Ticker

10/recent/ticker-posts

खबरदार राहून सायबर हल्ला टाळा

नियमितपणे पासवर्ड बदलत राहिल्यास तुमचे ऑनलाईन अकाऊंट चोरण्यात हॅकर्सना अडचणी येतात

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

'हल्लीची पिढी जरा जास्तच डिजिटल झाली आहे...' असे शब्द आपण अधूनमधून ऐकत असतो. सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार, ई-कॉमर्सचा वापर गेल्या काही वर्षापासून कित्येक पटींनी वाढला आहे. ऑनलाइन व्यवहार करताना सायबर हल्ल्याची टांगती तलवार आपल्या मानगुटीवर असते. ऑनलाईन स्कॅमर्स नेहमीच आपली वैयक्तिक माहिती, क्रेडिट कार्ड आणि बँक अकाऊंटच्या माहितीच्या शोधात असतात. या माहितीचा वापर ते बेकायदा गोष्टींसाठी करत असतात. पण, आपण काही सोप्या गोष्टी केल्यास संभाव्य धोक्यापासून नक्कीच वाचू शकतो.



बँक, क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट नियमित तपासावे -  ऑनलाइन व्यवहार करताना क्रेडिट कार्ड किंवा बँकेची माहिती चोरल्यास फार मोठे नुकसान होते. तुमच्या क्रेडिट कार्डचा परस्पर गैरवापर केला जातो. संशयास्पद व्यवहार लगेच लक्षात यावेत म्हणून तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. यामध्ये चुकीचे काही आढळल्यास क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधावा.


व्हीपीएनचा वापर करा - डिजिटल जगात खाजगीपणा जपण्यासाठी व्हीपीएन म्हणजेच वर्चुअल प्रायव्हेट अकाउंट महत्त्वाचे साधन आहे. हे करताना तुम्ही काय ब्राऊज करताय हे पाहण्यापासून रोखण्यासाठी व्हीपीएनचा वापर होतो. तुम्ही इंटरनेटवर सर्फिंग करता त्या वेळी तुमचा आयपी अड्रेस तुमच्या व्हीपीएन प्रदात्याच्या सर्वरच्या आयपी ऍड्रेस सारखाच भासतो. त्यामुळे तुमची ओळख, लोकेशन कुणालाही माहिती होत नाही. काही व्हीपीएन सेवा मोफत उपलब्ध आहेत. मात्र, पैसे भरून तुम्ही अधिक सुरक्षा मिळवू शकता.


वेळोवेळी पासवर्ड बदला - नियमितपणे पासवर्ड बदलत राहिल्यास तुमचे ऑनलाईन अकाऊंट चोरण्यात हॅकर्सना अडचणी येतात. नवा पासवर्ड देताना तो काहीसा गुंतागुंतीचा, चटकन अंदाज लावता येणार नाही अशा प्रकारची चिन्हे अंक अक्षरे किंवा सांकेतिक अद्याक्षरांचाच वापर केलेला असावा.


सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळा - कॉफी शॉप, हॉटेल, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी मोफत वाय-फायचा वापर करताना बँक अकाऊंट क्रेडिट कार्ड पोर्टल वर जाऊ नका. मोफत वायफाय अनेकदा सुरक्षित नसतात. सायबर गुन्हेगार या माध्यमातून तुमची माहिती चोरू शकतात. वैयक्तिक माहितीचा वापर होणार नाही, अशा कामांसाठी सार्वजनिक वाय-फायचा वापर करा.


फिशिंग स्कॅम्सवर नजर ठेवा -  तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती, बँक अकाऊंट किंवा क्रेडिट कार्ड पोर्टलची माहिती घेण्यासाठी तुमच्या नकळत खोटे ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज पाठवले जातात. अनेकदा हे मेल तुमच्या बँकेनेच पाठवले असल्याप्रमाणे हुबेहूब असतात. तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती भरण्यासाठी एका वेब पेज वर नेणारी लिंक त्यात असते अशी माहिती कधीही देऊ नका. तुमची बँक कधीही अशा प्रकारे ऑनलाईन माहिती विचारत नाही.

टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशनचा वापर करा  - बँका, हेल्थकेअर आणि वित्तीय सेवांसाठी टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशनचा वापर करा. यात तुम्हाला तुमचे नाव आणि पासवर्ड टाकून नंतर ई-मेल किंवा टेक्स्ट केला जाणारा कोड टाकायचा असतो.लॉगइनच्या या अतिरिक्त पायरीमुळे वेबसाईटवर हॅकर्सना प्रवेश मिळण्याची शक्यता कमी होते. 





टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.