Ticker

10/recent/ticker-posts

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त 'अक्षय तृतीया'

या दिवशी कोणतेही समारंभ कार्य करण्यासाठी विशिष्ट वेळ किंवा विशिष्ट मुहूर्त पाहिला जात नाही...

-दादासाहेब येंधे


अक्षय तृतीया म्हणजे कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभ दिन होय. अक्षय तृतीया या दिवशी जे काही जप, होम, पितृदर्पण दान इत्यादी केली जाते. ते अक्षय होते. असा शास्त्र संकेत आहे. वैशाख महिन्यातील शुद्ध पक्षातील तृतीया म्हणजेच 'अक्षय तृतीया'. या दिवसाला कृतयुगाचा प्रारंभ दिन मानला जातो.


अक्षय तृतीया हा वैशाख महिन्यात येतो. वैशाख महिना हा वणव्यासाठी प्रसिद्ध आहे. सूर्याच्या तेजाने सृष्टी तापून निघत असते. अशावेळी थंडगार पाण्यासाठी जीव व्याकुळ होत असतो. म्हणून पादचाऱ्यांची तृष्णा भागवण्यासाठी ठीकठिकाणी पाणपोई सुरू केल्या जातात. तसेच वाटसरू रस्त्याने गर्द सावली असलेले झाड शोधत असतो व त्याची पावले लगेच सावलीकडे वळतात. त्यामुळे त्याला विश्रांतीही मिळते. आपल्या संस्कृतीत अन्नदानापेक्षाही जलदानाला जास्त महत्त्व आहे त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासून रस्त्याच्या दुतर्फ झाडे लावण्याचा व पाणपोई उभारण्याचा हाच उद्देश असावा. त्यामुळे तहानलेल्याची तहान भागते व तहान भागवणारा पुण्याचा धनी होतो. वैशाखांचे हेच महत्त्व आहे.


या दिवशी कोणतेही समारंभ कार्य करण्यासाठी विशिष्ट वेळ किंवा विशिष्ट मुहूर्त पाहिला जात नाही. या दिवशी कोणतेही कार्य करताना मुहूर्त पाहू नये असे म्हणतात. अगदी गृहप्रवेश, वास्तू खरेदी, घरगुती समारंभ, दागिने खरेदी कोणत्याही वस्तूची खरेदी करणे आदी गोष्टींसाठी अक्षय तृतीयेचा दिवस सर्वोत्तम मानला जातो.


अक्षय म्हणजे अविनाशी, कधीही नाश न पावणारे निरंतर चिरकाल टिकणारे अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रारंभ केलेल्या गोष्टींचा सकारात्मक उद्देश दिसून येतो त्या दिवशी केलेले दान कधीही क्षय पावत नाही. या दानातून मोठे पुण्य मिळते. त्यामुळे या दिवशी सतपात्री दान केले जाते. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तांवर जमिनीत आळी करणे, रोपे लावणे आदींसह शेतीची कामे केली जातात. त्याचप्रमाणे चैत्रातील चैत्र गौरीचे विसर्जन केले जाते. यानिमित्त हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करून आंब्याची डाळ व कैरीचे पन्हे दिले जाते.  या हळदीकुंकू समारंभाचे खास वैशिष्ट्य आहे. यानिमित्ताने घरात काही गोडधोड शिवाय सण समारंभाच्या निमित्ताने नात्यांचा बंध जपलेला दिसून येतो. या दिवशी कुलदेवतेचे उपासना करणे, मंत्रोच्चार करणे, दानधर्म करणे यथोचित मानले जाते.


पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते असे म्हटले जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेपर्यंत जमिनीच्या मशागतीची कामे पूर्णत्वास न्यावीत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर धान्य पेरणी केल्यास समृद्धी नांदते. त्यामुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त कोणत्याही कार्यासाठी उचित मानला जातो. वस्त्र, आभूषणे, घर खरेदी किंवा कोणतेही महत्त्वाच्या कामे करण्यासाठी अक्षय तृतीयाला कोणतेही पंचांग अथवा मुहूर्त पाण्याची गरज भासत नाही. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केलेल्या गोष्टी या क्षय पावत नाही तर समृद्धीचे, भरभराटीचे एक वसा या निमित्ताने जोपासताना अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा वर्षभरातील शुभ मुहूर्तांमध्ये महत्त्वपूर्ण असा मानला गेला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या