उन्हाळी सुट्टी म्हणजे पालक आणि मुलं यांच्यात नव्याने नातं निर्माण करण्याची एक संधीच
-दादासाहेब येंधे
परीक्षा संपल्या की मुलांना वेध लागतात ते उन्हाळी सुट्टीचे. या उन्हाळ्याच्या सुट्टीत करायचं काय..? असा प्रश्न पालकांच्या समोर आ करून उभा राहतो. खरंतर उन्हाळी सुट्टी म्हणजे पालक आणि मुलं यांच्यात नव्याने नातं निर्माण करण्याची एक संधीच. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न जर आपण पालकांनी केला तर तो योग्य होईल आणि मुलांना ते हवं असतं. पण, नोकरी धंद्यामुळे ते प्रत्येकाला जमेल असं नाही. पण, ज्या पालकांना शक्य आहे त्यांनी वेळात वेळ काढून तो आपल्या मुलांसाठी राखून ठेवावा. या वेळेत मुलांसोबत करता येतील अशा काही गोष्टी जरूर कराव्यात. सायकल, टु व्हीलर आपल्या मुलांना चालवायला शिकवा. यामध्ये एकमेकांबरोबर होणारा संवाद कित्येकदा मुलांचं अनुभव वाढविण्यास मदत करतो.
आज आपल्या मुलांच्या हातात स्मार्टफोन आले आहे. या फोनमध्ये असणारे युट्युब च्या मदतीने कधीतरी त्यांना आवडणारे एखादी सोपी पाककृती करायला सांगा. मुलांच्या मदतीला आपण उभं राहायचं; पण आपली मदतही त्यांना पूरक म्हणून करायची. तर मोठ्या मुलांना काही वेळापुरते स्वयंपाक घराचा ताब्यात द्यायचे. मुलांनी बनवलेले पदार्थ कौतुक करत घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून खाल्ले की त्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर देखील बघायला मिळतो. यामुळे मुले खुश होतात. सुट्टी लागली की कुठेतरी पिकनिकला जाण्यापेक्षा आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे आपल्या मुलांना आवर्जून घेऊन जा. यातून एकमेकांच्या ओळखी तर होतातच पण इतरांकडे गेल्यावर पाळायचे नियम नकळत मुलांना आत्मसात करता येतात.
सौंदर्य जपायला शिकवा. मुली आपण कसे दिसावं,, आपल्याला काय चांगलं दिसेल, कोणता रंग आपल्यावर उठून दिसतो, अशा कितीतरी छोट्या-मोठ्या गोष्टीबाबत दक्ष असतात. परंतु मुलं याबाबतीत काहीवेळा मागे राहतात. त्यांना वाटतं की हे सगळं मुलींना शोभून दिसतं आणि जेव्हा आपणही सुंदर दिसावं, प्रेझेन्टेबल असावं असं वाटतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तेव्हा वेळीच आपल्या व्यक्तिमत्व सुंदर करण्याकडे लक्ष द्यायला मुलांना शिकवा. स्वच्छता राखण्यासाठी फार डोक्यालिटीची गरज नाही पण म्हणून हे काम घरातील स्त्रियांनी व मुलींनीच केलं पाहिजे असं नाही तर मुलानेही घरात आईला साफसफाईच्या कामात मदत करायला हवी. त्यासाठी जर त्याला हातात झाडू घ्यावी लागली तर त्याला ते कमीपणाचं वाटू नये म्हणून आपण अधूनमधून त्यांना स्वच्छतेचे धडेही दिले पाहिजेत.
सतत टीव्ही पाहण्यामुळे मुलांचा मनमोकळा संवाद आणि विचारांची देवाण-घेवाण पूर्णपणे बंद झाली आहे. यातून काहींमध्ये न्यूनगंड वाढत आहे. कार्टून अधिक पाहिल्याने आभासी दुनियात मुले रामतात. या मुलांची विचार क्षमता कमी होते. टीव्ही पाहिल्याने डोळ्यांचे आजार होतात. अधिक वेळ टीव्ही बघितल्याने डोळे कोरडे पडतात. त्याचबरोबर डोळे चुरचुरतात. मोठ्या प्रमाणावर लाल होतात. सातत्याने टीव्ही समोर बसल्याने चष्म्याचा नंबरही वाढतो. वारंवार टीव्ही पाहणे, संगणकावर गेम खेळण्यामुळे मुलांच्या मानसिकतेत प्रचंड बदल होतो.
थोडक्यात, मुलांना टीव्हीवरील लहान मुलांसाठी लागणाऱ्या मालिका, चित्रपट, लघुपट दाखवा. पण, अति टीव्ही पाहण्याचा दुष्परिणामही त्यांच्या लक्षात आणून द्या.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.