Ticker

10/recent/ticker-posts

पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेकां!

या दिंडीत सहभागी होण्यासाठी काही वयोमर्यादा देखील नसते...

-दादासाहेब येंधे

वारकरी हा गरीब-श्रीमंत, सामाजिक भेदभाव विसरून हरिनामाच्या गजरात तल्लीन होतो. या लोकदैवताला "विठ्ठल म्हणा… विठोबा म्हणा… किंवा पांडुरंग…” महाराष्ट्राच्या भक्तीभाव आणि लोकसंस्कृतीला एकत्र आणण्याचे काम म्हणचे वारी. 



अशीच या विठुरायाची ओळख. त्याच्या भेटीला जाण्यासाठी वारीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक जण “मी’' पणा सोडूनच सहभागी होतो. गरीब-श्रीमंत, सामाजिक भेदभाव विसरून हरिनामाच्या गजरात तल्लीन होतो.


विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म ।

भेदाभेद भ्रम अमंगळ ।।

आईकाजी तुम्ही भक्त भागवत।

कराल ते हित सत्य करा ।।


संत श्री तुकाराम महाराज सांगतात, “हे जग विष्णूमय असून इथे कुणाचाही जात, धर्म, पंथ, पक्ष, प्रांत, लिंग यावरून भेद करणे, हे अमंगळपणाचे लक्षण आहे. समतेच्या पायावर उभ्या असणाऱ्या भागवत धर्माच्या भक्तांनो सावधपणे मी जे सांगतो आहे ते ऐका आणि सत्यामध्येच हित असल्याने ते सत्य स्वीकारून आपले हित साधून घ्या. कोणत्याही जीवाचा मत्सर न करणे हीच खरी ईश्वराची भक्ती आहे. समाजात परस्परांविषयी इतका बंधुभाव वाढला पाहिजे की, कोणत्याही अवयवाला इजा झाली तर संपूर्ण शरीराला वेदना होतात. त्याचा भोग जीवाला भोगावा लागतो. तसं समाजातील कोणताही घटक संकटात असेल तर त्याची आच समाजातील प्रत्येक माणसाला लागली पाहिजे.’ हे तुकोबारायांनी रुजवलेलं एकोप्याचं सार आज प्रत्येक वारकरी तुकोबारायांनी शिकवलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि एकोपा या मूल्यांचा जागर आजही वारीच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळतो. या वारीमध्ये जात, धर्म, लिंगभेदाला स्थान नाही. समाजात आजही संतांनी रुजविलेल्या समतेच्या जागर होतो आहे. सामाजिक न्यायाची शिकवण दिली जाते आणि ती जोपासली जाते आहे. समाज जागरासाठी संतांनी साहित्यनिर्मिती केली, विचारांची पेरणी केली त्याचे प्रतिबिंब आजही शेकडो वर्षांनंतर वारीच्या रुपाने दिसून येते.




पंढरीच्या लोका नाही अभिमान।

पाया पडती जन एकमेकां।।


कपाळी टिळा, गळ्यात तुळशीची माळ, चुरमुरे-बत्ताशांचा गोपाळकाला सर्वांसोबत आनंदाने खातो, जाती-धर्माने कोण याची चौकशी न करता वारीची परंपरा सुरू झाली. वारीतले सगळे वारकरी आजही एकमेकांना “माऊली’ अशी हाक मारतात. वारीच्या निमित्ताने ते एकत्र येतात, एकत्र भोजन, एकत्र राहणं, आचारांची विचारांची देवाण-घेवाण होते. प्रपंचाचे वाद विसरून एकसंघ होतात.

वारकरी एकत्र भोजन करताना

पुढच्या वारीला पुन्हा एकत्र येतात, एकमेकांच्या संपर्कात राहतात, ओळख वाढवतात, वैर विसरून एकोप्याची भावना प्रेरित होते या वारी संकल्पनेतून. परस्परांच्या पायावर नतमस्तक होतात. हा नमस्कार तुमच्या-माझ्यातील देवत्वाला आहे, अशीच त्यांची श्रद्धा आहे.

  महिला वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन


या दिंडीत सहभागी होण्यासाठी काही वयोमर्यादा देखील नसते. या दिंडी सोहळ्यात दोन वर्षाच्या लहान मुलांपासून तर ९० वर्षांच्या थोरांपर्यंत नागरिक देखील दिंडीसोबत सहभागी झालेले जागोजागी आपल्याला दिसून येतात. दिंडी सोहळ्यात स्त्री, पुरुष, लहान, थोर सगळेच एकमेकांना "माऊली", "माऊली" अशी हाक मारत अभंगांच्या ओव्या, टाळ चिपळ्यांचे भजन, मृदंगाचा आवाज, हरीनामाचा जल्लोष, जयघोष या सगळ्या वातावरणात भक्त आणि वारकरी लीन होऊन जातात.

 

वाळवंट


पंढरपूर श्रीविठ्ठल मंदिर

या पालख्यांचे पंढरपूरला आगमन झाल्यानंतर चंद्रभागा नदीत अंघोळ करून विठ्ठल रखुमाईची महापूजा व विठ्ठलाच्या दर्शनानंतर वारकरी या आनंदात पावन होतो. धन्य होतो व दिंडीतील आपला सहभाग कृतार्थ होतो असे समजतात.


Photo:google

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या