Ticker

10/recent/ticker-posts

सण उत्सवासोबत आरोग्य जपणारी वटपौर्णिमा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

पाच फळांचे तबक, निरांजनाची वात, पाण्याने भरलेला कलश, हळीकुंकूचे पंचपाळ, अगरबत्तीचा दरवळ, हिरव्या चुड्याचा साज, मंगळसूत्राचे काळे मणी, वडाला गुंडाळण्यासाठी धागा आणि वडाभोवती सात फेऱ्यांचा वसा लेऊन पतीसाठी सात जन्मासाठी मागितलं जाणारं मागणं, अर्थातच वटपौर्णिमा साजरी करण्याचा प्रत्येकाचा मनसुबा अलीकडे वेगवेगळा दिसून येत आहे. वडाचं पूजन करताना नकळतच पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली जाणारी मागणी पाहता यामागे प्रत्येकीची व्रत वैकल्यामागे एक भावना दिसून येते. आपण कितीही आधुनिक विचार अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला, तरी काही अपवाद वगळता, एक व्रत म्हणून ठिकठिकाणी वडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी केली जाते.



अलीकडे तर पत्नी पतीसाठी सात जन्म आणि दीर्घायुष्याचं मागणं मागून उपवास करते, वडाला धागा गुंडाळून सात फेऱ्या घालते, तर आपणही तिच्यासाठी वडाला फेऱ्या घालाव्यात म्हणून काही ठिकाणी पतीदेखील तिच्या या व्रताचा आदर करताना दिसून येतात. ग्रामीण भागात विशेषत: वडाची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी केवळ वडाची फांदी आणून तिची पूजा केली जाते. खरं तर वृक्षतोडीतून पर्यावरणाचा ढासळणारा समतोल पाहता, पर्यावरणप्रेमींमधून काहीशी नाराजीही दिसून घेते.


वटपौर्णिमेला ग्रामीण अथवा शहरामध्ये खासकरून वडाच्या झाडाच्या ठिकाणी होणारे पूजन हे अनुभवण्यास मिळते. यामागे असणारी भावना, संस्कृती- परंपरेचे महत्त्व जतन करण्याचा उद्देश दिसून येतो. वटपौर्णिमेला महिलांमध्ये एक उत्साह दिसून येतो. व्रत वैकल्य करताना उपवासाची थकावट न बाळगता, परंपरेचं एक प्रकारे जतन केलं जातं. हे व्रत पर्यावरणाला धक्का न लावता करणं अधिक गरजेचं मानावं लागेल. कारण झाडांची कत्तल करून, फांद्या तोडून केल्या जाणाऱ्या पूजेपेक्षा वटवृक्षाची पूजा करणेच हितावह मानावे लागेल. यावेळी आपल्या भावनांची कदर तर होईलच, शिवाय पर्यावरणाचे जतनही होईल. 


अनेक स्त्रिया आवडीने हे व्रत करतात. नववधूंचा वटपौर्णिमेचा पहिला मान हा माहेरी मागला जातो. खास नववधूंना माहेरी आणुन वडाचे पूजन करून हे व्रत केले जाते. यानंतर सुवासिनींना फळांचे वाण देऊन त्यांचा मान राखला जातो. पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शृंगार, सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन केलं जाणारं वडाचं पूजन, वाणाची केली जाणारी देवाण घेवाण पाहता  या व्रताच्या निमित्ताने साऱ्याजणी एकत्र येतात. यावेळी एकाच कुटुंबातील स्त्रिया, सासू-सुना, शेजारोणी, नणंद-भावजय, मैत्रिणी आदी सगळ्या यानिमित्ताने एकत्र देतात. व्रताच्या निमित्ताने हसत-खेळत, उत्साहात हे व्रत परंपरेचा ठेवा जतन करणारे ठरते.


व्रतासाठी बाजारात खरेदीसाठी अगोदरपासूनच गर्दी दिसून येते. हे व्रत करावं न करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी या व्रताचा एक आगळा उत्साह दिसून येतो. फांदीची पूजा करावी न करावी असा विचार केला तरी बाजारात वडाच्या फांद्याची विकी होताना दिसतेच. कारण शहरात प्रत्येक ठिकाणी वडाचे झाड असेलच असे नाही, तर काही नोकरदार महिलांना वेळेअभावी वडाच्या फांदीचाही पर्याय निवडावा लागतो. एकंदरीतच व्रत करण्यामागे भावनांचे धागे गुंफलेले असतात, तर काहीजणांना नोकरी, आरोग्याच्या कारणाने उपवास करणे जमत नाही, काहींचा विश्वास नसतो, तर काहींना वडाला फेऱ्या घालणे मान्य नसते, अनेक कारणे असतात. पण, परंपरा म्हणून आजही वटपौर्णिमा व्रताचा पायंडा आजही जतन केलेला दिसून येतो.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या