Ticker

10/recent/ticker-posts

'ति'नं सन्मानानं जगावं म्हणून..

सुधारणांच्या वाटेवर गावाचं एक पाऊल

-दादासाहेब येंधे

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड या गावाबद्दल अचानक सर्वांना कौतुक वाटू लागलं. त्याचं मुख्य कारण म्हणजे हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला मोठा निर्णय. तो म्हणजे विधवा प्रथा बंद करण्याचा एक मुखाने झालेला ठराव. आपल्या समाजात पतीच्या निधनाच्या वेळी, अंत्यविधी वेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे तसेच त्या महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. ही परिस्थिती आजही बहुतांश ग्रामीण भागात आहे. शहरी भागात याची तीव्रता कमी प्रमाणात असली तरी विधवा महिलेला वेगळी वागणूक दिली जाते.  २१ व्या शतकातही ही परिस्थिती उद्भवत असेल तर ती बदलली पाहिजे असं हेरवाडच्या ग्रामस्थांना वाटलं. नुसतं वाटलंच नाही तर त्यांनी या बाबतीत एक पाऊल पुढे टाकलं. विधवा प्रथा बंद करून कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे, तसाच तो विधवा महिलेला ही मिळाला पाहिजे या जाणिवेतून हेरवाड गावाने हे प्रगतीशील पाऊल टाकले आहे. परंपरागत जाचक रूढींमधून सुटका व्हावी, असेच सहन करणाऱ्यांसह अनेकांना वाटत असते. पण, पुढाकार घेण्यासाठीचे पहिले पाऊल खूप महत्त्वाचे असते. हेरवाड ग्रामपंचायतीच्या सदस्या मुक्ता संजय पुजारी आणि सुजाता केशव गुरव या महिलांनी हे पाऊल उचलले आहे. विधवा महिला सन्मान आणि संरक्षण कायदा अभिनयातून त्यांना प्रेरणा मिळाली. विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणेच वागणूक मिळावी सन्मान मिळावा हा या पाठीमागचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळेच विधवा प्रथेवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण ठराव या ग्रामपंचायतीत करण्यात आला.


विधवा प्रथेचा मागोवा घेत इतिहासात डोकावलं तर नेहमी कुणाच्या ना कुणाच्या नात्यांसोबतच आधारानेच (खास करून पुरुषांच्या) जगावी अशी सोयीस्कर कुटुंबव्यवस्था परंपरागत भारतीय समाजात दिसून येते. म्हणजे लहानपणी पिता, विवाहानंतर पती आणि वार्धक्यात पुत्र यांच्या सोबतीने जगणे म्हणजेचच खरे जगणे आणि योग्य जीवन असा समज स्त्रीच्या मनामध्ये रुजवला गेला. कुटुंब आणि समाज हा विविध स्थाने आणि भूमिका यांचा परस्पर संबंध यामुळे संघटित होत असून कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात विवाह संस्कार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. स्री पित्याचे घर सोडून विवाह करून सासरी येते. पतीच्या घरी आल्यावर तिला कौटुंबिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते. परंतु, पती निधनानंतर तिच्या स्थानाला मोठा धक्का बसतो. तिचे स्थान एकदम दुय्यम ठरविले जाते.


पुरातन पुरुष प्रधान संस्कृती मध्ये विवाहित स्त्री ही पतीच्या अधिकारात असावी. पतीशी एकनिष्ठ असावी, केवळ पतीचा हयातीतच नव्हे तर त्याच्या निधनानंतरही तिने पातिव्रत्य असावे असे मानले जाते. विधवेने पतीच्या स्मरणात आजन्म व्रतस्थ जीवन जगावे. पुनर्विवाह करू नये. असे जाचक निर्बंध त्याकाळी रूढ झाले. एकविवाह आणि पातिव्रत्य यांची सक्ती केली जाऊ लागली. तिच्या वाटेला अत्यंत उपेक्षित आणि कस्पटासमान आयुष्य आले. कोणत्याही मंगल प्रसंगी तिला लोक सन्मानापासून वंचित ठेवण्यात आले. कधी कधी तर तिने अशा प्रसंगी उपस्थित राहू नये अशी प्रथा पडली. तिने रंगीबेरंगी वस्त्रे घालून नयेत. मुक्तहस्त बोलू नये व केशवपण हा देखील एक सक्तीचा उपचार विधवेला पार पाडावा लागे. कोणतीही किंमत विधवेला दिली जात नसे. त्यावेळी तिच्यावर घरोघरी होणारे अन्याय, उपेक्षा यांनी अनेक घरांतून अहाय विधवांचे मूक हुंकार दबलेल्या आवाजात ऐकू येत. त्यात लहान वयात विधवा होण्याचे प्रमाण भरपूर असे. त्यांना पुनर्विवाह देखील करता येत नसे. कारण तशी तरतूद कायद्यातही नव्हती.


आज त्या काळासारखे संपूर्ण उपेक्षित किंवा असहनीय आयुष्य विधवेच्या वाट्याला येत नसले तरी तिला इतर महिलांसारखा मान सन्मान मिळत नाही. का बर विधवेला इतकं दुर्लक्षित समजले जातं. याचं कारण म्हणजे परंपरेने चालत आलेल्या मूर्ख कल्पना, तसेच गैरसमजांना कवटाळून बसण्याची  मानसिकता समाज अजूनही सोडत नाही. एखाद्या स्त्रीचा पती गेला की तिचे कुंकू पुसून ताबडतोब तिच्या बांगड्या फोडून टाकणं, मंगळसूत्र काढून टाकणं या गोष्टी त्या स्त्रीसाठी किती यातना देणाऱ्या असतील हे फक्त तीच जाणू शकते.


विधवा प्रथा बंद करून महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचा हेरवाड गावाने घेतलेला निर्णय क्रांतिकार व स्वागतार्ह असाच म्हणावा लागेल. या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने अनुकरण करावे. महाराष्ट्र शासनाने या निर्णयाची जनजागृती व अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक काढले आहे. या निर्णयामुळे विधवा महिलांना सन्मान मिळुनो त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.


Photo : google

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या