गौराई पूजनातून लोकहितकारक दिलेल्या संदेशाची दखल
-दादासाहेब येंधे, २०२०
कोरोनाच्या संकटात महिला पोलीस शिपाई (बक्कल नं. १०७) कोमल पवार यांनी गौराईच्या रूपात सतर्कतेचा संदेश नागरिकांना दिला. या उत्तम संकल्पनेची दखल पोलीस कुटुंबप्रमुख गृहमंत्री(भाऊ राया) अनिल देशमुख यांनी घेतली अन् पोलीस शिपाई कोमल पवार यांचे अनेकांनी कौतुक केले. कोरोना संकट काळात गौराई पूजनातून लोकहितकारक दिलेल्या संदेशाची दखल “पोलीस तपास'ने घेतली असून, दिवाळी विशेष अंकातून लेख प्रसिद्ध करून पोलीस शिपाई कोमल पवार यांचा सन्मान करत आहोत.
मूळच्या सातारा जिल्ह्यातील बोरखळ गावच्या असलेल्या कोमल पवार यांचे लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने कोमल व त्यांच्या मोठ्या बहिणीचा सांभाळ आईने केला. कोमल यांनी शालेय शिक्षण बोरखळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतरचे महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात पूर्ण करून त्यांनी 'एम'ची पदवी मिळवली. मैदानी खेळांची आवड असल्याने लहानपणापासून त्या नेहमी क्रिकेट, व्हॉलीबॉलसह अन्य खेळायच्या. एकाच विशेष क्रीडा प्रकारातच करिअर करायचे, अशी इच्छा कोमल यांनी मनी बाळगली. मात्र, जवळच्या नातेवाईकांचे उद्गार कोमल यांच्यासाठी मार्गदर्शन ठरले अन् त्यांनी सरकारी नोकरी करण्याचा निश्चय केला. पोलीस भरतीचे अर्ज भरून त्या सन २०१४ साली पोलीस दलात भरती झाल्या.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ५ वर्ष कर्तव्य बजावल्यानंतर त्यांची बदली सातारा जिल्हा पोलीस दलात झाली. साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना मार्च २०२० महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. लॉकडाऊनमध्ये शासनाने जारी केलेल्या सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या सहाकार्यासह पोलीस शिपाई कोमल पवार या कर्तव्य बजावत होत्या. दरम्यानच्या काळात पाच महिने झाले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच होता. डॉक्टर रुग्णालयात तर पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. कोरोना होऊ नये म्हणून पोलिस नागरिकांना सतर्कचे संदेश देत आहेत, तर दुसरीकडे दुर्दैवाने कोरोनाची लागण झाल्यानंतर नागरिकांना बरे करण्यासाठी डॉक्टर, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत सुरू होती. कोरोना संकटात शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केली जात होती.
सोशल मीडियावर या देखाव्याची चर्चा झाली. याची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घेतली. गौराईच्या रूपात साकारलेल्या देखाव्यातून कोरोना संकट काळात दिलेलेल्या सतकतेच्या संदेशाचे अनिल देशमुख यांनी कौतुक केले. दरम्यानच्या काळात कोमल पवार या काळजीपूर्वक कर्तव्य बजावत असताना त्यांना सप्टेंबर महिन्यात अचानक त्रास उद्धवला. अंगीदुखी ब कोरोनाची इतर लक्षणे जाणवल्याने त्यांनी तपासणी केली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. कोमल यांच्यासह त्यांचे पती, लहान बाळ, आई व सासू-सासरे हे होम क्वॉरंटाईन झाले. १४ दिवसांचा क्वॉरंटाईचा काळ संपला अन् नियमानुसार कोमल पवार या पुन्हा कर्तव्यासाठी सज्ज झाल्या. आजच्या घडीलाही त्या कुटुंब व कर्तव्य या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडत आहेत. कोरोना संकट काळात लोकहितकारक संदेश जारी करून व स्वत: कोरोनावर मात करून पुन्हा त्याच स्फूर्तीने कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस शिपाई कोमल पवार यांना 'पोलीस तपास'चा मानाचा सलाम!
पोलीस तपास-दिवाळी २०२० अंकात प्रसिद्ध झालेला लेख
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.