योग्य भाव मिळत नसल्याने दुग्धव्यवसाय
पुरता मोडकळीस
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळे वाटच लागली आहे. दुधाचे दर प्रतिलिटर १० ते १२ रुपयांनी कोसळले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. योग्य भाव मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय पुरता मोडकळीस होण्याच्या मार्गावर आहे. दुधाला किमान ३२ ते ३५ रुपये इतका भाव मिळावा या प्रश्नासाठी आंदोलने पेटत आहेत.
महाराष्ट्रातील सहकारी चळवळ जोमात असली, तरी ६५ टक्के दूध खासगी डेअऱ्या व दुध प्रक्रिया उद्योगामार्फत शेतकऱ्यांडून खरेदी केले जाते. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून ग्राहकांना जरी एक लिटरला ४० ते ५० रुपये मोजावे लागत असले, तरी दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हाती मात्र, २५ ते ३० रुपयांपेक्षा कमीच दर पडतो. दुधाचा उत्पादन खर्च लक्षात घेतला तर, तो २६-२८ रुपयांपर्यंत येतो. परिणामी, बऱ्याचदा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. शेतकऱ्याच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या आणि मोठया प्रमाणात नफा कमावणाऱ्या दूध संघावर सरकारचे नियंत्रण असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरते.
दुग्ध व्यवसायात कार्यरत असलेल्या अल्प भूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना पशुखाद्य आणि चारा खरेदीच्या क्षमतेअभावी जनावरांना पुरेसा आहार देता येत नाही. तसेच पौष्टीक चारा उपलब्ध नसणे, साठवणुकीची कमकुवत सुविधा आणि तांत्रिक साहाय्य नसणे, यासारख्या अडचणींमुळे दूध उत्पादनावर मर्यादा येते. हे अडथळे विचारात घेतले, तर सुरक्षित डेअरी शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे उत्पादन तसेच सक्षम अशा स्वरूपाच्या विपणन सुविधा उपलब्ध कराव्या लागतील. म्हणजेच, दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीबरोबरच ग्रामीण भागातील प्रक्रिया उद्योगांमध्ये दूध उत्पादकांचा सहभाग वाढवावा लागेल.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने बहुतांश शेतकरीवर्गाच्या घरासमोर संकरीत गायीचा गोठा आहे. पतसंस्था सोसायट्या बँकांच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे ते कर्ज आता कशा पद्धतीने फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी पुरता अडकलेला आहे.राज्य सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.