सणासुदीला पहिल्या पुजेचा मान बाप्पाचाच
-दादासाहेब येंधे
ॐकार प्रधान रूप असलेल्या गणेशाचे आगमन ही एक आबालवृद्धांमध्ये चैतन्य आणणारी गोष्ट आहे. गणपती बाप्पा येणार म्हणून होणारा उत्साह, तो आल्यावर त्याच्या सेवेसाठी हजर असताना होणारा आनंद व विसर्जनानंतर वाटणारी हुरहूर या तिन्ही भावनांची खलबते बहुसंख्य भाविक दरवर्षी अनुभवतात. गणपती या पाहुण्याची अगदी दरवर्षी येणारा आणि बरेच लाड करून घेणारा असूनसुद्धा स्थान प्रेमादराचे असते. विविध रूपा-गुणांनी प्रसिद्ध असलेल्या वेगवेगळ्या देवदेवतांच्या रांगेमध्ये या एका देवानेच पहिला नंबर पटकावला आहे. जनमाणसांच्या मनात मनात! मनातच नव्हे तर इतर कोणत्याही धार्मिक प्रसंगांमध्ये, उत्सवामध्ये, सणासुदीला पहिल्या पुजेचा मानही या बाप्पाचाच. हे असं इतकं वेगळं महत्त्व कशामुळे बरं मिळाला आहे एका देवाला आहे का ठाऊक..?
गणेश हे ॐ या आदिनादाचे प्रतीक मानले जाते. ॐ हा विश्वनिर्मितीतील प्रथम नाद मानला जातो. जर ईश्वराला निर्गुण व निराकार मानले तर त्याचे ध्वनिरुप रूप ओम ओंकार याचे दुसरे नाव प्रणव आहे. हा एक अनाहत नाद आहे, असा नाद जो कोणत्याही इतर आघाताशिवाय निर्माण झालेला नाद. या आदिनादामध्ये इतर सर्व नाद सामावलेले आहेत. योग शास्त्राप्रमाणे "ईश्वर प्रणिधान", ईश्वराला शरण जाणे हा एक अंतिम मोक्षाचा, शांतीचा सर्वात जवळचा मार्ग आहे. ईश्वर सर्वज्ञ असतो व त्याचे सर्वज्ञता अंतिम असते. त्यामुळे ईश्वर हा आपला एकमेव गुरु होऊ शकतो आणि म्हणूनच ईश्वरप्रणिधान हा एक अत्युच्च ज्ञानप्राप्तीचा मार्ग ठरू शकतो. ईश्वर हा अनादि, अनंत व कालातीत असल्यामुळे ईश्वर- समर्पणामधून ज्ञानाचा एक स्त्रोत आपल्याकडे अखंड वाहू शकतो.
ईश्वराचे निराकार, निर्गुण रुप म्हणजे ओमकार ध्वनी व ओंकाराचे साकार, सगुण रूप म्हणजे ईश्वर असे मानले तर ईश्वर म्हणजेच ओंकार! आणि कदाचित म्हणूनच पतंजलीच्या योगदर्शनामध्ये ते म्हणतात, "तस्य वाचकां प्रणव:" (ओमकार हे त्याचे म्हणजे ईश्वराचे प्रतीक आहे.) ओमकार नाद ही ईश्वरी अस्तित्वाची खुण आहे. आपल्या सर्वांमध्ये ईश्वराचा अंश आहे तसेच आपल्या शरीरामध्ये ओमकार नादही आहे. बाहेरचा गोंगाट थांबला. विचारांचा कोलाहल संपून मन जेव्हा शांत व अंतर्मुख होते तेव्हा हा नाद ऐकू येतो असे बऱ्याच अनुभवी ऋषिमुनींचे म्हणणे आहे.
प्रणव याची फोड केली असता प्र+नव अशी केली असता त्याचा निर्मितीशी असलेला संबंध लक्षात येतो. मांडुक्य उपनिषदाप्रमाणे विश्वामध्ये जे काही होते, आहे व असणार आहे ते सर्व म्हणजे ओम ओमकार हा अ, ड व म यांनी बनलेला आहे.
ओंकाराच्या अ, ड, म जशी ब्रह्म, विष्णू, महेश अशी केलेली आहे तशीच मनाच्या तीन अवस्थांशीही त्यांची तुलना केलेली आहे. जागृतावस्था, निद्रावस्था व दोन्हीमधील अवस्था म्हणूनच ओम काराच्या जपाचा, त्यावरील ध्यानाचा सल्ला ऋषी देतात. मनोजयासाठी! विश्वनिर्मितीची सुरुवात ओंकार नादाने झाली व त्या नादाने झाली व त्या नादाचे रूप हे 'सवै गजाकार' म्हणजे हत्तीच्या मुखासारखे होते. अथर्वशीर्षमध्ये ओम काराचा व विश्वनिर्मितीचा संदर्भ आहे. गणपतीच्या रूपामध्ये ओमकार दिसतो. गणपतीचा जन्मही शिव+शक्तीपासून झालेला आहे. तो शक्ती व सौंदर्य तसेच बल व कारुण्य यांच्यातील संतुलनाचे प्रतीक आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.