प्रामाणिक, सोशिक मुंबईकरांची मुंबई
-दादासाहेब येंधे
मुंबई ही नेहमी गजबजलेली. अठरापगड जाती जमातीची, धर्माची माणसे येथे राहतात. इतर राज्यातील लोकांनाही ही मुंबई खूप आवडते. परप्रांतातून अनेक जण इथे स्थायिक झाले आहेत. मुंबईत पाऊल भर जागेतही व्यवसाय करता येतो. हे जाणून इथे परप्रांतीय लोकांचा भरणा झालाय. नोकरी-व्यवसायानिमित्त इथे पिढ्यानपिढ्या आपले वास्तव्य करून ते आहेत. मुळात इथे कुठल्या गोष्टीला बंधन नाही. कोणीही यावे, कोणीही जावे अशी मुंबई. इथे कठोर नियम करायला आणि पाळायला कोणालाही वेळ नाही. मिनिटा मिनिटांचा हिशोब आणि घड्याळ्याच्या काट्यावर दिनक्रम इथल्या प्रत्येक मुंबईकराचा सुरू होतो. सर्व जाती-धर्माची लोकं इथं गुण्यागोविंदाने राहतात.
मुंबई कोणालाही उपाशी ठेवत नाही, मुंबई चोवीस तास जागी असते. वाहतूककोंडी, गर्दीचा रेल्वेप्रवास, रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांनी व्यापून राहिलेले रस्ते, वाढती महागाई या काही समस्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या जणू पाचवीलाच पूजल्या आहेत. तरीही कमालीचा सोशिकपणा हा मुंबईकर बाळगून आहे. टॅक्सी, रिक्षाचालक, बसचालकांनी गाडीत विसरलेल्या वस्तू, दागिने प्रवाशांच्या हवाली केले आहेत. अशी अनेक उदाहरणे मुंबईकरांच्या प्रामाणिकपणाची देण्यात येतील.
याच प्रामाणिक, सोशिक अशा मुंबईकरांचं एक भावलेलं रूप मला रेल्वेप्रवासात आढळून आलं. तसं म्हणायला गेलं तर मुंबईच्या लोकलने प्रवास करणं म्हणजे तारेवरची कसरतच. पण कधी-कधी हाच प्रवास मनोरंजनही करतो. सकाळच्या वेळेस मुंबईच्या दिशेने तर संध्याकाळच्या वेळेस उत्तर मुंबईच्या दिशेने प्रवास करताना लोकलगर्दी ही रेल्वेप्रवासाचा अविभाज्य भाग म्हणावा लागेल. तसा लोकल प्रवास मी रविवार वगळता रोजच करतो. असेच एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने प्रवास करत होतो. त्या दिवशी नशीब जोरावर होते म्हणून चिंचपोकळीला चढल्यावर लगेच भायखळ्याला बसायला मिळाले. बसल्यावर प्रवासात विरंगुळा म्हणून खिशातून मोबाइल काढला अन महाराष्ट्र टाइम्सचे मोबाइल अँप सुरू करून ऑनलाईन बातम्या वाचायला सुरुवात केली. लक्ष मोबाईल मध्येच होते. पण, शेजारी बसलेल्या दोन प्रवाशांचा जोरजोराचा संवाद कानावर पडत होता. कित्येकदा अशा संवादाकडे आपले दुर्लक्षच होते. माझेही तसे झाले असते. पण, माझे मन त्यांच्या बोलण्याकडे जास्त जात होते. त्यातील एकजण घर आणि त्याचे कुटुंबीय यांच्याविषयी बोलत होता.
मला त्यांच्या बोलण्यातून सहज टिपता आले ते थोडक्यात सांगायचे झाल्यास त्यातील एकजण मोठमोठ्याने बोलत होता तो लालबागच्या रंगारी बदक चाळीत राहत असल्याचे जाणवत होते. त्याचं घर फारच लहान असावे कारण तो त्याच्या सहकाऱ्यांना, मित्रांना घरी नेण्याचे टाळत असतो. पावसाळ्यात घरी पाणी साचते. तळमजल्याला राहत असल्याने पावसाचे पाणी घरात शिरते. घराबद्दल तक्रारीचा सूर असला तरी त्याची बायको व मुलांबद्दल चांगलेपणा दिसून येत होता. बायकोने सर्व परिस्थिती नीट सांभाळून कोणतीही तक्रार न करता सर्व नातेवाईकांना सांभाळून घेत ती व्यवस्थित संसार करीत होती.
दोन मुले मुंबईतील महापालिकेच्या शाळेत जाताहेत. शिक्षकांकडून त्यांचे कौतुक होते. मोठा मुलगा शाळेतून आल्यावर आईला घरकामात मदत करतो. कधी-कधी चहा बनवतो. बायको आणि मुलाचे गुणगान करत असताना तो थकत नव्हता. पण, त्याचवेळी मुंबईत तुटपुंज्या पगारात भागवावे लागत असल्यामुळे मोठे घर घेऊ शकलो नाही आणि यापुढेही घेऊ शकणार नाही अशी खंतही त्याच्या तोंडून व्यक्त होत होती. लहान घर असले तरी हक्काचे मुंबईत घर असल्याचे समाधाननही त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. पुढे जाऊन मुलगा चांगला कामाला लागल्यावर मोठ्या घराचेही स्वप्न पूर्ण होईल असा भाबडा आशावादही त्याच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. नव्हे सर्वसामान्य मुंबईकरांचं तो जणू प्रतिनिधीत्वच करत होता.
असा हा सोशिक मुंबईकर. कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेणारा. डार्विनचा 'suvival to fittest' (सरव्हायव्हल टू फिटेस्ट) सिद्धांत सांगताना मुंबकरांचे उदाहरण चांगले बसेल. या सिद्धांतासाठी लोकलमधील तो प्रवासी एकदम योग्य आहे असे वाटते. घराबरोबरच त्याला कुटुंबाविषयी असणारे प्रेम एखादया कुटुंबवत्सल कुटुंबप्रमुखाला शोभेल असेच.
साधारण वीस मिनिटांच्या लोकल प्रवासात त्या रेल्वे प्रवाशाने सुखी संसाराचे एक सुत्रच जणू सांगितले. मुंबई ही अशाच प्रामाणिक आणि कुटुंबवत्सल मुंबईकरांमुळे भारताबरोबरच जगात एक आगळेवेगळेस्थान टिकवून आहे.
1 टिप्पण्या
Superb Article.Keep to up.
उत्तर द्याहटवाPlease do not enter any spam link in the comment box.