Ticker

10/recent/ticker-posts

असे करा उकडीचे मोदक

मुंबई, दादासाहेब येंधे : गणेशोत्सव तसेच अंगारकी चतुर्थी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते उकडीचे मोदक आणि उकडीचे मोदक बनवायचे म्हटलं की, बराच वेळ जातो. कित्येकदा नेहमीप्रमाणे सारणाची पिठाची तयारी करूनही मोदक मनासारखे होत नाहीत. मोदक बनवताना फाटतात आणि सारण बाहेर यायला लागते, म्हणून मोदक करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या तर मऊ आणि पांढरे शुभ्र उकडीचे मोदक नक्कीच तयार होतील.


आहारात खोबऱ्याचा वापर वाढणं हे पुढे येणारा ऑक्टोबर हीट आणि तेव्हा होणारा पित्ताचा त्रास या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. या पित्तावर ओले खोबरे खूप चांगला उपाय आहे. खोबरे हे शरीराची ताकद वाढवते. साखर ही रसायनयुक्त असते त्यामुळे उकडीच्या मोदकात कमी रसायने असलेला गुळ सेंद्रिय गुळ वापरावा. 



उकडीचे मोदक महत्त्वाचे का..? कारण पावसाळ्यात हवेचा परिणाम म्हणून पचनशक्ती मंदावलेली असते. तेव्हा तळलेले पदार्थ न खाता असे उकडलेले पदार्थ खाणे महत्त्वाचे. यासाठी हे उकडीचे मोदक. तसेच या उकडीच्या मोदकातला एक मुख्य घटक म्हणजे तांदूळ. तांदूळ हा आपल्या रोजच्या आहारातला महत्त्वाचा घटक. तांदूळ, तांदळाचे पदार्थ पचायला हलके आणि ताकद देणारे असतात. उकडीचे मोदक तसे पचायला हलके. पण, ओले खोबरे आणि गुळाच्या वापरामुळे थोडं पचायला मोदक जड जातो. म्हणून उकडीचा मोदक फोडून त्यावर भरपूर साजूक तूप टाकून खायला हवा. यामुळे पोटातला अग्नी प्रदीप्त होतो आणि उकडीचा मोदक सहज पचतो.


तर चला मोदक बनवायला घेऊ या...

साहित्य : - 

स्वच्छ धुवून सुकवलेली तांदळाची पीठी

एक वाटी साखर किंवा गुळ

एक नारळ

दोन चमचे तूप

वेलची पूड

तेल.

कृती :- सारणासाठी कढईत थोडे तूप घालून खोवलेल्या नारळात साखर किंवा गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवा. शिजत असताना मधून मधून हलवत राहा, म्हणजे भांड्याच्या तळाला सारण चिकटणार नाही. शिजत आल्यावर त्यात खसखस, वेलची पूड घालावी. हलवून सारण एकजीव करावे. पुन्हा थोडे शिजवून आचेवरून उतरवून घ्यावे.


आवरणासाठी जितकं तांदळाचे पीठ तेवढेच पाणी उकळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ, दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घालावे. पाणी उकळल्यावर खाली घेवून त्यात पिठ घालून हलवावे.


झाकण ठेवून मंद गॅसवर दोन वाफा काढून घ्याव्यात. आचेवरून खाली उतरवून ही उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने मळून घ्यावी. हाताने मिळण्यासारखे झाल्यानंतर तेल पाण्याचा हात लावत मोदक घडवता येईल इतपत मऊसर ठेवावे.


या उकडीच्या पिठाचे लहान- लहान गोळे करून हाताने पारी बनवावी. वाटीचा आकार देवून त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्यात व टोक काढावे. मोदकाच्या कळ्या नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन पाच अशा पाडाव्यात.


हे तयार केलेले मोदक एका चाळणीत स्वच्छ पांढरे कापड घालून किंवा केळीच्या पानावर थोडं तूप लावून उकळायला ठेवावे आणि गरम असतानाच त्यावर साजूक तूप घालून खायला द्यावेत ही पद्धत वापरल्याने बाप्पाला आणि तुम्हा-आम्हा सगळ्यांना आवडणारे मोदक मस्त पांढरे शुभ्र आणि रेखीव होतील.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या