आपली उणीव म्हणून रडत बसायचं की त्याचं वेगळेपण मान्य करून पुढे जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं
-दादासाहेब येंधे
पिळदार मिशा या पुरुषांची शान असल्याचं आपल्याकडे म्हटलं जातं, तर लांब व काळेभोर केस हे बाईचं सौंदर्य समजलं जातं. पण, एखाद्या मुलीला मिशा उगवल्या तर... होय असे झाले आहे. हो, हो तुम्ही वाचताय ते एकदम खरं आहे. स्त्रीच्या चेहऱ्यावर केस एकदम कुरूप वाटतात. अशी स्त्री लोकांच्या चेष्टा, मस्करीचा विषय बनते. पण, शायजाला मिशा उगवल्या आहेत आणि तिला त्या ठेवायच्या आहेत. तिला तिच्या मिशांचा अभिमान असल्याचे ती सांगते. चला तर मग आपण या महिलेची गोष्ट जाणून घेऊयात.
पुरुषांप्रमाणेच शायजाच्या अप्पर लिप्सवर केसांची जास्त प्रमाणात वाढ होत आहे. इतकेच नाही तर तिच्या भुवया व चेहऱ्यावरील इतर भागांवरदेखील केस वाढत आहेत आणि शायजाने स्वतःला यासाठी आता तयार केले आहे. आता ती आपले केस कापत देखील नाही.
आरोग्याशी संबंधित अनेक संकटांवर मात केल्यामुळे शायजाच्या मनात आता दृढ विश्वास निर्माण झाला आहे. ज्यामुळे तिला यात आनंद वाटतो. त्याच पद्धतीने तिने तिचं आयुष्य जगले पाहिजे, असं तिला मनापासून वाटतं. शायजाचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी तिच्या मिशी ठेवण्याला तिला पाठिंबा देतात.
शायजा म्हणते, "लोक माझी चेष्टा करतात की, पुरुषांना मिश्या असतात, स्त्रियांना असतात का..?" पण, गेल्या काही वर्षात बऱ्याच स्थानिक मीडियाने तिच्यावर बातम्या बनवल्या आहेत. कधीकधी ती त्या बातम्या तिच्या फेसबुकवर शेअर करते. तेव्हा काही लोक तिच्यावर उपहासात्मक कमेंट करतात. एकजण तिच्या शेअर केलेल्या बातम्यांवर कमेंट करताना म्हणतो की, ती तिच्या भुवया कोरते, तर तेच ब्लेड ती तिच्या मिशांवर का फिरवत नाही? यावर शायजा विचारते की, "पण मला काय आवडतं? काय ठेवायचं आहे? याबद्दल कोणीही विचारत नाही. मला आता या सगळ्याची सवय झाली आहे. खरंतर कधी कधी मला या गोष्टी वाचून हसायला येतं असं ती सांगते.
कोणत्याही परिस्थितीत स्वतःला आत्मविश्वासाने कॅरी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तेव्हाच जमतं जेव्हा स्वतःवर त्या व्यक्तीचं प्रेम असतं. त्या व्यक्तीने स्वतःला स्वीकारलेलं असतं. या समाजाचा आपण एक भाग असल्याने त्याचा परिणाम आपल्यावर होतो. नकारात्मक गोष्टी त्रासदायक ठरतात. समाजमान्यतेसाठी धडपड केली जाते. हे सगळं मान्य आहे. पण, या चौकटीबाहेरचं काही आपल्या वाट्याला येत असेल, आलं असेल तर त्याला आपली उणीव म्हणून रडत बसायचं की त्याचं वेगळेपण मान्य करून पुढे जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं आणि शायजाने ते ठरवलं आहे असं यावरून वाटतं.
आपल्यापैकी कितीतरीजणी इतरांच्या नजरेतून स्वतःकडे बघतात. स्वतःच्या शरीराकडे बघतात. परिणामी, समाजमान्य सौंदर्याच्या निकषांमध्ये न बसल्यामुळे स्वतःचं जगणं अवघड करून घेतात. जगात कोणीही परिपूर्ण नाही हे वास्तव स्वीकारून स्वतःला आहे तसं स्वीकारलं, स्वतःवर प्रेम केलं तर आयुष्य शायजासारखं भरभरून जगता येऊ शकतं हे प्रत्येकीने यानिमित्तानं ठरवावं, तिच्याकडून प्रेरणा घ्यावी असं वाटतं.
Photo: google
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.