फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यास कोणाचाही विरोध नाही; पण आनंदाच्या या उधानास आवर घालून सार्वजनिक हितास बाधा येणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.
-दादासाहेब येंधे
भारतात कोणताही आनंद व्यक्त करायचा असो, विजय साजरा करायचा असो किंवा आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं असो.... फटाकांशिवाय आपले पान हलत नाही. फटाके म्हणजे आनंदाच्या क्षणांचे, शक्तीचे प्रतीक आहेच; पण या फटाक्यांना आपण इतके सरावलो आहोत की, त्यामुळे इतरांना काही त्रास होत असेल हा विचार देखील आपल्या मनाला स्पर्श करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील बजावले आहे की फटाके केव्हा आणि कधी वाजवावेत ते.
फटाक्यांच्या धुराचा त्रास विशेष करून अस्थमा, दमा असणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतो. फटाकाच्या धुराबरोबर हवेत उडालेले बारीक बारीक कण नाकावाटे आपल्या फुफुसात जाऊन बसतात. अशा ठिकाणी फुप्फुसात असणारी ऑक्सिजन ग्रहण करण्याची क्षमता नाहीशी होते. फटाक्याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना होतो. तसा फटाके फोडणाऱ्यांना देखील होतो. पण, फटाके उडवण्याच्या आनंदात तो त्रास त्यांना तेव्हाच जाणवत नाही.
काय असते फटाक्यांच्या आत...
फटाके हे कागदाचे, पुठ्ठ्याचे, प्लास्टिकचे, मातीच्या भाजून बनवलेला सुगड्यांचे असतात. त्यात चंदेरी रंगाचे दिसणारी पूड असते, तिला दारू असे म्हटले जाते. तर या दारू मध्ये प्रामुख्याने तीन प्रकारची रसायने मिक्स करतात. एक प्रकार म्हणजे स्वतः जळणारे पदार्थ किंवा रसायने, दुसरा प्रकार म्हणजे ऑक्सिजन तयार करणारी रसायने आणि तिसरा जळताना रंगीत दिसणारी रसायने.
कोळसा, गंधक, अँटिमनी अँटीमनी. अँटीमनी ही सल्फाईड स्वतः जळतात. त्यांची बारीक पूड करून ती वापरतात. अर्थात ही रसायने कक्ष तापमानाला पेटत नाहीत ती अधिक तापमानाला पेटतात. त्यासाठी त्यांना थोडे गरम करावे लागते. उष्णता वाढवण्यासाठी फटाक्याला वात असते. वात पेटवली की कोळसा, गंधक इत्यादी रसायने तापतात आणि मग ती पेटतात.
या जळणाऱ्या रसायनांना अधिक प्रकाशित होत जळण्यासाठी अधिक ऑक्सिजन लागतो तो दुसऱ्या प्रकारच्या रसायनांपासून मिळतो. यासाठी पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम क्लोरेट यांच्या वापर केला जातो. नायट्रेट, क्लोरेट यांच्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. गरम होऊन ही रसायने विघटित होतात. या वेळेला तो ऑक्सिजन मुक्त होतो आणि वापरला जातो.
दारूच्या मिश्रणाचा तिसरा प्रकार म्हणजे जळणाऱ्या पदार्थांना रंग येणे. लोखंडी वस्तूंना धार लावताना गरम झालेल्या लोखंडाचे लाल पिवळे कण बाहेर पडताना दिसतात. अशा प्रकारचे तापले की रंगीत प्रकाश पाडणारे कण दारूत असतात. त्यामध्ये लोखंडाप्रमाणे मॅग्नेशियम, पिवळ्या रंगासाठी सोडियम क्षार, लाल रंगासाठी स्ट्रांशियम, हिरव्या रंगासाठी बेरियम असे क्षार वापरले जातात. वातीला अगरबत्ती लावून ती जळायला लागल्यावर फटाक्याच्या आतल्या भागात खूप उष्णता निर्माण होते त्यातून तयार झालेल्या वायुमुळे दाब निर्माण होतो आणि फटाका फुटतो.
कोंडलेल्या वायूंवरील दाब अचानक कमी झाला की त्याचे आकारमान खूप वाढते आणि त्यामुळे मोठा आवाज होतो. स्फोटामुळे दारूमधील घटक लांब फेकले जातात, काही पेटतात. त्यातले सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन डाय ऑक्साईड, नायट्रोजनची विविध ऑक्साईड्स, कार्बन मोनॉक्साईड अँटीमोनी वायू हे घटक घातक मानले जातात.
काही ठिकाणी तर ग्रीन फटाक्यांच्या नावाखाली त्या फटाक्यांमध्ये विषारी बेरीयमसह विविध केमिकल आढळून आलेले आहे. बेरीयमच्या धुरामुळे श्वसननलिका आकुंचन पावून तीव्र दम्याचा झटका येऊ शकतो. लहान मुले व ज्येष्ठांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होऊन हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होऊ शकतो.
अनेक देशांमध्ये फटाके सडसकट उडवण्याला बंदी आहे फटकांवर बंदी नाही पण फटाके उत्पादनावर मात्र अनेक ठिकाणी नियंत्रण आहेत
कॅनडामध्ये १८ वर्षांखालील मुलांना फटाके विकणे हा गुन्हा आहे. करोईशामध्ये फटाक्यांच्या आवाजावरून त्याच्या तीन प्रकार केले आहे त्यातले भारी आवाजाचे फटाके 27 डिसेंबर ते एक जानेवारी या काळातच उडवता येतात
चीनमध्ये फटाके उडवताना झालेल्या चेंगराचेंगरी नंतर १९९३ ते २००५ पर्यंत फटक्यांवर बंदी घालण्यात आली होती. आता बरेच चिनी लोक फटाक्यांची आतषबाजी आपापल्या घराच्या गच्चीवरून बघण्यातच आनंद घेतात.
जर्मनीमध्ये बारा वर्षाखालच्या मुलांनी फटाके उडवण्यास कायद्याने बंदी आहे. हॉंगकॉंग आणि व्हिएतनामध्ये केवळ सरकारच फटाके वाजवू शकते. खाजगी व्यक्तींना तसे केल्याने शिक्षा होते. नॉर्वेमध्ये रॉकेट किंवा बाण यावर बंदी आहे, बाकीचे फटाके वाजवलेले चालतात. स्वीडनमध्ये रॉकेट सारखे फटाके उडवलेले चालत नाही.
फटाक्यांचे अतिरेकी आतषबाजी हा एकट्या ध्वनीप्रदूषणापुरता मर्यादित मुद्दा नाही. त्यामुळे निर्माण होणाऱ्या विषारी वायूमुळे वातावरण अशुद्ध होऊन त्याच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचे अनेक दाखले याआधी स्पष्ट झालेले आहेत. आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके वाजवणे हे परंपरेने आलेली प्रथा असली तरी काळाच्या ओघात जेथे लोकसंख्येची घनता तीव्र झाल्यानंतर शुद्ध हवेच्या श्वासाचा पुरेसा वाटा देखील प्रत्येकाच्या वाटणीस अभावानेच येत असेल. तेथे अशा विषारी अपायकारक वायूमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणाम अटळ असतात. फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यास कोणाचाही विरोध नाही; पण आनंदाच्या या उधानास आवर घालून सार्वजनिक हितास बाधा येणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. फटाके फोडण्याचा किंवा आनंद व्यक्त करण्याच्या मानसिकतेस कोणाचाही विरोध असण्याची शक्यता नाहीच. पण आनंद व्यक्त करण्याच्या हट्टापायी अन्य कोणाच्या आयुष्यात दुःखाचे प्रसंग येणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे.


0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.