Ticker

10/recent/ticker-posts

वाळवण वर्षभराचे सोबती

वर्षभर येणाऱ्या सणावारांसाठी जे तळणं आपल्याला हवं असतं ते सगळं करून साठवण्याचं काम एप्रिल-मे महिन्यात केलं जाते.


-दादासाहेब येंधे 

आजही आपल्यापैकी कित्येक जणांच्या घरी उन्हाळ्यात वाळवणाचे पदार्थ बनविले जातात. सध्या मुंबईत राहायला जरी जागा नसली तरी लहानशा गच्चीतही हे वाळवणाचे पदार्थ बनविण्याचे बेत आवर्जून आखले जात आहेत. कुठे ना कुठे गच्चीवर वाळवण घातलेले आपल्याला दिसून येते.




उन्हाचे चटके बसू नयेत किंवा वाळवण्याला चांगलं ऊन मिळावं म्हणून हे पदार्थ सकाळी लवकर उठून बनविले जातात. कारण ऊन वाढले की पायाला चटके बसतात मग ते वाळवण घालायला त्रास होतो, शिवाय उशिरा वाळवण घातलं की मग त्यांना ऊनही कमी मिळते. त्यामुळे अंगण, गच्ची जिथे कुठे जागा वाळवण्यासाठी मिळेल तिथली जागा स्वच्छ केली जाते.


त्यावर एखाद्या प्लास्टिकचं भलं मोठं कापड टाकले जाते आणि ते उडू नये म्हणून त्याच्या कोपऱ्यावर विटा किंवा दगड ठेवले जातात. आणि मग एक दिवस नागलीचे पापड, दुसऱ्या दिवशी नाचणीचे नंतर उडदाचे पापड मग साबुदाण्याच्या पापड्या आणि चकल्या, नंतर मिश्र डाळींचे वडे किंवा सांडगे आणि मग सगळ्यात शेवटी गव्हाच्या कुरडया. कारण गव्हाच्या चिकाच्या कुरडया करायच्या म्हणजे मोठाच घाट घालावा लागतो ते गहू भिजत घालून आंबवणे आदी गोष्टी पहिल्या म्हणजेच आदल्या दिवशी कराव्या लागतात.


पण हा चिक मोठा चविष्ट लागतो या चिकाच्या नावाने देखील कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटतं, जिरं आणि तेलाचे फोडणे असलेल्या चिक खाण्याची मजा काही औरच आहे. ज्यांच्याकडे हा चिक आवडतो अशांच्या घरी मुलांना खाण्यासाठी आणि कुरडयांसाठी असा भरपूर चीक केला जातो. चिकावर ताव मारल्या की कुरडया पाडायला अगदी लहान मुले सुद्धा पटकन तयार होतात. 


पापडाची देखील अशीच गंमत आहे. आजूबाजूच्या महिला पापड लाटायला येतात. सकाळच्या वेळी लवकर नाश्ता झाला की दुपारच्या वेळी हे पापड लाटले जातात आणि त्या पापड खारावर मुलांच्या अक्षरशः उड्या पडतात. दररोज वेगवेगळे पापड आणि त्यांच्या वेगळ्या लाठ्या. लाठ्या म्हणजे पिठाचे लहान लहान गोळे. तेदेखील मस्त लागतात. एकीकडे पापड लाठ्या लाटता लाटता देखील त्यातल्या कित्येक लाठ्या फस्त होतात.



बऱ्याच ठिकाणी तर शेवया देखील करायची पद्धत आहे. या शेवया वर्षभर पुरतात आणि सणावाराला त्याची पटकन खीर करता येते. हा घाट प्रामुख्याने खानदेशात किंवा घाटावर घातला जातो. मात्र, कोकणातही वेगळी बेगमी केली जाते. तिथे आंबापोळी, फणसपोळी, फणसाचे गरे, तांदळाचे पापड, फेणी, कैऱ्या, आवळे, काजू तळलेल्या मिरच्या, पोहा पापड असे पदार्थ केले जातात.



वर्षभर येणाऱ्या सणावारांसाठी जे तळणं आपल्याला हवं असतं ते सगळं करून साठवण्याचं काम मे महिन्यात केलं जाते. एक महत्त्वाचं कारण म्हणजे इतकं कडक ऊन मे महिन्याव्यतिरिक्त मिळत नाही आणि दुसरे म्हणजे मुलांच्या शाळांनाही सुट्टी असते. त्यामुळे घरातल्या महिलांना जरासा मोकळा वेळ मिळतो त्या वेळामध्ये त्या दुसऱ्या दिवसाची तयारी करून ठेवतात. काही महिला ज्या माहेरासाठी जातात त्या माहेरी जाऊन हमखास या वाळवणाचा बेत आखतातच आखतात.


आजकाल सगळ्या वाळवणाच्या गोष्टी या पॉश वेस्टनामध्ये मॉलमध्ये बघायला मिळतात. त्या घेण्यासाठी आपल्याकडे पैसे देखील भरपूर असतात. पण, ती आईच्या हातची चव, तो जिव्हाळा, आपलेपणाची भावना... या गोष्टी कुठे मिळतील? पूर्वीच्या काळी जेव्हा शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या मदतीने वाळवण केलं जायचे तेव्हा कष्टाबरोबरच विचारांचीही देवाणघेवाण व्हायची. एकोपा वाढीसाठी असा पुरेपूर फायदा व्हायचा. जणू काही सामाजिक स्नेहसंमेलनच व्हायचे.  सासुरवाशिणींच्या भावनांना वाट मोकळी व्हायची. एकमेकींबद्दलचे हेवेदावे साफ व्हायचे. लहान मुलींवर नकळत कष्टाचे संस्कार व्हायचे. ते या वाळवणामुळेच.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या