२५/१२/१९

बलात्काऱ्यांना फासावर लटकवा

बलात्काऱ्यांना फासावर लटकवा
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
संपूर्ण देशभर महिलांवर अन्याय, अत्याचार, लैंगिक छळ, बलात्कार आणि खुनाच्या घटना घडत आहेत. दररोज किमान एक बलात्काराची घटना घडल्याचे वृत्त येऊ लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महिलांच्या उन्नतीसाठी अहोरात्र कष्ट करणारे, त्यांच्या शिक्षणासाठी झटणारे आणि समतेचा संदेश सर्वदूर पसरवणारे महापुरुष या देशात जन्माला आले आहेत. स्त्री-पुरुषसमतेचा पुरस्कार करणारे महात्मे ज्या देशात निर्माण झाले, त्या देशात बुरसटलेली पुरुषी मानसिकता अद्यापि कायम असून या देशाने केवळ पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरला आहे की काय, असे वाटत आहे. 
दिल्लीतील सामूहिक बलात्काराचे ‘निर्भया’ प्रकरण घडल्यानंतर २०१३मध्ये गुन्हेगारी कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या उद्देशाने नव्या कायद्यात जन्मठेप आणि काही प्रकरणात मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. कायद्यामध्ये सुधारणा करून २० वर्षे तुरुंगवासाऐवजी जन्मठेप अशी तरतूद करण्यात आली. अ‍ॅसिड हल्ले किंवा लैंगिक गुन्ह्यांकरिता कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कायदे कितीही कठोर असले, तरी कायद्याची भीतीच लोकांना वाटत नाही़. कायदा कडक केला असला, तरी गेल्या दोन वर्षांत बलात्कारांच्या प्रमाणात किंचीतही घट झाली नाही़. उलट बलात्काराचे प्रमाण वाढत चालले आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, संघटित-असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांसह दोन-तीन वर्षांच्या कोवळ्या बालिकांपासून ७५ वर्षांच्या वृद्ध महिलांपर्यंत तमाम महिला अत्याचाराला बळी पडत आहेत़ ही विकृतीची विषवल्ली कशी ठेचून काढणार? हा प्रश्न भेडसावत आहे.
बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला मारून टाकले पाहिजे, त्याचा मरेपर्यंत छळ केला पाहिजे, अशी संतापजनक प्रतिक्रिया महिला वर्गामध्ये उमटत आहे; परंतु अशा प्रकारे बलात्काराऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद भारतातील कायद्यांमध्ये नाही. कायद्याची भीती वाटावी, असे कठोर कायदे लोकशाहीमध्ये  नसल्यामुळे बलात्काऱ्यांची भीड चेपली आहे. इस्लामी देशांमध्ये बलात्कारी व्यक्तीला दगडाने ठेचून ठार मारणे, शरीराचे अवयव छाटणे, फाशी देणे, लिंग कापणे, गोळ्या घालून ठार करणे, अशा प्रकारच्या शिक्षा भर चौकात दिल्या जातात. याच शिक्षा भारतातही दिल्या जाव्यात, अशी पीडितांची भावना असते. या घटना जितक्या क्लेशदायक, तिरस्करणीय, संतापजनक असतात तेवढीच तीव्र भावना बलात्काऱ्यांच्या शिक्षेबद्दलही असते. संयुक्त अरब अमिराती, इराण, इराक, अफगाणिस्थान, मलेशिया आदी देशांमध्ये बळातकाऱ्याला आरोप सिद्ध झाल्यानंतर २४ तास ते आठ दिवसांत फाशी देण्याची शिक्षा आहे. चीनसारख्या देशांमध्ये आठ दिवसांत फाशी दिली जाते. तालिबानमध्ये तर बळातकाऱ्यांचे अवयव कापून त्याला मरेपर्यंत दगडाने ठेचले जाते. आपल्या देशातही सर्वसामान्यांची बलात्काऱ्यांच्या बाबतीत हीच भावना आहे. आपल्या भारत देशात मात्र बलात्कारी व्यक्ती तुरुंगात पोलीस संरक्षणात राहत असून त्यांना चार वेळा जेवण दिले जात आहे. अनेक वेळा असे आरोपी न्यायालयात सबळ पुराव्यांअभावी सुटून ते उजळ माथ्याने मिरवतानाही दिसून येतात. महाराष्ट्रात लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या हजारो तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवल्या जात आहेत. 
दिल्लीतील निर्भयाचे एक प्रकरण प्रसारमाध्यमांनी लावून धरले होते, ते गांभीर्य आणि ती तीव्रता अन्य प्रकरणांमध्ये दिसून येत नाही़. ही विकृती रोखायची असेल, तर संघटित प्रयत्नाने पुरुषी मानसिकतेवर प्रहार करावे लागतील. महिलांच्या स्त्रीत्वावर घाला घालण्याचे तिरस्करणीय प्रकार होत आहेत. त्याविरुद्ध संघटितपणे आवाज उठवावा लागेल. तसेच बलात्कार सिद्ध होताच वेळकाढूपणा न करता शासनाने त्वरित फाशीची शिक्षा दिल्यास,  अशा विकृतांवर जरब नक्कीच बसेल.


दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...