३१/१२/१८

आठवड्यातून एक दिवस नो मोबाइलचा संकल्प करूया

नविन वर्षात आठवड्यातून एक दिवस नो मोबाईलचा संकल्प करूया
-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)
आजपासून सुरू होणारे नवीन वर्ष म्हणजे नवीन उत्साह, नवी सुरुवात. वर्षाच्या सुरुवातीला आखलेले नवनवीन संकल्प. मात्र काही लोक मद्यपान, पार्ट्या, डिजेचा गोंगाट अशा गोष्टींचा अवलंब नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी करताना दिसतात. आपणा सर्वानाच माहीत आहे की, अशाप्रकारे आपल्या आनंदाचा उन्माद करणे आपल्यासाठी आणि समाजासाठी घातक आहे. तरीदेखील अशा प्रकारे नवीन वर्षाचे स्वागत करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न आपणच स्वतःला विचारायला हवा. माझे स्वतःचे प्रामाणिक मत असे आहे की, अशा प्रसंगी मद्यपान, पार्ट्या, डिजे इ.गोष्टींचा गाजावाजा न करता साधेपणाने चांगले संकल्प करुन नवीन वर्षाचे स्वागत करावे.
 आपल्या रोजच्या दैनंदिनीत अधिकाधिक वेळ मोबाईल आणि सोशल मीडियाच्या संवादात व्यतित करणारे आपण सर्वचजण आपले कौटुंबिक जीवन व आपली कर्तव्य पार पाडतो का? याचा विचार एकदा तरी नव्या वर्षात करूयात.. सरत्या वर्षाला निरोप देतानाच, नव्या वर्षातल्या अनेक संकल्पांसोबतच एक महत्त्वाचा संकल्प करूया, तो म्हणजे आठवडय़ातून एक दिवस नो मोबाईल डे.. आणि साधूया आपल्या प्रियजनांशी प्रेमाचा संवाद. मोबाईलच्या वापराने माणसामाणसांमधील अंतर कमी झाले हे खरे, पण आपल्यासोबत असणा-या आपल्या कुटुंबात राहणा-या व्यक्तींसोबतचा आपला संवाद मात्र कमी होत चालला आहे हे आपण विसरतो आहोत. दिवसाचे तासन्तास या मोबाईलच्या वापरात गुंग असणा-या या पिढीचा संवाद बाहेरच्या विश्वाशी अधिक दृढ झाला आहे. घरात रात्रंदिवस राबणारी आई, आपल्यासाठी उभे आयुष्य कामांत वाहून देणारे वडील यांच्यासाठी खरंच आपण वेळ देतो का? आठवडय़ातून एक दिवस हक्काचा त्यांना द्या. त्यांच्या रोजच्या सुख-दु:खाचे क्षण त्यांच्यासोबत बसून बोलून पाहा. निस्वार्थ प्रेम देणा-या या व्यक्तींसोबत घालवलेला वेळ हा नेहमीच आपल्या चेह-यावर समाधान उमटवणारा असतो. घरातील वृद्ध व्यक्तींना त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा दिवस वापरा या संवादातून तुमच्यातील एकोपा नक्कीच वाढीस लागेल.
आयुष्यात तुमच्या कुटुंबाव्यतिरिक्त तुम्हाला समजून घेणारे, तुमची सुख-दु:ख जाणणारे मित्र भेटणे म्हणजे आपले भाग्य समजतो. अशाच या मित्रांना प्रत्यक्ष भेटल्यावर मात्र संवाद हरवतो. सेल्फी आणि सोशल मीडिया अपडेट करण्यात आपला वेळ निर्थक वाया घालवतो. आठवडय़ातून एक दिवस जर अशाच जुन्या मित्रांसाठी, आपल्या आवडत्या जुन्या शिक्षकांच्या भेटीसाठी घालवला, तर नक्कीच आपल्या दु:खांचा विसर पडेल. केवळ सजीव मित्रच नव्हे, तर पुस्तक या मित्राच्या सान्निध्यात घालवलेला वेळ उलगडणा-या प्रत्येक पानातून आपल्याला आनंद देत जातो.

२०/१२/१८

खेळांना सुगीचे दिवस यावेत


 खेळांना सुगीचे दिवस यावेत
-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com

भारतीय मानसिकतेत खेळाने एका छंदापासून सुरू केलेला प्रवास व्यावसायिक पर्यायापर्यंत पोहोचण्यास बराच काळ लागला आहे. त्यातही अर्धीअधिक मने ही क्रिकेटने व्यापून गेली आहेत! अब्जांच्या घरात लोकसंख्या पोहोचलेला भारत एखाद्या राज्याएवढी लोकसंख्या किंवा आकारमान नसलेल्या, सुधारणेच्या बाबतीतही मागासलेल्या देशापेक्षा या फुटबॉलमध्ये एवढा मागे का? आणखी किती वर्षे आपण असेच मागे राहणार आहोत? अर्थात, फुटबॉल वर्ल्डकप हेच आपले अंतिम उद्दीष्ट असले पाहिजे असेही नव्हे, पण आशिया स्तरावर जरी विचार केला तरीही आपली अवस्था सगळे काही सांगून जाते. मग वर्ल्डकप तर खूपच दूरची गोष्ट राहिली. आपल्याकडे गुणवत्ता नाही? आपण त्या स्तरापर्यंत पोहोचण्यास लायकच नाही? काय कारण असेल यामागे. आज प्रत्येकालाच हा प्रश्न पडला आहे.
भारतात क्रिकेटला धर्म समजले जाते आणि क्रिकेटपटूंना देव. क्रिकेट हा खेळ देशवासीयांच्या नसानसांत भिनला आहे. आज सर्वत्र क्रिकेटचा बोलबाला असला तरी काही वर्षांपूर्वी क्रिकेटसाठी पोषक वातावरण नव्हते, पण कालांतराने परिस्थिती बदलत गेली. क्रिकेटच्या प्रशासकांनी आपल्या खेळाला इतक्या उंचीवर आणून ठेवले की वर्षभर क्रिकेट एके क्रिकेट अशीच चर्चा रंगू लागली आहे. अन्य खेळ मात्र अजूनही आपला लौकिक वाढवण्यासाठी झगडत आहेत. क्रिकेटप्रमाणे अन्य खेळ संघटनात्मक, व्यवस्थापकीय, प्रशासकीय पातळीवर कमी पडत आहेत.
पुरस्कर्त्यांचा अभाव.. अनुकरणीय, आदर्श खेळाडूंची कमतरता.. खेळापेक्षा शिक्षणाला असलेले अवाजवी महत्त्व तसेच पालकांची मानसिकता यामुळे अन्य खेळ बरेच मागे पडू लागले आहेत. तळागाळापर्यंत खेळ पोहोचवायला आणि रुजवायला संघटना कमी पडल्या. त्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचा वेग फारच संथ गतीचा आहे. खेळाचे उपयोग, आवाका, संशोधन, मार्केटिंगचं तंत्र लोकांपर्यंत पोहोचवलं तर अन्य खेळांनाही सोनेरी दिवस येतील.
खेळाचा पाया विस्तृत करायला हवा. आपल्याकडे शिक्षणाला बरेच महत्त्व दिले जाते. मुलगा दहावीत, बारावीत गेला की त्याचा खेळ बंद होत जातो. परीक्षा आल्या की व्यायामशाळा ओस पडू लागतात. परीक्षेत चार गुण कमी पडले तरी चालतील, पण खेळल्याने आयुष्यभर फायदे होतील, हा संदेश पालकांपर्यंत पोहोचला तरी हे चित्र बदललेले दिसेल. मुलगा खेळला तर तो जीवनात हमखास यशस्वी होईल. आपल्याला ऑलिम्पिक विजेते खेळाडू घडवायचे नाहीत, तर संगणकासमोर बसणारी मुले मैदानावर आणायची आहेत. प्रसारमाध्यमांनी हा संदेश पालकांपर्यंत पोहोचवला तर आमच्या प्रयत्नांना यश मिळेल.
भारतात फुटबॉलमय वातावरण व्हावंच, पण ते एका दिवसासाठी असू नये. आपण फुटबॉलमध्ये मागे का, सुविधांची वानवा का, शालेय स्तरावर मुले मोठ्या संख्येने फुटबॉल खेळत असताना मग त्याचे प्रतिबिंब राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर का उमटत नाही या व अशा अनेक मुद्द्यांचा साकल्याने विचार व्हायला हवा. तो सरकारनेच करायला हवा असे नाही पण सरकारने एक दिवसाचा उपक्रम करतानाच दीर्घकालीन उपाययोजनांचाही विचार करावा.
आपल्या देशी खेळांना जितका वाव द्यायला हवा, जितके कौतुक व्हायला हवे, तितके आपण करत नाही. शाळा, गल्लीत खेळ वाढला पाहिजे, रुजला पाहिजे, तरच तो राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचेल. आपण आपल्या खेळांना प्रोत्साहन दिल्याशिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व येणार नाही. चीनसारख्या देशाने पाठपुरावा करून आपले देशी खेळ ऑलिम्पिकमध्ये पाठविले. आपण मात्र आहे तिथेच आहोत. ही उदासिनता टाळायला हवी. 


१३/१२/१८

सन्मानाने मरणाचा हक्क हवा

सन्मानाने मरणाचा हक्क हवा
 -दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)

इच्छामरण या संकल्पनेची व्याप्ती मोठी आहे. अत्यंत असह्य, वेदनादायक असा  आजार बरा होण्याची शक्यता दिसत नसताना, रुग्णाला अशा जगण्यापेक्षा मरण हवेसे वाटू शकते. कधीकधी रुग्णाच्या मेंदूचा मृत्यू झालेला असतो, पण हृदय धडधडत असते. ही अवस्था काही दिवस, महिने, वर्षापर्यंतही लांबू शकते. या पार्श्वभूमीवर इच्छामरणाचा विवेकी विचार डॉक्टर, पोलीस सामाजिक कार्यकर्त्यांच्या एक तज्ज्ञ समिती आणि न्यायालयाने मिळून घेणेच योग्य राहील. आजारी माणसांच्या बाबतीत विशेषतः कॅन्सर रुग्णांच्या संदर्भात जे असह्य वेदनेने शेवटच्या घटका मोजत आहेत, त्यांचे गुणवत्तापूर्ण जगणे की केवळ कसेबसे जिवंत राहणे, यावरही विचार होणे आवश्यक आहे. यात त्यांचे स्वतःचे मन जगण्याविषयी के विचार करते, हे समजून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जसा जगण्याचा हक्क आहे, तसाच सन्मानाने मरण्याचा हक्क असायला हवा असे वाटते.त्यासाठी लिव्हिंग विल हे फायदेशीर ठरणारे आहे. कारण बऱ्याचदा एखादी व्यक्ती अत्यवस्थ असेल तर त्याचे नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याकडून पारंपरिक भावनिक विचार केला जातो. त्या अवस्थेतील  जगण्याला काहीच अर्थ नाही हे माहीत असूनही निर्णय कोण घेणार  हा प्रश्न असतो. कारण समाजाच्या दृष्टीने निर्णय घेणारा वाईट ठरतो. त्याला स्वार्थी, बेजबाबदार ठरवले जाते. त्याचबरोबर आपल्या जिव्हाळ्याच्या माणसाबाबत आपण असा निर्णय घेऊ शकलो असतो का अशा खूप संभ्रमावस्थेत, द्विधा मनस्थितीत लोक असतात. हे सर्व सुरु असताना आजाराने ग्रस्त असणारी व्यक्ती मला जगायचे नाहीये किंवा वेदना सहन होत नाहीत म्हणून मला मरायचे आहे या भावना व्यक्त करू शकत नसते. कारण, त्या रुग्णाची स्थितीही ते सर्व समजण्याची नसते. दुसरीकडे यासंदर्भात एक महत्त्वाचा पैलू असतो तो आर्थिक बाजूचा. आजच्या काळात रुग्णालयात भरती होणे हे प्रचंड खर्चिक ठरत आहे. हा आर्थिक भार सोसवत नसतानाही मरणासन्न अवस्थेत असणार्या व्यक्तीला वेदना सहन करत जगवण्यासाठी जिवंत लोकांनी कर्जबाजारी व्हावे या जगण्याला काहीच अर्थ राहात नाही. कारण, जगण्याची गुणवत्ताच राहात नाही. त्यामुळे  हे सर्व गुंतागुंतीचे प्रश्न कसे सोडवायचे ही एक मोठी समस्या असते.
नातेवाईकांनी याचा दुरुपयोग करण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही; पण असा दुरुपयोग मृत्युपत्राचाही केला जातो. मृत्युपत्रातही फेरफार केले जातात. त्याला आव्हान दिले जाऊ शकते; पण शंका आहे किंवा दुरुपयोगच होईल म्हणून एखादी सोय नाकारणे हे  उत्तर असू शकत नाही. शेवटी ज्या व्यक्तीने लिव्हिंग विल केलेली आहे त्याचे नातेवाईक निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत काहीच ठोस कारवाई होणार नसते. पण लिव्हिंग विल लिहिल्यामुळे निर्णय घेणार्‍यावर मी कोणाच्या मृत्यूचा निर्णय घेत नाही ना हा अपराधभाव किंवा मी हा निर्णय घेतोय तो बरोबर आहे की नाही अशी द्विधा मनस्थिती राहणार नसते. खूप जवळची व्यक्ती आजारी असताना कुटुंबीयांची अवस्था अशीच असते. त्याऐवजी आजारी व्यक्तीने विचारक्षम असतानाच त्याला कसा मृत्यू हवा ते लिहून ठेवले असल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात. डॉक्टरांनाही ते सोपे जाते. त्यामुळेच लिव्हिंग विल अचूक आणि अधिक तपशीलवार करण्यासाठी काही नियम, कायदे करणे हा या गुंतागुंतीच्या प्रश्नावरचा उत्तम उपाय ठरू शकतो.
रुग्णाच्या वेदनांचं शमन करणे हेही डॉक्टरचे कर्तव्यच आहे. मग यातून नेमका निर्णय कसा घ्यायचा? त्यासाठी आवश्यक ते वैद्यकीय ज्ञान, नैतिक पाठबळ आणि कायदेशीर संरक्षण असे नियोजन असायला हवे. त्यासाठी मेडिकल कौन्सिलपासून भारतीय दंड संहिता यांसारख्या अनेक कायद्यांत बदल करायला हवेत आणि या नियमांचे तंतोतंत पालन करणाऱ्या डॉक्टरला कायदेशीर संरक्षणही मिळायला हवे. वाढणारे आयुर्मान, वैद्यकीय प्रगती या पार्श्वभूमीवर इच्छामरणावर साधकबाधक चर्चा होणे ही काळाची गरज आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त जीवनेच्छा संपलेले लोक वेदना सहन करत आपल्या मृत्यूची वाट पाहत, मरत-मरत जगत आहेत. त्यांच्या इच्छेने त्यांना वेदनामुक्ती देणे, त्यांचा सन्मान करणे हीच त्यांची अखेरची इच्छा असू शकते.


दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...