१३/११/२०

दिवाळी, फटाके आणि आरोग्य

फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करा  

-दादासाहेब येंधे  (dyendhe1979@gmail.com)

आंनदाचा, उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी. वर्षभर प्रत्येकजण या सणाची वाट पाहत असतो. झगमगाट, स्वादीष्ट मिठायांची रेलचेल, दिवाळी आल्याची चाहूल देतात. पण, सध्याची दिवाळी म्हणजे सुरू होते ती मोठमाठया फटाक्यांच्या आवाजापासून आणि संपतेही फटाक्यांच्या आवाजानेच. पहाटेच कर्णकर्कश आवाज कानावर आदळत असतात. कागदांचे तुकडे, फटाक्यांचे तुकडे यांचा रस्त्यावर खच पडलेला असतो. या सगळयात मात्र चुराडा होतो तो म्हणजे पैशांचा... आणि फटाक्यांचा आनंदही मिळतो तोही फक्त काही क्षणांपुरताच. सध्या ध्वनी प्रदूषणही मोठया प्रमाणात वाढले आहे. फटाके वाजवल्यामुळे आनंदाच्या, उत्साहाच्या भरात आपल्या आजूबाजूला असणारे वृद्ध, लहान मुले, पक्षी यांना याचा खूप त्रास होतो याकडे आपले लक्षही नसते.

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच वायुप्रदूषणही मोठया प्रमाणात होते. फटाक्यांच्या धूरामधून हवेत मिसळणारे कार्बन डायआॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड, सल्फर डायआॅक्साईड यांसारखे विषारी वायू हवा दूषित करतात. दिवसभरातील वातावरणाच्या बदलामुळे, उष्णतेमुळे या वायुवर रासायनिक प्रक्रिया होत असते. याचे निसर्गावर, वातावरणावर आणि मानवी आरोग्यावरही वाईट परिणाम होतात. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाशी संबंधित आजार बळावतात. कफ, दमा, धाप लागणे, घसा खवखवणे यासारखे आजार उचल खातात.

दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच वायू प्रदूषणही मोठया प्रमाणावर होते. संध्याकाळपासून पहाटेपर्यंत वातावरणाचे तापमान कमी असल्यामुळे हवेत मिसळलेले धुलिकण जड होतात आणि सकाळपर्यंत त्यांचा एक दाट थर जमिनीलगत साठून राहतो. हे कण डोळयांत गेले असता त्या कणांतील सल्फर डायॉकसाईड  आणि डोळयातील पाण्यात असणारे नायट्रस आॅक्साईड यांची क्रिया होऊन आम्ल (ऍसिड) तयार होते. त्यामुळे डोळे चरचर होतात. त्यांची आग होते. या वायूमुळे दम्याच्या रूग्णांना श्वसनाचा त्रास होतो. यामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनू लागते. 

पक्ष्यांचे अति आवाजामुळे स्थलांतर करणे, आवाजामुळे घाबरून गेल्याने संरक्षणासाठी मानवी वस्तीत शिरणे असे प्रकार होतात. तर वनस्पतींच्या वाढीवरही फटाक्यांच्या धुरातील धुलिकणांचा परिणाम होतो. कोणत्याही प्रकारच्या फटाक्यामुळे प्रदूषण होतेच होते. तसेच या फटाक्यांच्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट न लावल्याने तो तसाच रस्त्यावर पडून राहतो. या कचऱ्यात असणारे प्लॅस्टिक, पुठठे, शोभेची दारू असे अविघटनशील पदार्थ सर्वत्र पसरल्यामुळे त्यामार्फत विषारी घटकही हवेत मिसळतात. 

आपल्या देशातील कित्येक गावांत आजही अनेक लोक सामाजिक, आर्थिक, परिस्थितीचा सामना करीत आहेत. तसेच उपासमार, कुपोषण, बेरोजगारी, दुष्काळ यामुळे देशातील जवळजवळ निम्मी जनता ही बऱ्याचदा उपाशीपोटी झोपते. त्यांच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पूर्ण करण्याइतकाही पैसा नाही. असे असताना आपण आपले सण-उत्सव साजरे करण्यासाठी लाखो रुपये फक्त फटाक्यांवर उडवत आहोत हा मोठा विरोधाभास आहे. फटाक्यांची आतषबाजी करून प्रदूषणात भर घालण्यापेक्षा त्या पैशांमधून गरजू व्यक्तींना मदत करता येऊ शकते. त्यांना फराळ, कपडे अथवा इतर गरजेच्या वस्तू भेट म्हणून देता येतील. बघा करून...


आपले सण-उत्सव साजरे झालेच पाहिजेत. मोठया दणक्यात, जल्लोषात साजरे झाले पाहिजेत. पण, आरोग्यभान राखून...

  

1 टिप्पणी:

सायकल चालवा, आरोग्य मिळवा

  सायकल  चालती फिरती व्यायामशाळाच  -दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) सायकल हे एक पुरातन, सुपरिचित, सुलभ, स्वस्त, आरोग्यवर्धक व समाजोप...