समाज पुन्हा एकदा नव्याने बांधायला हवा...
आजकाल आपण म्हणतो की, नातेसंबंधातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे; पण हे नुसते शब्द नाहीत तर तसे प्रत्यक्ष घडते, याचा दाखला देणारी उदाहरणे अवतीभवती घडत आहेत. रक्ताच्या नात्यातही अंतर पडत चाललेले आहे.
याची कारणे काय, हा चिंतनाचा, अभ्यासाचा विषय आहे. तसे पाहिल्यास समाजात चित्रच असे दिसते की, प्रत्येक घटक हा समस्येने ञासला आहे. कारणांचे वैविध्य असले तरीही मानसिक तोल ढासळण्याचा प्रसंग आला की, माणसे हिंसक होताना दिसतात. कारण माणूस अनेक समस्यांनी त्रस्त आहे. सुखी होण्याचा तो जितका प्रयत्न करतो, तेवढे जास्त दुःख त्याच्या वाट्याला येते. विविध कारणांमुळे आलेली चीड त्याने दाबून असते; पण ताणलेली अवस्था जास्त काळ सहन होत नाही. तशीच माणसे मनाविरुद्ध घडणाऱ्या प्रसंगांना हिंसकरितीने प्रतिसाद देतात. जाळपोळ, मारहाण किंवा इतर काही घटना पाहिल्यावर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, बर्याच वेळेस असे कृत्य केलेल्या व्यक्तीला पश्चाताप होताना दिसत नाही. अशीच एक घटना जळगावमध्ये घडली. १९ वर्षांच्या मनीषा धनगरचा गळा आवळून तिच्याच आजी, वडील आणि काका यांनी जीव घेतला. कारण काय तर तिने प्रेम केले होते. आजही ऑनर किलीग होत असलेले पाहून आणि तिही पुरोगामी समजलेल्या जाणाऱ्या महाराष्ट्र्रात होत असलेली पाहून कुणालाही आपली मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. इतकेच नाहीतर अशा प्रकारच्या अनेक घटना आतापर्यंत घडलेल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ज्या राज्यात स्त्री स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली होती, जाती-पातीचे जोखड झुगारून देण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते, त्यांच पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हे प्रकार व्हायला लागले तर महाराष्ट्र आज कुठे जात आहे? याचा प्रत्येकाने विचार करायळा हवा. जाती-पातीचे जोखड तर अजूनही समाजाच्या मानगुटीवरच आहे.
त्यातच आपल्या
मुलीने अथवा मुलाने आपणच सांगू त्याच मुलाशी अथवा मुलीशी लग्न केले पाहिजे, असा पालकांचा
हट्ट असतो. अनेक पालकांनी तर स्वत:ही प्रेमविवाह केलेला असतो. मात्र, आपल्या मुलीने
खानदानाची प्रतिष्ठा जपावी, असा त्यांचा हट्ट असतो. खानदानाची प्रतिष्ठा म्हणजे काय?
प्रेमविवाह आणि ठरवून केलेला विवाह यात काय फरक आहे! केवळ आई-वडिलांच्या सल्ल्याने
तो विवाह केला नाही म्हणून तो अवैध ठरविता येईल का?प्रेमापोटी परजातीच्या मुलाबरोबर
लग्न केले म्हणून खानदानाची बदनामी होते काय? उलट त्याचे सर्वस्तरातून स्वागत व्हायला
पाहिजे. त्यांनी जाती-धर्माचे जोखड फेकून देऊन समाजाला अधिक बलवान करण्याचे काम केलेले
असते. पण कधीकधी हा हट्ट इतका विकोपाला जातो की, आपण १८-२० वर्षे ज्या मुलीला जिवापाड
सांभाळले तिला ठार करण्यासही त्यांचे हृदय जराही डळमळत नाही. लहानपणी आपल्या मुलीचे
प्रत्येक हट्ट पुरविणारे तिचे पालकच जेव्हा तिचा कर्दनकाळ ठरतात तेव्हा या नात्याला
काय नाव द्यावे हे कळतच नाही. खोट्या प्रतिष्ठेपायीच ते अशा प्रकारची पावले उचलीत असतात.
हे चित्र समाजासाठी खूप धोकादायक आहे. पुरोगामी म्हणवून घ्यायचे असेल तर आता समाजानेही
कात टाकणे गरजेचे आहे. वैश्विक विचार करणे आवश्यक आहे. जात आणि धर्म हे माणसाने केवळ
आपल्या सोयीसाठी तयार केलेले आहेत. त्यांचा उगाचच बाऊ करून कुणाचा जीव घेणे हे मानवतेला
शोभा देणारे निश्चितच नाही. मात्र दुर्दैवाने, आजही खोट्या प्रतिष्ठेसाठी जातीसाठी
माती खाल्ली जात आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
जन्माच्या दाखल्यावर जर जातीची नोंद महत्त्वाची मानली जात असेल, माननीय न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आपल्या निधर्मवादी देशात धर्म सांगणे गरजेचे असेल तर आपला देश निधर्मवादी कसा? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. आजही धर्म आणि जातीच्या बंधनात आपली मानसिकताच जखडून पडलेली आहे. समाजात तयार झालेली ही मानसिक विषमता संपविण्यासाठी कुठल्याही पुरस्काराची गरज नाही. तर मुळात ज्या जातीचे लेबल लावून आपल्या जन्माची नोंद करतो तसे करण्याचा आपल्याला अधिकार आहे का..? हा सवाल कोणी स्वतःला विचारत नाही. मुलींची जातीसाठी हत्या करणारे खुनी समाजात आहेतच, पण हत्यारी आहे ती आपली आजवर न बदललेली मानसिकता.. आजही आम्हीच आमच्या कपाळावर जातीचे स्टॅम्प मारण्यात धन्यता मानत असू तर मग दोषी आपला संपूर्ण समाज आहे, सरकार आहे आणि त्यासाठी ही समाजव्यवस्था सुधारण्याची गरज आहे.
वाहत चाललेल्या समाजाला पुन्हा एकदा जागे करण्याची वेळ जवळ आली आहे. लोक हो, उठा जागे व्हा. खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू-नका, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते. त्यासाठी गरज आहे ती शांततेने विचार करण्याची. कुणालाही संपवून प्रश्न संपत नसतात...तर ते यक्षासारखे पुन्हा-पुन्हा उभेच राहत असतात. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी हजार वेळा विचार करा. लोक, नातेवाईक चार दिवस बोलतील किंवा बोलणार नाहीत...पण गेलेला जीव पुन्हा येणार नाही, याचा विचार करयला हवा. जाती-पातीचे बंधन झुगारून समाज पुन्हा एकदा नव्याने बांधायला हवाय.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.