Ticker

10/recent/ticker-posts

पुन्हा 'मिनी भोपाळ'..?

पुन्हा 'मिनी भोपाळ'..?
-दादासाहेब येंधे
एलजी पॉलिमर इंडस्ट्री या विशाखापट्टणम येथील कंपनीच्या टाकीतून (७ मे २०२०रोजी) वायूगळती झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण बेशुद्ध पडले. चालता-चालता लोक चक्कर येऊन पडत होते असे एकंदरीत चित्र पाहायला मिळत होते. भारतीय नौदल, अग्निशमन दल, पोलीस तसेच वैद्यकीय पथक यांच्या अथक प्रयत्नामुळे व त्यांनी वेळेवर केलेल्या बचावकार्यामुळे अनेकांना वाचवण्यात यश आले.

साडेतीन दशकांपूर्वी झालेल्या (३डिसेंबर १९८४) भोपाळमधल्या घटनेनंतरही देशात वायुगळतीच्या अनेक घटना वारंवार आजही घडत आहेत. मुंबई मधील शीव येथील क्लोरीन वायूगळती, केंद्र सरकारच्या पेट्रोलियम कंपनीत झालेली वायुगळती, तारापूर परिसरात अनेकदा झालेली वायुगळती, डोंबिवलीत हिरवा पाऊस, नगर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये बायोगॅस प्रकल्पात झालेला कामगारांचा मृत्यू अशा कितीतरी घटना येथे नमूद करता येतील. परंतु, त्यातून आपण आपत्ती व्यवस्थापनाचे काही धडे गिरवले आहेत का..! तर या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येत आहे. भोपाळ आणि विशाखापट्टणम येथील दोन्ही घटनांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे दोन्ही ठिकाणी वायू गळतीच्या घटना पहाटेच घडल्या. गाढ झोपेत असलेल्यांना पुन्हा श्वास घेताच आला नाही. विशाखापट्टनम मधली घटना उन्हाळ्यात घडल्याने वायुगळतीचा परिणाम पाच किलोमीटर परिसरापुरता मर्यादित राहिला आणि लोकसंख्येची घनता कमी असल्याने जीवितहानी कमी झाली. विशाखापट्टणम येथे १९६१ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प हिंदुस्तान पॉलीमर्सच्या मालकीचा होता. १९९७ मध्ये त्याची मालकी दक्षिण कोरियाच्या एलजी या कंपनीकडे आली. विशाखापट्टणमचा प्रकल्प दक्षिण कोरियाचा आहे.

स्टायरिन  प्राथमिक उपयोग हा  पॉलिस्टीरीन प्लास्टिक आणि रेझिन्स (राळ) बनविण्यासाठी होतो. स्टायरिन वायू हलकासा पिवळ्या रंगाचा असतो.  स्टायरिन हा ज्वलनशील वायू असून त्याला गोड असा वास येतो. बेन्झीन आणि इथिलिनपासून या वायूची कारखान्यांसाठी निर्मिती केली जाते. कंटेनर, पॅकेजिंग, सिंथेटिक मार्बल, फ्लोरिंग टेबलवेअर, आणि मोल्डेड फर्निचर मध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक आणि रबराच्या निर्मितीसाठी याचा वापर होतो. हवेतल्या स्टायरिन वायूमुळे डोळे जळजळणे, घशात घरघर, खोकला आणि असे प्रकार होतात. डोकेदुखी, मळमळ, उलट्या अशक्तपणा चक्कर येणे अशी लक्षणे आढळतात.

स्टायरिन लवकर आग पकडतो आणि आग लागल्यावर त्यातून विचार विषारी वायू  निघतो. आता या वायू गळतीच्या घटनेने अन्य शहरांना सावध केले आहे. गोव्यापासून कल्याण-डोंबिवली, पालघर, तारापुर, बोईसर, नागोठणे, रोहा अशा शहरांपर्यंत आणि ठिकाणी असलेल्या रासायनिक कंपनीसाठी हा एक धोक्याचा इशारा मानावा लागेल या सर्वच कंपन्यांना आता सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांची खातरजमा करावी लागणार आहे.

भारतात मात्र सातत्याने छोट्या मोठ्या औद्योगिक दुर्घटना घडत असतात आणि प्रत्येक वेळी आपण त्या घटनेला 'मिनी भोपाळ' असे म्हणतो आणि पुढे सरकतो औद्योगिक विकास गरजेचा आहेच पण त्यासाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन ही व्हायला हवे. आपल्या देशात रासायनिक कारखाने म्हणजे विषारी वायूचे ज्वालामुखीच बनले आहेत की काय असे वाटते. कधी कुठल्या ज्वालामुखीचा उद्रेक होईल हे सांगता येत नाही विषारी रसायने जमिनीत मिसळण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण आणण्यात आपण यशस्वी ठरललो नाही. विषारी वायूची विल्हेवाट विषारी कचऱ्याचे विघटन यासारखे विषयही आपल्या व्यवस्थेत सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहेत ही मानसिकता बदलणे नितांत गरजेची आहे. देशात इतके विविध प्रकारचे कारखाने उद्योग कार्यरत आहेत त्यांची सुरक्षितता किती आणि कशा पद्धतीची आहे हे तपासून पाहण्याची यंत्रणा विकसित व्हायला हवी. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या