र, त्याचं वाईट वाटून न घेता वारकरी विठठल मंदिराच्या कळसाचं बाहेरूनच दर्शन घेऊन धन्यता मानतात.


"पंढरीच्या लोका, नाही अभिमान ।

पाया पडे । एकमेका ।।"

वारी नैतिकतेचे चालते-बोलते विद्यापीठच आहे. मुखाने अखंड हरीनामाचा गजर आणि उरी विठठलभेटीची आस घेऊन ही वाटचाल होत राहते. वारीतील वारकरी एकमेकांचे दर्शन घेतात. यावेळी त्यांच्यातील लीनतेचा प्रत्यय येतो. शिवाय वारीहून आलेल्या व्यक्तीचं दर्शन घेण्याचीही प्रथा आहे. 'एकूणच, भक्‍तीभाव, संशोधन, योग्य व्यवस्थापन, अर्थकारण आणि सामाजिक तत्वचिंतन अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी युक्‍त असलेला हा सोहळा म्हणजेच संतांनी जगाला दिलेली एक देणगीच म्हणावी लागेल.

 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या