Ticker

10/recent/ticker-posts

पिण्याच्या पाण्याचे नियोजन ही काळाची गरज

पिण्याच्या पाण्याचे नियोजन ही काळाची गरज
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

मुंबई आणि परिसरात पाणी कपात केल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचे योग्य नियोजन महापालिकेकडून झाले नसल्यामुळे पिण्याचे पाणी मुंबईकरांना कमी पडत आहे. पाणी गळती व चोरीमुळे दररोज मुंबईचे ७५ कोटी लिटर पाणी वाया जात आहे. त्याकरिता गळती शोधणारे पथक सक्षम करून उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर व्हावा म्हणून प्रेशर मॉनिटरिंग करावे. रेन वॉटर हार्वेस्टिंगची सत्ती, पाणी गळती व चोरी रोखणे, बेकायदा जल जोडण्या बंद करणे, वाया जाणारे पाणी कमी प्रमाण करणे. विहिरी आणि कूपनलिकांची युद्धपातळीवर दुरुस्ती करणे, वृक्षलागवड करणे, पाणी वाचविण्याकरिता नागरिकांमध्ये जाऊन जल प्रबोधन करणे आदीसह पाण्याचे विविध स्त्रोत विकसित करणे अपरिहार्य आहे.


पावसाचे पाणी अडविण्याची पद्धत


रेेन वॉटर हार्वेस्टिंग 
पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. पिण्याचे पाणी मौलिक धन आहे. प्रवासात आपल्याला त्याचे महत्त्व कळते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पाण्यासंबंधी खूप छान उद्गार काढले आहेत. ते आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.  ते म्हणतात,

"धन हे कुबेराच्या खजिन्यात नसते,
धन हे श्रीमंताच्या धनकोशात नसते, 
तर खरे धन हे पाण्याने भरलेल्या 
काळ्याभोर मेघांमध्ये असते,
बरसणाऱ्या जलधारांमध्ये असते". 


तलाव, नदी आणि भूजल साठा यांची जलसमृद्धी ही बरसणाऱ्या जलधारांमुळेच होते. म्हणजेच पर्जन्यमानावरच अवलंबून असते. म्हणून या पर्जन्याच्या मौलिक थेंबाची 'वाचवा-वाचवा' ही आर्त हाक आता प्रत्येकाने ऐकण्याची गरज आहे. इमारतींच्या छतावरील पाणी प्रत्येकाने स्वतःसाठी स्वयंशिस्तीने अडविले तर पिण्याच्या पाण्यावर येणारा ताण कमी होऊ शकतो. प्रत्यक्ष मुंबईत काही संकुलांमध्ये असे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. प्रत्येक शहरातील, गावागावातील, वाड्यांमधील प्रत्येक घराच्या छतावरील पाणी वाया जाऊ न देता ते टाक्यांमध्ये संकलित केले तर पाण्याची उन्हाळ्यात होणारी समस्या सुटू शकते.


तसेच प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून घरातील नळ चालू करताना जाणीवपूर्वक हळू उघडावा. एकदम जोरात नळ उघडला तर पाणी वाया जाते. गरज संपल्यावर लगेचच नळ बंद करावा. बाथरूममध्ये एक बादली भरून ठेवावी. कमोड टाकीत दहा लिटर पाणी असते. प्रत्येक व्यक्तीने ती सकाळी एकदाच रिकामी करावी. इतर वेळी बदलीतील तीन मग (तीन लिटर) पाणी टाकावे.एकावेळी सात लिटर पाणी वाचते. तसेच आंघोळीसाठी अर्धी बादली(५ते ६लिटर) पाणी पुरते. चंबूतील (अर्धा लिटर) पाणी थोडे थोडे अंगावर घेत चोळून चोळून स्वच्छता होते. "घळाघळा ओतीले तांबे, अंगावरी थेंब ना थांबे" अशा स्नानने अंग स्वच्छ होत नाही. पाणी वाया जाते. मुख्य म्हणजे पाणी वापरताना भान सतत राखावे. 'मी एकट्याने पाणी वाचवून काय होणार, पाईप फुटून कितीतरी लाख लिटर पाणी वाया जाते. रोज कित्येकजण रस्त्यावर गाड्या धुतात. असा विचार करू नये. असे पाणी वाया जाते म्हणून अधिक पाणी वाचविणे हे माझे कर्तव्य ठरते, असा विचार करावा. जेणेकरून, आपले मनोबल वाढेल. 


राज्य सरकार आणि महापालिकेने एकत्र बसून पाणी टंचाईवर उपाययोजना करावी. सध्या अस्तित्वात असलेल्या धरणांप्रमाणेच नवीन धरणांचा विचार करावा. प्रत्येक विभागात विहिरी निर्माण कराव्यात. मुंबईत जमिनीखाली नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. ते कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देता येऊ शकते.





टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. वाचनीय लेख, पाणी वाचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. पावसाचे पाणी वेळीच अडवून ते व्यवस्थित साठवून ठेवल्यास त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. उपयुक्त लेख.

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.