Ticker

10/recent/ticker-posts

चला पावसाळी विकेण्डला...

- दादासाहेब येंधे 

सध्या पावसाळयाचे आल्हाददायक वातावरण सगळीकडे पसरलेले आहे. त्यामुळे पावसाळयातील विकेण्डला फिरण्यासाठी बॅग पॅक करून तरूणाई तयार आहेच. अनेक गडकिल्ले, डोंगरदऱ्या, समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत. 


पांडवकडा : मुंबई-ठाण्याजवळचा पिकनिक स्पाॅट म्हणून नवी मुंबईतील पांडवकडा फार प्रसिद्ध आहे. दरवर्षी हा पांडवकडा तरूणाईला आकर्षित करीत असतो. खारघर येथील या पांडवकडा धबधब्याला महाविद्यालयातील विद्यार्थी दांडी मारून एक दिवसासाठी भेट देतात. 


नॅशनल पार्क : प्रत्येक वयोगटासाठी नॅशनल पार्क. मुंबईतील पर्यटनाची चर्चा सुरू असताना मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय  उद्यानाला विसरता येणे शक्य नाही. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अशा अशा प्रत्येक वयोगटातील पर्यटकांचे आवडते पर्यटन क्षेत्र म्हणून हे उद्यान ओळखले जाते. पावसाळयात येथील हिरवळ बघण्यासाठी दूरवरून पर्यटक येथे येतात. या उद्यानामध्ये एकीकडे वनस्पती विशयांवर अभ्यास केला जात असताना दुसरीकडे ट्रेकिंग करण्यासाठीही अनेक पर्यटक् येत असतात. दूरवर पसरलेल्या या पार्कमध्ये बघण्यासारख्या विविध गोश्टी आहेत. वनस्पती आणि विशिष्ट प्रादेशिक कालखंडातील प्राणी मुंबईत या एकाच ठिकाणी पहायला मिळत असल्यामुळे येथे सतत पर्यटकांची गर्दी असते. कृष्णगिरी उपवन हे या ठिकाणचे प्रेक्षणीय स्थळ असून येथे छोटे प्राणीसंग्रहालय देखील आहे. या ठिकाणी जायचे असल्यास उद्यानातर्फेच सफारीची सोय देखील करण्यात आली आहे. उद्यान दूरवर पसरले असल्याने येथे टेकडयाही दिसून येतात. पावसात डोंगर भागामधून खाली येणाऱ्या पाण्याची तीव्रता जास्त असते. त्यामुळे पायथ्यापाशी वाहणाऱ्या पाण्याची उंची वाढते. या परिस्थितीमध्ये येथे काही जण पोहण्यास जातात. 


मरिन ड्राईव्ह : पावसाळा सुरू झाला की पर्यटक पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबई तसेच मुंबई बाहेरचे पिकनिक स्पाॅट शोधत असतात. मात्र, मुंबईमध्येच सर्वात प्रसिद्ध तसेच तरूणाईचा आवडता स्पाॅट म्हणजे मरिन ड्राईव्ह. येथे तरूण मंडळी पावसासोबत उंच लाटांचा आनंद घेताना बेभान होऊन सेल्फी काढयाची हौसही भागवून घेतात. 


माळशेज  घाट : आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कडयांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि  शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळूवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर अहमदनगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात जायलाच हवे. जिथून घाट सुरू होतो, तिथे दरीत असलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिसाॅर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगाव येथे सुंदर जलाशय आहे. इथली खासियत म्हणजे ‘रोहित पक्षी’ फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज घाट हा मुख्य रस्ता असल्याने एसटीच्या बऱ्याच गाडया पुण्या-मुंबई, परेल, कल्याण येथून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास मुंबईहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल. पावसाळयात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. 

निसर्गाच्या कुशीत उधळलेल्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला गेलेल्यांना अनेकदा सुरक्षेसाठी नेमके काय करायचे हे कळत नाही. त्यामुळे वादळवारे आणि दाट धुक्यात वाट चुकणे, फोटोच्या, सेल्फीच्या नादात तोल जाण्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळी पिकनिकला जाताना सुरक्षिततेचे मुद्दे लक्षात ठेवून प्लान आखावेत.


पावसाळयात पिकनिकला जाताना काय काळजी घ्याल ?

- घरातून बाहेर पडताना तुमचा पत्ता, घरातले आणि मित्रमंडळींचे संपर्क क्रमांक तुमच्याजवळ लिखित स्वरूपात ठेवा.

- समुद्र किनारी गेल्यास पाण्यात खूप आत जाऊ नये.

- फोटो, सेल्फी घेताना डोंगराच्या, कडयाच्या टोकावर उभे राहून घेऊ नये, ज्यामुळे तोल जाणार नाही. 

- पावसात धुक्यामुळे दिषा आणि वाटा अनेकदा चुकतात. त्यामुळे वन डे पिकनिक सूर्यास्तापूर्वीच पूर्ण करा. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या